Leading International Marathi News Daily
गुरुवार, ७ मे २००९
(सविस्तर वृत्त)

लोक बोलतात पण कृती करत नाहीत - डॉ. सत्यपालसिंह
पुणे, ६ मे/ प्रतिनिधी

समाजामध्ये अनेक गुन्हे घडतात. या विरोधात बोलण्याची तयारी देखील दाखवली जात नाही. साक्ष द्यायला कोणी तयार होत नाही. लोक केवळ बोलतात त्यावर कृती करत

 

नाहीत, असे मत पोलीस आयुक्त डॉ. सत्यपालसिंह यांनी आज व्यक्त केले.
रंगत-संगत प्रतिष्ठान व साहित्य फाउंडेशन यांच्या वतीने २००९ चा ‘माणूस पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांना डॉ. सत्यपालसिंह यांच्या हस्ते देण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी स्मिता तलवळकर, प्रतिभाताई मोडक, अॅडव्होकेट प्रमोद आडकर, मैथिली आडकर उपस्थित होते.
माणूस पुरस्कार हा शाहू मोडक यांच्या स्मरणार्थ देण्यात येतो. १९३९ साली शाहू मोडक यांचा ‘माणूस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटास खूप यश मिळाले. यामध्ये शाहू मोडक यांनी एका हवालदाराची भूमिका साकारली होती. यामुळे हा पुरस्कार पोलीस अधिकाऱ्याच्याच हस्ते देण्यात येतो, अशी माहिती प्रतिभा मोडक यांनी दिली.
या वेळी सुलोचना दीदी म्हणाल्या की, पुण्यात मी बरीच वर्ष काम केले. परंतु त्या वेळची माणसं आता भेटत नाहीत. माणूस या पुरस्कारासाठी माझी निवड झाली म्हणजे माझ्याकडे माणुसकी आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा स्मिता तळवलकर यांनी सुलोचनादीदींच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, की दीदींच्या मानाने आमचा अनुभव फारच कमी आहे. जीव ओतून जसे या मंडळींनी काम केले, तसे आजच्या कलाकारांना जमत नाही. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली वर्णेकर यांनी केले.