Leading International Marathi News Daily
गुरुवार, ७ मे २००९
(सविस्तर वृत्त)

विद्यार्थ्यांना जूनमध्येच गणवेश पुरविण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश
पिंपरी, ६ मे / प्रतिनिधी

विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात स्वेटर आणि शाळा संपण्याच्या मार्गावर असताना गणवेश देण्याच्या शिक्षण मंडळाच्या विचित्र कार्यपध्दतीची पुरेपूर माहिती असलेल्या पालकमंत्री अजित पवार यांनी यंदा कोणत्याही परिस्थितीत शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीस गणवेश व शैक्षणिक साहित्य

 

देण्याचे आदेश िपपरी पालिकेचे आयुक्त आशिष शर्मा यांना दिले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिक्षण मंडळाच्या विचित्र कारभाराची नियमितपणे बोंब होत असते. गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पाहिजे तेव्हा मिळत नाही, असा गेल्या अनेक वर्षांपासूनचा अनुभव आहे. त्यामुळे पालकवर्गाकडून सातत्याने मंडळाविषयी नाराजी व्यक्त करण्यात येते. ‘टक्केवारीचे राजकारण’ हेच या कारभारामागचे प्रमुख कारण असल्याचे यापूर्वी अनेकदा उघड झाले आहे. यंदाच्या वर्षी हा पायंडा मोडीत काढून विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षांच्या सुरूवातीस म्हणजे जून महिन्यात गणवेश व इतर साहित्य उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न मंडळाकडून करण्यात येत आहे. शिक्षण मंडळाचे सभापती श्रीधर वाल्हेकर आणि प्रशासन अधिकारी हरी भारती यांनी याबाबतचे नियोजन केले आहे. या पाश्र्वभूमीवर, मंडळाचे सभापती वाल्हेकर यांनी याबाबत वैयक्तिक लक्ष घालण्याची विनंती पालकमंत्र्यांकडे केली. त्यानंतर, अजितदादांनी आयुक्त शर्मा यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला. शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांंना गणवेश उपलब्ध करुन द्या, नेहमीप्रमाणे उशीर करुन विद्यार्थ्यांची गैरसोय करु नका, असे आयुक्तांना सांगितल्याचे मंडळातील सूत्रांकडून सांगण्यात आले.