Leading International Marathi News Daily

गुरुवार, ७ मे २००९

निवडणुकीच्या प्रयोगापायी नाटकांचा खेळखंडोबा!
चंद्रशेखर कुलकर्णी

राजकीय पक्षांच्या उमेदवारांवर नियम, आचार आणि हिशेब अशा अनेक मुद्दय़ांवरून बडगा उगारणाऱ्या निवडणूक यंत्रणेला मात्र मनमानी कारभाराचा परवाना मिळाला आहे काय, असा प्रश्न ठाण्याच्या संदर्भात उपस्थित झाला आहे. निवडणुकीच्या कामाचे प्रशिक्षण देण्यासाठी मनात येईल तेव्हा गडकरी रंगायतन ताब्यात घेण्याच्या निवडणूक यंत्रणेच्या कृतीमुळे नाटकांचे निर्माते आणि सुटीच्या काळात मुलांचे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या शाळांवर हवालदिल होण्याची वेळ आली आहे.

डायघर प्रकल्पाचा पुन्हा कचरा
गावकऱ्यांची लगीनघाई, तर पोलिसांची सबुरी

ठाणे/प्रतिनिधी :
शहरातील घनकचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न गंभीर बनत असतानाच गावकऱ्यांच्या लगीनघाईने, तर पोलिसांच्या सबुरीच्या भूमिकेमुळे डायघर येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पही रखडण्याची लक्षणे दिसू लागली आहेत, मात्र या वेळकाढू भूमिकेमुळे ठाणेकरांचे आरोग्यच धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. शहरात दररोज ६०० मेट्रिक टन घनकचरा तयार होतो. मात्र सुमारे १२०० कोटींचे बजेट असलेल्या ठाणे महापालिकेला स्वत:चे डम्पिंग ग्राऊंडच नाही. त्यामुळे मिळेल त्या जागेवर कचरा टाकून वेळ मारून नेण्याचे काम आजवर पालिका करीत होती.

दिवा-वसई मार्गावरील प्रवाशांना मिळणार परतीची तिकिटे
भगवान मंडलिक डोंबिवली

दिवा-वसई या ग्रामीण भागातून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना ‘परतीची तिकिटे’ (रिटर्न तिकिट) व प्रवासाची ‘कुपन्स’ उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिवा-वसई शटल सव्र्हिस सुरू झाल्यापासून प्रवाशांना परतीच्या प्रवासाची तिकिटे मिळत नव्हती. तसेच, या रेल्वे मार्गावर प्रवाशांना कुपन्सही उपलब्ध करून देण्यात येत नव्हती. डोंबिवली पॅसेंजर्स असोसिएशनचे सरचिटणीस भालचंद्र लोहोकरे, सुधाकर महाजन आदी पदाधिकारी गेल्या चार-पाच वर्षांपासून यासाठी धडपडत होते. या रेल्वे मार्गावर प्रवास करणारे प्रवासी हे नियमित व काही नोकरी, व्यवसायानिमित्त प्रवास करतात.

येऊरमधील सात बंगले जमीनदोस्त
ठाणे/प्रतिनिधी

निवडणुकांची रणधुमाळी संपताच येऊरमधील अनधिकृत बांधकामांविरोधात पालिकेने पुन्हा मोहीम सुरू केली असून, मंगळवारी सात बंगले जमीनदोस्त करण्यात आले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर येऊरमधील अनधिकृत बांधकामांचा विषय पुन्हा एखादा ऐरणीवर आला आहे. मागील सुनावणीदरम्यान अनधिकृत बंगले तोडण्याची कारवाई चालूच ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत ही कारवाई थांबली होती.

ठाणेकरांच्या एका मतासाठी खर्च २२ रुपये !
ठाणे/ प्रतिनिधी

अनेकदा आवाहन करूनही ३० एप्रिलला मतदानासाठी बाहेर पडण्यास मतदारांनी नाराजी दाखवली असली तरी, त्यांच्या एका मतासाठी किमान २२ रुपये खर्च शासकीय यंत्रणेला आलेला आहे. मुंबईत सर्वाधिक ७५ रुपये एका मतासाठी खर्च आला तर, राज्यातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रति मताचा खर्च साधारणत: ५३ रुपयाच्या घरात गेला आहे.
ठाणे जिल्ह्यात लोकसभेच्या ठाणे, कल्याण, भिवंडी व पालघर या चार जागा आहेत.

‘प्रेक्षकांना येणारा राग हीच खलनायकाची भूमिका योग्य झाल्याची पोचपावती’
डोंबिवली/प्रतिनिधी -
भूमिकेतील खलनायकातील कलाकार पाहिल्यानंतर रसिकांना येणारा राग हीच आमच्या कामाची खरी पावती असते. हा राग आम्ही साकारलेली भूमिका किती वास्तववादी आहे हे स्पष्ट होत असते. पण राग येणारा रसिक प्रेक्षक हाच आमचा खरा रोजगार आहे, अशी मते चित्रपट कलाकारांनी येथे काल व्यक्त केली. टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे वसंतोत्सवाचे आयोजन केले आहे. यावेळी ‘ख..खलनायिके’चा या विषयावरील चर्चासत्रात नीलम शिर्के, सई रानडे, सुप्रिया पाठारे सहभागी झाल्या होत्या.

