Leading International Marathi News Daily

गुरुवार, ७ मे २००९

राज्य

विकासात्मक वाटचालीचा वेध घेण्यासाठी ‘समर्थ नाशिक’ उपक्रम
नाशिक, ६ मे / प्रतिनिधी

नाशिकचा विकास व त्या अनुषंगाने विविध क्षेत्रांच्या असलेल्या अपेक्षा याबाबत समर्थ भारत व्यासपीठतर्फे महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला असून त्याअंतर्गत येत्या सहा महिन्यांच्या कालावधीत ‘समर्थ नाशिक २०२० भाविष्यवेध’ या विषयावर एक अभ्यासपूर्ण खंड तयार करण्यात येत असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

पाण्यासाठी दाही दिशा.. कोकण, रायगड परिसरास पाणीटंचाईचा जबरदस्त तडाखा !
चिपळूण तालुक्यातील अनेक गावांना झळ

चिपळूण, ६ मे/वार्ताहर

सालाबादाप्रमाणे याही वर्षी कोकण व रायगड परिसरात पाणीटंचाईने आपले उग्र स्वरूप धारण केले. निवडणुकांच्या काळात मतदारांच्या पुढे-पुढे करून मतांचा जोगवा मागणारे तमाम नेतेगण आत मात्र एकदम गायब झाले असून सर्वसामान्य जनतेच्या या जीवघेण्या समस्येशी आपल्याला काहीच देणे-घेणे नाही, हेच त्यांच्या वर्तनातून सिद्ध होत आहे. या तीव्र पाणीटंचाईची ही एक अल्पशी सचित्र झलक..

महाड तालुक्यातील २४ गावांना फटका
महाड, ६ मे/वार्ताहर
महाड तालुक्यातील २४ गावांमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. महाड पंचायत समितीने एक गाव आणि चार वाडय़ांना टँकरने पाण्याचा पुरवठा सुरू केला आहे. उर्वरित टंचाईग्रस्त गावांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले असल्याचे पाणीटंचाई विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. राज्य शासनाच्या विशेष निधीतून महाड तालुक्यात नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्या, त्यासाठी कोटय़वधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला.

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांना
लालसर कलिंगडांचे आकर्षण

पेण, ६ मे/वार्ताहर

उष्णतेने कोरड पडलेल्या घशाला थंडावा देण्यासाठी मुंबई- गोवा महामार्गावरील कलिंगड विक्रेत्यांच्या स्टॉल्सवर प्रवाशांची वर्दळ वाढू लागली आहे. तहानेने व्याकूळ झालेल्यांकरिता पेणची कलिंगडे एक दिलासा ठरली आहेत. या स्टॉलवर दोन रुपये काप ते मोठे अख्खे कलिंगड ४० रुपये तर छोटे १५ ते २० रुपये असा दर आहे. कडक उन्हाळ्यात हैराण झालेल्या प्रवाशांना कलिंगडाचा थंडगार, गोड व स्वादिष्ट खुशखुशीत गर म्हणजे निसर्गाने बहाल केलेली देणगीच वाटते.

‘आयात’ उमेदवारावर टीका करणाऱ्या राष्ट्रवादीची पावलेही त्याच दिशेने
अमळनेर, ६ मे / वार्ताहर

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपच्या उमेदवारावर ‘आयात’ मुद्दय़ाचा भडीमार केला होता. मात्र त्याच राष्ट्रवादीने आता अमळनेर विधानसभा निवडणुकीत भाजपतून उमेदवार आयात करण्याची व्यूहनिती रचली आहे. लोकसभेच्या रणांगणातच राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी याबाबीला हिरवा कंदील दर्शविल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेबाबत पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील यांनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे, हे विशेष.

थकीत वीजबिलापैकी ५० लाख जमा केल्यास म्हैसाळ योजनेतून पाणी सोडणार - पतंगराव कदम
सांगली, ६ मे / प्रतिनिधी

टंचाई काळात शेतकऱ्यांना म्हैसाळ प्रकल्पातून पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या योजनेच्या थकीत वीजबिलापैकी ५० लाख रूपये शेतकऱ्यांनी तातडीने वीज वितरण कंपनीकडे जमा केल्यानंतर या योजनेतून प्राधान्याने पाणी सोडण्याचा निर्णय मुंबई येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री तथा महसूलमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी दिली.

