Leading International Marathi News Daily
गुरुवार, ७ मे २००९
(सविस्तर वृत्त)

भांडणात मध्यस्थीसाठी गेलेल्या दिराचा खून
पुणे, ६ मे / प्रतिनिधी
भावजयीला मारहाण होत असताना मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या दिराचा एका तरुणाने खून केल्याची घटना लोहगाव येथे कलवड वस्तीमध्ये काल रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली. संबंधित महिलेचे अनैतिक संबंध असल्याचे लक्षात आल्यावर तरुणाशी संपर्क ठेवण्यावर र्निबध घातल्यानंतर झालेले भांडण सोडविण्यासाठी दीर गेला असता हा प्रकार

 

घडला.
व्हिक्टर अॅन्थोनी रत्नम (वय २८) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याचा खून केल्याच्या आरोपावरून त्यांचे नातेवाईक स्टिवन दास (वय २५) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. स्टिवन हा सध्या फरार आहे. व्हिक्टर यांचा मोठा भाऊ विल्सन (वय ३३, तिघे रा. कलवड वस्ती, लोहगाव) यांनी याबाबत विमाननगर पोलिसांकडे फिर्याद दिली.
विमाननगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) रमेश गलांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विल्यम (वय ३३), विल्सन आणि व्हिक्टर हे तिघे भाऊ आहेत तर स्टिवन हा त्यांचा दूरचा नातेवाईक आहे. विल्सन हे पेंटिंगचे काम करतात तर व्हिक्टर हा पार्लरमध्ये काम करीत असे. विल्यम यांची पत्नी ख्रिस्टिना हिचे स्टिवन दास याच्याशी अनैतिक संबंध असल्याचे काही दिवसांपूर्वी उघडकीस आले. त्यानंतर विल्यम यांच्यासह विल्सन व व्हिक्टर यांनी स्टिवन याच्याशी संपर्क ठेवण्यावर घरी येण्यावर र्निबध घातले. काल रात्री विल्सन हे घरामध्ये टीव्ही बघत बसले असताना, पाठीमागील खोलीतून त्यांना अचानक आरडाओरडा ऐकू आला. काय घडले हे पाहण्यासाठी ते व्हिक्टर याच्यासह तेथे गेले. त्यावेळी ख्रिस्टिना यांना स्टिवन मारहाण करीत असल्याचे त्यांनी पाहिले. व्हिक्टर यांनी यावेळी हा प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न केला मात्र, स्टिवन याने त्याच्याजवळील चाकूसारखे धारदार शस्त्र काढून व्हिक्टर यांच्या छातीवर वार केले. या हल्ल्यात व्हिक्टर गंभीररित्या जखमी झाले व मयत झाले. त्यानंतर स्टिवन हा पसार झाला. निरीक्षक (गुन्हे) गलांडे याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, किरकोळ कारणावरून झालेल्या शिवीगाळीनंतर फरशीवर आपटून तरुणाचा खून केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एकाला अटक केली. मच्छी मार्केट येथे २५ एप्रिल रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली होती. प्रवीण गोपाळ देऊसकर (वय १८, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याचा खून केल्याच्या आरोपावरून परमेश्वर हनुमंत कांबळे (वय १८ , रा. कामराजनगर, येरवडा) याला अटक करण्यात आली. गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल संतोष जगताप यांना खबर मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक राम जाधव यांच्या पथकाने कांबळे याला अटक केली. प्रवीण याची आई शांता (वय ३७) यांनी याबाबत पोलिसांकडे फिर्याद दिली.