Leading International Marathi News Daily
गुरुवार, ७ मे २००९
(सविस्तर वृत्त)

दूषित बर्फ वापरणाऱ्यांवर महापालिकेची कारवाई सुरू
पुणे, ६ मे/प्रतिनिधी

उन्हाळ्यामुळे शहरात शीतपेयांची मागणी मोठय़ा प्रमाणावर वाढली असून परिणामी बर्फाचा वापरही वाढला आहे. शहरात अनेक ठिकाणी दूषित, तसेच आरोग्याला अपायकारक बर्फाचा वापर होत असल्यामुळे या बर्फ विक्रीवर महापालिकेडून जोरदार कारवाई सुरू

 

करण्यात आली आहे.
उन्हाळ्यामुळे शहरात अनेक ठिकाणी शीतपेय विक्रीची दुकाने व स्टॉल थाटण्यात आले आहेत. अशा ठिकाणी प्रामुख्याने मँगो ज्यूस, तसेच अन्य शीतपेयांची विक्री मोठय़ा प्रमाणावर होत आहे. ही विक्री थेट उघडय़ावरच होत असून बहुतेक सर्व ठिकाणी कमालीची अस्वच्छताही आढळत आहे. विशेषत: या पेयांसाठी वापरला जाणारा बर्फ थेट रस्त्यावर, तसेच अनेक ठिकाणी तर घाणीच्या ठिकाणीही ठेवल्याचे दिसत आहे. हाच बर्फ थेट शीतपेयांमध्ये, उसाच्या रसामध्ये, लस्सीमध्ये तसेच मँगो ज्यूससारखे पदार्थ तयार करण्यासाठी वापरला जातो.
शहरातील बर्फ वापराच्या या प्रकारांची गंभीर दखल महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली असून दूषित बर्फावर तसेच उघडय़ावरील शीतपेय विक्रीवर जोरदार कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसे आदेश सर्व क्षेत्रीय कार्यालयांना नुकतेच देण्यात आले. त्यानुसार क्षेत्रीय कार्यालयांनी कारवाई सुरू केल्याचे आज सांगण्यात आले.
तीन हजार किलो बर्फ जप्त
कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाने उघडय़ावरील शीतपेय विक्रीवर आणि दूषित बर्फावर कारवाई करून २५ विक्रेत्यांकडील तीन हजार किलो बर्फ व तीनशे लिटर ज्यूस जप्त केले. कारवाईनंतर बर्फ तसेच ज्यूस नष्ट करण्यात आले. या कार्यालयाच्या क्षेत्रात उघडय़ावर थंडपेय विक्री करणारी अनेक दुकाने व स्टॉल उन्हाळ्यामुळे थाटण्यात आले असून त्यांच्यावर कसबा-विश्रामबागवाडा कार्यालयाने कारवाई सुरू केली आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना बळिवंत तसेच अन्न निरीक्षक ए. एम. भुजबळ, आरोग्य विभागातील अधिकारी श्रीगोडे, जानकू कंद, दुल्लम, गुंजीकर आणि बोराटे यांनी ही कारवाई केली.
कर्वे रस्ता कार्यालयातर्फेही कारवाई
कर्वे रस्ता क्षेत्रीय कार्यालयानेही उघडय़ावरील तसेच दूषित बर्फावर कारवाई सुरू केली असून दीड हजार किलो बर्फ आज जप्त केला. हा बर्फ तातडीने नष्ट करण्यात आला. क्षेत्रीय अधिकारी नितीन उदास तसेच क्षेत्रीय अधिकारी श्रीधर आखाडे यांच्या नियंत्रणाखाली विभागीय आरोग्य निरीक्षक चंद्रकांत भोसले, अन्न निरीक्षक शरद पडवळ यांनी ही कारवाई पार पाडली. कर्वे रस्ता क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या भागात ही कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.