भिवंडीत फिरते वीज बिल भरणा केंद्र सुरू
भिवंडी/वार्ताहर :
अडीच वर्षांपूर्वी टोरॅंट पॉवर कंपनीने राज्य विद्युत मंडळाकडून भिवंडी व परिसराचा वीजपुरवठा वितरणाचा आणि वसुलीचा ठेका घेतला होता. तेव्हापासून या शहराला उज्ज्वल भिवंडी बनविण्याचा निर्धार करीत वीज वितरण वाहिनी सुधारणा व सुधारित कार्यक्षमता यांच्या जोडीला राज्यातील एकंदरीत वीज उपलब्धतेमुळे मागील वर्षांच्या तुलनेत यावर्षी भारनियमन कमी करण्यात यश मिळाले असून, सध्या साडेतीन तासाचे भारनियमन करून भिवंडीकरांची मनेजिंकण्यात टोरंटो कंपनीला यश आले आहे.

नालंदा पब्लिक स्कूलचा वार्षिकोत्सव साजरा
ठाणे/प्रतिनिधी

हरिओमनगर येथील नालंदा पब्लिक स्कूलचा वार्षिक महोत्सव नुकताच गडकरी रंगायतन येथे साजरा झाला. अभिजात शास्त्रीय संगीत, भरतनाटय़म् नृत्य, पाश्चिमात्य संगीतप्रधान नाटय़ आदी सर्वांग सुंदर कला विद्यार्थ्यांनी सादर केल्या. कार्यक्रमाची सुरुवात भगवती स्तवनाने झाली. पाश्चिमात्य संगीत नाटय़ प्रकारांतर्गत चार्ली अॅण्ड दि चॉकलेट फॅक्टरी ही नाटिका सादर झाली. मुलांच्या अभिनयाबरोबरच नाटकासाठी असलेले नेपथ्य सुंदर होते.त्याचप्रमाणे भारतीय शास्त्रीय संगीत व भरतनाटय़म् ‘जल’ संकल्पनेवर आधारित असून, ‘स्वरांजली’ या शाळेच्याच विद्यार्थी समूहाने वर्षां ऋतू वर्णन करणारा राग गौडमल्हार सादर केला. याच संकल्पनेवरील चित्रपटसंगीत प्रधान अशी ११ नृत्ये १४० विद्यार्थ्यांनी सादर केली. कार्यक्रमाचा समारोप पालक-शिक्षक यांच्या समूहाने देशभक्तीपर गीत व पसायदानाने झाला. बहुभाषिक समूहाने पसायदान सादर केले ही एक आनंदमय पर्वणीच होती.

समाजभूषण पुरस्कार
बदलापूर-
शिवभक्त प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील सुमारे विविध ५० समाज संघटनांच्या अध्यक्षांचा समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि आयोजक वामन म्हात्रे यांच्या पुढाकाराने गांधी चौकातील मराठी शाळेच्या पटांगणात माजी जिल्हाप्रमुख मनोहर आंबवणे, अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर, अप्पा धुडे, रघुनाथ पाटील आदींच्या हस्ते समाज अध्यक्षांना स्मृतिचिन्हे देऊन गौरविण्यात आले. वामन म्हात्रे यांनी स्वागत केले. भगवान सोनावळे, रघुनाथ पाटील आदी यावेळी उपस्थित होते. विजय पेटकर यांनी सूत्रसंचालन केले.

बदलापूर, अंबरनाथमध्ये विषय समित्यांची उद्या निवडणूक
बदलापूर/वार्ताहर:
बदलापूर, तसेच अंबरनाथ नगर परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सदस्य आणि सभापतींची निवड शुक्रवारी होणार आहे. अंबरनाथ नगरपालिकेत होणाऱ्या विषय समित्यांच्या निवडणुकीसाठी उल्हासनगरचे उपविभागीय अधिकारी किरण पाणबुडे यांची पीठासीन अधिकारी यांनी नेमणूक केली आहे. उपनगराध्यक्ष, तसेच मागासवर्गीय विभाग समिती वगळता अन्य सर्व विषय समित्यांचे सदस्य, सभापती आणि स्थायी समिती सदस्यांची निवड या निवडणुकीत करण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत मुख्याधिकारी विनोद डवले यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर करावयाचे आहेत. बदलापूर नगर परिषदेच्या विविध विषय समित्या आणि त्यांच्या सभापतींची निवडणूक तहसीलदार ज्ञानेश्वर खुरवड यांच्या अध्यक्षतेखाली होईल. उपनगराध्यक्ष आणि मागासवर्गीय समिती वगळता अन्य सर्व विविध समित्यांचे सदस्य आणि सभापती यांची निवड करण्यात येणार आहेत. मुख्याधिकारी सुदामराव धुपे यांच्याकडे अर्ज सादर करावयाचे आहेत.