Leading International Marathi News Daily
गुरुवार, ७ मे २००९
(सविस्तर वृत्त)

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक
पुणे, ६ मे/प्रतिनिधी

आपापसात संगनमत करून कौटुंबिक वादावरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना येरवडा पोलिसांनी अटक केली असून, अन्य पाच जणांच्या विरोधात खुनाचा

 

प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंदनसिंग सूरजसिंग बावरी आणि सूरजसिंग किसनसिंग बावरी या दोघांना पोलिसांनी अटक केली. याशिवाय शक्तिसिंग सूरजसिंग बावरी, पापडसिंग किसन बावरी, भगतसिंग किसनसिंग बावरी, धारुसिंग किसनसिंग बावरी, अवतारसिंग धारुसिंग बावरी (रा. सर्व माणिकनगर, येरवडा) यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न, आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना गोल्फ क्लबजवळील पाण्याच्या टाकीजवळ पाच वाजता घडली. याबाबत आनंदसिंग रघुबीरसिंग भादा (वय १९, रा. बालाजीनगर, येरवडा) यांनी ही फिर्याद दिली. भादा यांचे चुलते तिलकसिंग व भीष्मसिंग हे पाण्याच्या टाकीत पडलेला चेंडू काढण्याचे काम करीत होते. त्यावेळी आरोपींनी संगनमत करून भादा यांची आत्या बंधनकौर यांच्या सासरकडील लोक तिला नांदण्यास का पाठवत नाही, असे म्हणून त्याचा राग मनात ठेवून शिवीगाळ आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच तिलकसिंग यांच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक एस. पी. माळी तपास करीत आहेत. पोलिसांनी चंदनसिंग आणि त्याचे वडील सूरजसिंग या दोघांना अटक केली. न्यायालयात हजर केले असता ७ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.
एक लाख ६२ हजारांची घरफोडी
बंद दरवाजाचे कुलूप तोडून चोरटय़ाने कपाटातील सोन्या-चांदीच्या एक लाख ६२ हजार रुपये किमतीच्या दागिन्यांची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. रजनी राजेंद्र धोपाडे (वय ४९, रा. ढोले पाटील रोड) असे तक्रार दिलेल्या महिलेचे नाव आहे. काल सकाळी पावणेबाराच्या सुमारास राहात्या घरी ही घटना घडली. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. डुबल तपास करीत आहेत.
विनयभंग करणाऱ्यास अटक
घरात झोपलेल्या महिलेचा गैरफायदा घेऊन तिचा विनयभंग करणाऱ्या तिच्या मावसदिरास पोलिसांनी अटक केली. योगेश दशाराम घलोत (वय ३५, रा. भवानी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत संबंधित महिलेने तक्रार दिली आहे.