Leading International Marathi News Daily
गुरुवार, ७ मे २००९
(सविस्तर वृत्त)

याला जबाबदार कोण?
सध्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. देशभरात वेगवेगळ्या टप्प्यात मतदान होत आहे. एकूण सरासरी लक्षात घेता मतदानाची टक्केवारी खूपच कमी आहे, ही मोठी

 

चिंतेची बाब आहे.
एक म्हणजे मतदार हा मतदानाच्या बाबतीत उदासिन झाला आहे. मतदान केले किंवा नाही केले तरी माझ्या आयुष्यात काय फरक पडणार आहे, असे काहींना वाटते तर उच्चभ्रू मतदारांना मतदान करण्यात स्वारस्थ्य नाही, ते मतदानासाठी बाहेर पडत नाही. ‘मला काय त्याचे’ अशी वृत्ती या मतदारांमध्ये दिसून येते. त्यामुळेही मतदान कमी होते, परंतु मतदारांनी अशी उदासिनता दाखविल्यामुळे आपल्याला नको असलेले उमेदवार त्यांच्या ठराविकच मतदारांच्या जोरावर निवडून येऊ शकतो. त्याला आपणच कारणीभूत असतो, कारण निवडणूकप्रक्रिया थांबत नाही म्हणून मतदाराने आपल्या मतदानाचा अधिकार कर्तव्य म्हणून बजावलाच पाहिजे.
दुसरे कारण सदोष मतदार याद्यांचा परिणाम मतदानावर पडताना दिसतो. मतदारांचे नाव मतदानयादीत नसणे, चुकीचे असणे, पत्त्यामध्ये घोळ असणे, वय चुकवणे असे एक ना अनेक चुका मतदार यादीत असल्यामुळे मतदाराला मतदान करताना अनेक अडचणी येतात. यासाठी मतदारांनी वारंवार दुरुस्तीचे फॉर्म भरूनदेखील पुन्हा पुन्हा चुका होतात. या गोष्टीला जबाबदार कोण? मतदार की प्रशासन?
तिसरी गोष्ट मतदार यादी फुगलेली असते. मृत व्यक्तींची नावे वर्षांनुवर्षे वगळण्याचा प्रयत्न करूनदेखील यादीत तशीच राहतात.
एकाच मतदाराचे नाव मतदार यादीत अनेकवेळा आढळते. मतदानासाठी आवश्यक असलेला पुरावा मतदाराकडे नसतो. नावनोंदणीचा अर्ज भरल्यानंतर मतदारांचे नाव मतदान यादीत येईलच याची खात्री नसते. त्यामुळे इच्छा असूनदेखील अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागते. याचा परिणाम मतदानाची टक्केवारी कमी होण्यावर होतो. स्थानिक पातळीवर जर लोकप्रतिनिधीची व मतदार एकमेकांच्या संपर्कात असतील तर अनेक अडचणी सोडवता येतात व त्या त्या भागातील मतदानाची टक्केवारी ही वाढते. तसेच मतदार यादी ही व्यवस्थित व सक्षम असेल तरच सरकार सक्तीचे मतदान करू शकते, अन्यथा नाही, मतदानाची टक्केवारी वाढली तरच खऱ्या अर्थाने लोकशाहीचे राष्ट्र असेल.
शिवराम मेंगडे, पुणे