Leading International Marathi News Daily
गुरुवार, ७ मे २००९
(सविस्तर वृत्त)

पुणे व पिंपरीसाठी १ जुलैपर्यंत पिण्याचे पाणी आरक्षित
पुणे, ६ मे / खास प्रतिनिधी

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा १ जुलैपर्यंत पुरेल एवढा साठा धरणांमध्ये आरक्षित करण्यात आला असून पुरंदरमधील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे नाझरे धरणाचे पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पिण्याच्या

 

राखीव साठय़ानंतर उरलेले पाणी ग्रामीण भागांत सिंचनासाठी सोडण्यात येणार आहे.
वाढत्या उष्म्यामुळे जिल्ह्य़ाच्या काही भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य, चाऱ्याची टंचाई, पाण्याअभावी बंद पडलेली शेतीची कामे असे दृश्य दिसत आहे. पिण्याच्या टंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने टँकरचीही मागणी वाढत आहे. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी टंचाई निवारणाची बैठक जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांच्या दालनात झाली. या बैठकीला उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे अधिकारी, रोजगार हमी, कृषी, भूजल सर्वेक्षण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यंदा दुष्काळाची तीव्रता गतवर्षीपेक्षा अधिक असल्याने त्याचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन बैठकीच्या सुरुवातीला करण्यात आले. जिल्ह्य़ातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा यावेळी घेण्यात आला. पाण्याचे स्रोत आटल्यामुळे जिल्ह्य़ात ३४ टँकर सुरू करण्यात आले आहेत. बारामती तालुक्यात दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याने तेथे दहा टँकरने पाणी पुरविण्यात येत आहे. याशिवाय खेडमध्ये सहा, पुरंदर, भोर व आंबेगावमध्ये प्रत्येकी चार, मुळशी व वेल्ह्य़ात प्रत्येकी दोन आणि हवेली तालुक्यात एका टँकरने पाणी दिले जात आहे. या तालुक्यांतील २४ गावे व १३५ वाडय़ांतील सुमारे ३९ हजार लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर निर्भर आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
उन्हाचा ऐन कडाका सुरू असल्याने येत्या काही दिवसांत टँकरची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तयारी करण्याची सूचना बैठकीत करण्यात आली. पाण्याचे नवे स्रोत निर्माण करण्यासाठी २२३ विंधनविहिरींची खोदाई तसेच ८७ नळपाणी योजना हाती घेण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांना १ जुलैपर्यंत पिण्यासाठी पुरेल एवढा पाणीसाठा धरणांमध्ये आरक्षित करण्यात आला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत व वरसगाव धरणांत सध्या साडेपाच अब्जघनफूट (टीएमसी) पाणी शिल्लक आहे. शहराला दररोज बंद पाईपमधून ३५० क्युसेक व कालव्याद्वारे १५० क्युसेकने पाणी सोडण्यात येते. याचा विचार करता किमान दोन टीएमसी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. धरणातील उर्वरित पाणी शेतीसाठी सोडण्यात येणार आहे. १ जूननंतर मात्र शेतीचे पाणी बंद करण्यात येणार आहे. नाझरे धरणातील पाणी फक्त पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. जेजुरी नळपाणी योजना, पारगाव व मोरगावच्या जीवन प्राधिकरणाच्या योजनांना यातून पाणी देण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.