Leading International Marathi News Daily

गुरुवार, ७ मे २००९

व्यक्तिवेध

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या सोमवारी लागलेल्या निकालात केरळसह देशस्तरावर पहिले तीन क्रमांक तर मुलींनी पटकावलेच, पण अन्य अनेक राज्यांमध्येही मुलींनी उत्तम यश संपादन करीत आपली स्वतंत्र नाममुद्रा निकालावर उमटवली. नॉयडाची शुभ्रा सक्सेना ही देशस्तरावर पहिली आली तर तिरुअनंतपुरमची टी. मित्रा ही केरळ राज्यात पहिली आली. देशस्तरावर शरणदीप कौर ब्रार दुसऱ्या आणि किरण कौशल तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या, तर केरळ स्तरावर प्रियांका मेरी फ्रान्सिस दुसऱ्या आणि टेल्मा जॉन तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. दहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली टी मित्रा ही केरळमध्ये पहिल्या, प्रियांका ५४ व्या क्रमांकानं तर टेल्मा ७० व्या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्या. यूपीएससीचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी काही काळ प्रियांका इस्रोत शास्त्रज्ञ म्हणून

 

नोकरी करीत होती. शास्त्रज्ञ देशासाठी खूप काही करू शकतात हे खरं असलं तरी ते स्वत:च्याच विश्वात मग्न असतात, त्या विश्वाबाहेर काय घडतंय याची त्यांना फारशी फिकीर नसते, हे मत तिनं अनुभवानं बनवलं होतं. त्यामुळेच तिनं देशाची सेवा करण्याच्या उद्देशानं एप्रिल २००८ मध्ये इस्रोची नोकरी सोडून प्रशासकीय सेवांचं क्षेत्र निवडायचं ठरवलं, तर टेल्मानं हॉस्पिटलात अडकून पाडणारा व्यवसाय सोडायचा ठरवून देशवासियांना थेट भिडणारे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्याचा मार्ग म्हणून प्रशासकीय सेवांचं क्षेत्र जवळ करायचं ठरवलं. तिरुअनंतपुरममधील गव्हर्नमेंट आर्ट्स कॉलेजमधून इंग्रजी साहित्य या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर मित्रानं प्रशासकीय सेवा क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं. यूपीएससीच्या परीक्षेची तयारी सुरू केली. प्रदीर्घ काळ सरकारी नोकरीत असलेले मित्राचे वडील त्रिविक्रम नायर यांनी मित्राला आवश्यक ती पुस्तकं उपलब्ध करून दिली. अभ्यास सुरूही झाला, पण जुलै २००८ मध्ये मित्राच्या आईचं निधन झालं. आईं गेली आणि मित्राचा अभ्यासातला उत्साहच संपला. परीक्षा सोडून द्यायचा निर्णय तिनं मनाशीच केला, पण मोठी बहीण चित्रा नायरनं आणि वडिलांनी तिची समजूत काढली. ‘आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी तरी तू परीक्षा दिलीच पाहिजेस, परीक्षेत मिळणारं यश तू आईला समर्पित करू शकशील’, या शब्दात तिचं धैर्य वाढवलं आणि त्या शब्दांचा योग्य तो परिणाम झाला. मित्रा लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाली, तिला मुलाखतीसाठी बोलावणंही आलं. ३० मार्चला दिल्लीत तिचा इंटरव्ह्यू झाला. सुमारे ३० मिनिटं मुलाखत चालली. अमेरिकेतील मंदी, त्याचे भारतावर होणारे परिणाम, प्रसिद्धीमाध्यमांची भूमिका, देशाच्या विकासात त्यांचं महत्व, महिलांसाठीचं आरक्षण अशा अनेक विषयांवर तिला प्रश्नकर्त्यांना सामोरं जावं लागलं. ती त्यातून यशस्वीपणे पार झाली. ती इंटरव्ह्यूसाठी दिल्लीत गेली त्या दरम्यान दुर्दैवानं तिच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. घरातल्या घरात पडण्याचंच निमित्त झालं होतं, पण वृद्धत्वामुळे प्रकृती गंभीर होऊन अतिदक्षता विभागात दाखल करावे लागलेले त्रिविक्रम नायर प्राणांशी झुंज देत होते. अखेरीस गेल्या पंधरवडय़ातच त्यांचं निधन झालं. सोमवारी यूपीएससीचा निकाल लागला तेव्हा मित्राला झालेला आनंद पहायला ते हयात नव्हते. आपलं यश तू आईला अर्पण कर, असं सांगणाऱ्या वडिलांनाही अखेर ते यश अर्पित करायची वेळ मित्रावर आली! अभिनंदन करायला तिच्या मित्रमैत्रिणी घरी येत होत्या, तेव्हा पेट्टामधील घरात ती एका डोळ्यात आनंद तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू घेऊन वडिलांची क्रियार्कम पुरी करीत होती. मित्राचं यश त्यामुळेच संस्मरणीय ठरावं, प्रेरणादायी वाटावं असं होतं.