खोपोलीतील संतप्त नागरिकांचा न. पा. कार्यालयावर धडक मोर्चा
खोपोली, ६ मे/वार्ताहर

न. पा. प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी पाणीटंचाईने हैराण झालेल्या हाळबुद्रुक परिसरातील सुमारे ३०० बंधू-भगिनींनी आज रिकामे हंडे घेऊन ‘पाणीटंचाई दूर करा, नाहीतर खुच्र्या खाली करा’ अशा घोषणा देत न. पा. कार्यालयावर धडक मोर्चा नेला.

भोसरीत तडीपार गुंडासह दोघांची हत्या
पिंपरी, ६ मे / प्रतिनिधी

भोसरी-मोशी प्राधिकरण येथील पाण्याच्या टाकीजवळ आज सकाळी निर्घृण हत्या करण्यात आलेले दोन मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. यापैकी एक मृतदेह हा तडीपार गुंडाचा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश येळवंडे असे खून झालेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. तर दुसऱ्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. दुसऱ्या मृतदेहाचे वय अंदाजे २३ वर्षे आहे. गणेश येळवंडे यास २८ एप्रिल २००८ रोजी निगडी पोलिसांनी दोन वर्षांकरिता शहरातून तडीपार केले होते. तरीदेखील तो वारंवार तडीपार आदेशाचा भंग करून शहरात घरफोडी, लूटमारीचे प्रकार करीत होता. त्याच्याविरुद्ध तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो भोसरी पीएमटी चौकातील मजूर अड्डय़ावरून केटरिंगच्या कामासाठी मजूर म्हणून जात होता. त्याच्याविरुद्ध निगडी, चाकण, खेड पोलीस ठाण्यांत घरफोडीचे अनेक गुन्हे नोंद आहेत.

हुंडय़ासाठी विवाहितेस दुसऱ्या मजल्यावरून फेकून दिले
नगर, ५ मे/प्रतिनिधी

दीराच्या नोकरीसाठी माहेराहून २ लाख रुपये, तसेच २ तोळे सोने आणावे म्हणून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला घराच्या दुसऱ्या मजल्यावरून फेकण्यात आल्याचा प्रकार भिंगारमध्ये घडला. यात ही विवाहिता गंभीर जखमी झाली. या प्रकरणी पतीला अटक करण्यात आली. मुसर्रत जुबेर शेख असे तिचे नाव आहे. सन २००६मध्ये जुबेरशी तिचा विवाह झाला. विवाहानंतर पैसे व सोने आणावे, यासाठी सासरच्या मंडळींनी तिचा छळ सुरू केला होता. गेल्या ३० एप्रिलला मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास याच कारणावरून मुसर्रतला मारहाण करण्यात आली. सासू ताहेराबी अजीज शेख, नणंद अंजूम अजीज शेख, पती जुबेर यांनी मुसर्रतला मारहाण करीत दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकले.

अक्कलकोट बसस्थानकावर गैरसोयीचे साम्राज्य
अक्कलकोट, ६ मे/वार्ताहर
अक्कलकोट बसस्थानकावर घाणीचे साम्राज्य पसरले असून, पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. स्वामी समर्थ दर्शनासाठी केवळ महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून भक्तजन मोठय़ा संख्येने येतात. मात्र, तीर्थक्षेत्र अक्कलकोट बसस्थानकाची दुर्दशा पाहता त्यांचा अपेक्षाभंग होतो. सर्वत्र कचरा पसरला असून, घाणीचे साम्राज्य आहे. बसस्थानकाच्या मागील बाजूचा परिसर सार्वजनिक शौचालय झाले आहे. अस्वच्छतेमुळे डुकरांच्या झुंडी बसस्थानकावर फिरत असतात. बसस्थानकावर असलेला दवाखाना इतका अस्वच्छ आहे की, त्याकडे जातानासुद्धा डुकरांना ओलांडून जावे लागते. सर्वात महत्त्वाचे प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्याची सोयच नाही. पिण्याच्या पाण्याची टाकी केवळ नावाला आहे. अक्कलकोट मध्यवर्ती धार्मिक क्षेत्र आहे. येथून लांब पल्ल्याच्या गाडय़ादेखील सुटतात. इतके उत्पन्न असतानाही बसस्थानकाच्या स्वच्छतेकडे कुणाचेच लक्ष नाही.

