Leading International Marathi News Daily
गुरुवार, ७ मे २००९
(सविस्तर वृत्त)

राजकीय इच्छाशक्ती, नियोजनाद्वारे मंदीला तोंड देऊ शकतो - चंद्रशेखर टिळक
पिंपरी, ६ मे/ प्रतिनिधी

सध्या जगभर ज्या प्रमाणात मंदीची चर्चा सुरू आहे तशा स्वरूपाची मंदी निदान आजतरी आपल्या देशात नाही मात्र राजकीय इच्छाशक्ती व नागरिकांच्या आर्थिक नियोजनाच्या आधारे आपण मंदीच्या झळांना सहज तोंड देऊ शकतो, असे मत जेष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर

 

टिळक यांनी व्यक्त केले.
प्राधिकरण येथील छत्रपती शिवाजी व्याख्यानमालेत ‘जागतिक मंदी आणि आपण’ या विषयावर ते बोलत होते.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे जनता बॅंकेचे अध्यक्ष रवींद्र कर्वे व्यासपीठावर होते.
देशातील मंदींचा आढावा घेताना टिळक पुढे म्हणाले की, आपल्या देशातील अर्थव्यवस्था किंवा त्याची संरचना परिपूर्ण आहे असे नाही; परंतु पिढीजात संस्कार, सामाजिक चालीरीती, गेल्या १८ वर्षांतील प्रगती, आर्थिक धोरणांतील सातत्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर व कर बुडविण्याची हिंमत नसणारे बहुसंख्य नागरिक यांच्या जोरावर आपले आर्थिक सामथ्र्य उभे राहिले आहे. जो पर्यंत या घटकांवर आर्थिक मंदीचा विपरीत परिणाम होत नाही, तो पर्यंत किंवा तसा परिणाम होऊ दिला जाणार नाही अशा राजकीय, सामाजिक आणि आर्थिक उपाययोजना येणाऱ्या काळात धोरण आखणाऱ्यांकडून अपेक्षित आहेत. विशेषत: स्थानिक मागणीचे प्रचंड प्रमाण, लोकसंख्येतील तरुणाईचा वाढता हिस्सा आणि एकंदरीत उत्पन्न कमावण्याच्या मन:स्थितीत असणारी भरीव लोकसंख्या तसेच अनावश्यक खर्च टाळण्यासाठी असणारे सामाजिक वातावरण हे घटक आपल्या देशाला मंदीच्या विपरीत परिणामांपासून वाचवत आलेले आहेत.
जोपर्यंत त्याची निगा राखली जाणार आहे तोवर मंदीच्या विपरीत परिणामांना आळा घालणे आपल्याला शक्य होईल. मात्र त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देणे आवश्यक आहे, तसेच आपल्यासारख्या सामान्य नागरिकांनी याबाबत कायम दक्ष राहणे गरजेचे आहे.
व्याख्यानामालेचे प्रमुख भास्कर रिकामे यांनी पाहुण्याचे स्वागत केले. दीपक नलावडे, जयप्रकाश रांका, सुहास पोकळे, संजय कुलकर्णी आदी मान्यवर व्यासपीठावर होते. रत्नाकर देव यांनी सूत्रसंचालन केले.