Leading International Marathi News Daily
गुरुवार, ७ मे २००९
(सविस्तर वृत्त)

रुग्णास न सांगताच डिस्चार्ज देणाऱ्या ‘सहय़ाद्री’ विरोधात तक्रार करणार
पुणे, ६ मे/प्रतिनिधी

उपचारासाठी दाखल झालेल्या महिला रुग्णास कोणतीही कल्पना न देता तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याचा प्रकार नुकताच घडल्याचे उघडकीस आले आहे. या संदर्भात पतित पावन संघटनेने मानवाधिकार आयोगाकडे सह्य़ाद्री रुग्णालयाविरोधात जाण्याची भूमिका

 

घेतली आहे.
अनुसया ऐनपुरे (वय ६०, रा. वारजे) या महिलेसंदर्भात हा प्रकार घडला. पतित पावन संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण आणि सरचिटणीस निरंजन फडके यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रुग्णाचे नातेवाईकही उपस्थित होते.
ऐनपुरे या महिलेस घरात पाय घसरून पडल्याने उपचारासाठी सह्य़ाद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. ऐनपुरे यांचे जावई नथू खाडे यांच्या नावावर सह्य़ाद्री रुग्णालयाचे ‘इंडस कार्ड’ हे आरोग्य योजनेचे कार्ड आहे. त्याद्वारे उपचार सुरू होते. त्यांना न सांगताच रुग्णालय प्रशासनाने त्यांना डिस्चार्ज दिला. कार्डच्या योजनेतील खर्चाची रक्कम वगळता उर्वरित काही पैसे देऊन कागदपत्रांवर त्यावेळी ऐनपुरे यांच्यासह असलेल्या महिलेचा अंगठा घेण्यात आला. या महिला अशिक्षित असल्याने त्यांना ही प्रक्रिया कळालीच नाही. सायंकाळी हातात डिस्चार्ज कार्ड देऊन तुम्हाला रुग्णालयातून सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी आम्हाला उद्या सकाळी सोडा, अशी विनंती रुग्णासह नातेवाइकांनी केली. त्यावेळी तुम्ही औषधोपचारासाठी दाखल व्हा, पण त्यासाठी तुम्हाला पैसे भरावे लागतील, असे सांगण्यात आले.
आरोग्य योजनेचे कार्ड असताना केवळ या योजनेत सह्य़ाद्री रुग्णालयाचा अधिक खर्च होऊ नये, या कारणासाठी रुग्णालयाने अचानकपणे डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या महिलेला रात्री साडेबारा वाजता रुग्णालयातून आवारात आणून सोडण्यात आले. रुग्णालयाविरोधात मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे फडके यांनी सांगितले. डिस्चार्ज कार्ड हातात दिल्यानंतर त्यांना सायंकाळीच बाहेर जाऊ देणे अपेक्षित होते, मात्र तसे न करता रात्रीपर्यंत त्यांना रुग्णालयात थांबवून नंतर रात्री बाहेर काढणे हे योग्य नाही, असा आरोप करण्यात आला.
दरम्यान, सह्य़ाद्री रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी रवि किरण म्हणाले, रुग्णाने डिस्चार्ज घेतला होता, मात्र त्यांना रात्री घरी जायचे नसल्याने त्यांनी येथे राहाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी पैसे भरण्याची सूचना केली, पण त्यांनी ते भरले नाहीत. त्यामुळे त्यांना येथे राहाता येणार नाही असे सांगण्यात आले. डॉक्टरांनी डिस्चार्ज कार्ड दिल्यानंतर त्यांना सोडण्याची परवानगी दिली. त्यानंतर रात्री दीड वाजता हा रुग्ण निघून गेला. त्यांना बळजबरीने रुग्णालयातून काढले नाही.