वारणा सहकारी बँकेला ५ कोटी ५९ लाख नफा
पेठवडगाव, ६ मे / वार्ताहर

आर्थिक मंदी, रिझव्‍‌र्ह बँक व सहकार खात्याची वाढती बंधने अशा परिस्थितीत बदलत्या काळाची पावले वेळीच ओळखून संचालक, सभासद व कर्मचारी यांच्या सहकार्यातून नियोजनबध्द कामातून सहकारी क्षेत्रात अग्रणी असलेल्या वारणा सहकारी बँकेने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांत ५५७ कोटी रूपयांचा व्यवसाय केला असून बँकेला ५ कोटी ५९ लाख रूपयांचा ढोबळ तर १ कोटी ६६ लाख रूपयांचा निव्वळ नफा झाला असल्याचे वारणा बँकेचे अध्यक्ष निपुणराव कोरे यांनी सांगितले. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांचा आढावा, कामकाजाचे मूल्यमापन व कौतुक आणि आगामी नियोजन या दृष्टिकोनातून संचालक व कर्मचारी यांचा स्नेहमेळावा वारणानगर येथील वारणा सहकारी बँकेच्या वारणानगर येथील प्रधान कार्यालयात झाला त्यावेळी ते बोलत होते. सवरेत्कृष्ट नागरी सहकारी बँक, उत्कृष्ट वसुली व्यवस्थापन, रिझव्‍‌र्ह बँकेचे ग्रँडवनचे मानांकन असा गौरव झालेल्या वारणा सहकारी बँकेच्या ठेवी ३५१ कोटी ४८ लाख रूपयांच्या घरात असून एन.पी.ए.चे प्रमाण ४०.१५ टक्के व थकबाकीचे प्रमाण ७.५१ टक्के आहे. ८ शाखांचे संगणकीकरण पूर्ण झाले असून उर्वरित काम पूर्ण करून दिवाळीपूर्वी ऑनलाईन सेवा सुरू होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

बिबटय़ाच्या संचाराने शेतकरी त्रस्त
नेवासे, ६ मे/वार्ताहर

तालुक्यात बिबटय़ाच्या संचारामुळे शेतकरी हैराण व भयभीत झाले आहेत. उन्हाळ्याच्या तडाख्याने वाडय़ा-वस्त्यांवर असलेल्या शेतकऱ्यांना मोकळ्या हवेत झोपडीसमोर पटांगणात झोपणे मुश्कील झाले आहे. तालुक्यात देवगाव येथे बिबटय़ाने ५ शेळ्यांवर हल्ला केला. त्यानंतर कौठा येथे ६ शेळ्या मारल्या. आठ दिवसांनंतर माळीचिंचोरा येथे एकाच वेळी १० शेळ्या, तर रस्तापूर येथे दोन शेळ्या फस्त केल्या. सुमारे महिनाभर या गावांमध्ये फिरणाऱ्या बिबटय़ाने आता आपला मुक्काम भानसहिवरा गावाजवळ नागापूर शिवारात हलवला आहे. या ठिकाणी रात्री गोविंद कापसे यांची एक शेळी बिबटय़ाने फस्त केली. बारा तासवीजकपात असल्याने वस्त्यांवर गडद अंधार असतो, तर वीज असलेल्या ठिकाणी वाघाच्या भीतीने शेतकरी झोपू शकत नाहीत. विजेवर आधारित पाणी देण्याच्या वेळीच नेमका बिबटय़ा आला, तर रात्री शेतीला पाणी देता येत नाही.