Leading International Marathi News Daily
गुरुवार, ७ मे २००९
(सविस्तर वृत्त)

निवडणुकीला राजमान्य व्यवसायाचे विकृत रुप आले
‘उच्चशिक्षितांची उदासीनता हा अधिक चिंतेचा विषय’ उशिरा का होईना राजकारणी मंडळींना जाणवू लागला आहे. हेही नसे थोडके. राजकारण्यांची टय़ूब उशिरा लागते याचेच

 

हे बोलके उदाहरण आहे.
दुर्दैवाने समाजसेवा, प्रबोधन याकडे सोयीस्कररीत्या दिवसेंदिवस दुर्लक्ष होऊन धनदांडग्यांचा, शिक्षणसम्राटांचा, साखरसम्राटांचा निवडणूक हा एक राजमान्य व्यवसाय हे विकृत रूप आले आहे. उमेदवारी देताना इच्छुकांची पॉप्युलॅरिटी हाच निकष लावला जात असतो व राजकीय कार्याकडे लक्ष दिले जात नसावे. वैचारिक अभ्यास, विचार, वास्तव या बाबींकडे काणाडोळा करून केवळ बहुमतास प्राधान्य दिवसेंदिवस दिले जात आहे ही वस्तुस्थिती आहे.
थोडय़ाफार फरकाने तेच ते उमेदवार तीच ती खोटी आश्वासने, थापा, गप्पा व तेच ते धडाडीचे कार्यकर्ते (खरे म्हणजे चमचे व डाव) व प्रत्येकी निवडणुकीच्या वेळी विकासासाठी मी सदनात जाणे इष्ट आहे, हा रीती वर्तमानकाळ झाला आहे. ‘विकासा’चा हा हुकमी एक्का कधीच संपणार नाही, हे खरे.
वैचारिक संघर्ष करण्यापेक्षा आरडाओरडा, कार्यात अडथळे, एकमेकांवर टीका करणे इत्यादी मार्गाचा अवलंब करून कुस्तीचे मैदान किंवा बॉक्सिंगची रिंग असे स्वरूप वृत्तपत्रांतून व दूरदर्शनवरून अनेक प्रसंगी दिसून येते. याचाही सामान्य व्यक्तींवर प्रभाव पडत असावा. प्रसारमाध्यमामुळे या बाबी कायम दिसत असतात. हेही एक उदासीनतेचे कारण आहे.
तरुण वयातील मतदार हा सुद्धा महाग होत असलेल्या शैक्षणिक खर्चाने व रोजगाराची संधी दिवसेंदिवस कमी प्रमाण होत असल्याने कोणीही राज्य करो, आमच्या पुढे मात्र अंधार आहे. ही भावना वाढत असल्याने मतदानापासून दूर गेला आहे.
केवळ मरण येत नाही म्हणून जीवन जगणारा वर्ग हाही हतबल झाला आहे व फार उदासीन आहे. हीसुद्धा एक चिंता निर्माण करणारी बाब आहे.
अगदी कोजागरी पौर्णिमेस मतदान ठेवले, तरी दिवसेंदिवस मतदानाकडे उच्चशिक्षित मतदार अधिकाराचा उपयोग करण्यात रस घेणार नाही. येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण घटून ३० ते ३५ टक्के झाले तरी आश्चर्य वाटणार नाही.
या लोकशाहीस संभाव्य धोका निर्माण करणाऱ्या गोष्टींकडे सर्वच राजकीय पक्षांनी गंभीरपणे पाहून विचार करण्याची वेळ आलेली आहे. आज तरी राजकारण्यांत यावर विचार करण्याची इच्छा आणि पात्रता याचा अभाव आहे, असे दुख:द मनाने म्हणावे लागेल, पण लक्षात कोण घेतो?
हरिभाऊ चितळे, पुणे