Leading International Marathi News Daily

गुरुवार, ७ मे २००९

पार्सल व्यवस्थेतील तांत्रिक अडचणींमुळे नागपूर रेल्वे स्थानकावर पार्सलने पाठवावयाचा माल मोठय़ा प्रमाणात फलाटावर पडून आहे. टोपल्यांमधून पाठवण्यात येणाऱ्या या कोंबडय़ांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे उष्णतेचा दाह आणि दुसरीकडे पोटाची भूक यामुळे अनेक कोंबडय़ांवर यमलोकी जाण्याची पाळी आली आहे.

अदानी उद्योग समूहाची ताडोबाजवळ कोळसा खाण
अभ्यास गटाची पाच महिन्यात बैठकच नाही

चंद्रपूर, ६ मे /प्रतिनिधी

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाजवळ प्रस्तावित कोळसा खाणीमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या हानीचा अभ्यास करण्यासाठी शासनाने पाच महिन्यापूर्वी नेमलेल्या अभ्यास गटाची अद्याप एकही बैठक झाली नाही. गोंदियाजवळ वीज निर्मिती प्रकल्प उभारणाऱ्या अदानी उद्योग समूहाने या प्रकल्पाला लागणारा कोळसा लोहाराच्या जंगलातून काढण्याचे ठरवले आहे. अदानी समूहाची ही प्रस्तावित कोळसा खाण ताडोबाजवळ असल्याने राज्यभरातील लोकप्रतिनिधी व पर्यावरण प्रेमींनी या खाणीला विरोध केला आहे.

प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे बुलढाण्याचे शेतकरी विहिरींपासून वंचित
सोमनाथ सावळे, बुलढाणा, ६ मे

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने जाहीर केलेल्या पंतप्रधान व विशेष पॅकेज अंतर्गत जिल्ह्य़ातील तेरा हजार सिंचन विहिरींचा धडक कार्यक्रम राबवण्यात जिल्हा प्रशासन पूर्णत: अपयशी ठरले असून शेतकरी सिंचन विहिरींपासून वंचित आहेत.
केंद्र व राज्य शासनाच्या पंतप्रधान पॅकेज अंतर्गत विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्य़ांसाठी सिंचन विहिरींचा धडक कार्यक्रम वर्षभरापूर्वी घेषित करण्यात आला. सहा जिल्ह्य़ांतील प्रत्येक तालुक्यासाठी हजार विहिरी असा हा कार्यक्रम आहे.

टपाल मतपत्रिकांच्या घोळाच्या उच्चस्तरीय चौकशीची अडसुळांची मागणी
अमरावती, ६ मे / प्रतिनिधी
अमरावती लोकसभा मतदार संघातील सुमारे ११ हजार कर्मचाऱ्यांना टपाल मतपत्रिका वेळेवर न पोहोचल्याने ते मतदानापासून वंचित राहिले, या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जावी आणि जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी खासदार व शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. अमरावती जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षणाच्या कालावधीदरम्यान निवडणूक केंद्रांवर दोन प्रतींमध्ये आवेदनपत्र व टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याविषयीचा अर्ज (१२ अ) पाठविण्यात आला होता.

गोंदियात कामगार दिन, आमगावात मिरवणूक
गोंदिया, ६ मे / वार्ताहर

जनशिक्षण व ऑल इंडिया ट्रेड युनियनच्यावतीने स्थानिक राजलक्ष्मी चौकात जागतिक कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामचंद्र पाटील होते. बाळासाहेब मोघे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून मिलिंद गणवीर, पी.के. घोषाल, कामगार नेते डॉ. सुरज पाल, भालिराम बावनथडे, शालू भोयर उपस्थित होते. याप्रसंगी मजुरांचे प्रश्न शासनाने सोडवावे व कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी शहीद कामगारांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

वडनेर केंद्रीय प्राथमिक शाळा नागपूर विभागात प्रथम
वडनेर, ६ मे / वार्ताहर

सर्वागीण शालेय गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथील केंद्रीय प्राथमिक शाळेने नागपूर विभागातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
राज्यशासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात सन २००७-०८ साठी नागपूर विभागातून वडनेर येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेची १०० टक्के गुणवत्ता विकास वाढीसाठी उपक्रम लक्षात घेता निवड करण्यात आली. सोमवारी नागपूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात शिक्षण उपसंचालक गोविंद नांदेडे यांच्या हस्ते वध्र्याचे शिक्षणाधिकारी विश्वास पांडे, हिंगणघाट पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी धनराज तेलंग यांच्या उपस्थितीत वडनेर शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश देशमुख यांना प्रशस्तीपत्र, ढाल प्रदान करून गौरविण्यात आले. या शाळेच्या गुणवत्ता पूर्ण दर्जा वाढविण्यासाठी मुख्याध्यापक प्रकाश देशमुख, सहकारी शिक्षक रवींद्र आगलावे, अनंत नागोसे, मीना बोकडे, सविता सहारे, योगीता झोटींग यांनी परिश्रम घेतले.

सेंट झेवियर्स विद्यालयात शपथग्रहण सोहोळा
गोंदिया, ६ मे / वार्ताहर

येथील सेंट झेवियर्स विद्यालयात नवीन शैक्षणिक सत्र २००९-१० चा शपथग्रहण सोहोळा नुकताच मोठय़ा थाटात पार पडला. याप्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात पवित्र बायबल वाचनाने करण्यात आली. सदृढ आरोग्यासाठी विशेष प्रार्थना यावेळी घेण्यात आली. प्रार्थना गीताने संपूर्ण वातावरण प्रसन्न व चैतन्यमय झाले. प्रमुख पाहुणे म्हणून सहायक पोलीस निरीक्षक महेश चिमटे, गोंदिया गृहरक्षक पथकाचे समोदशक अधिकारी उमेंद्र भेलावे उपस्थित होते. पाहुण्यांचे भेटकार्ड व रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी नवीन समिती सदस्यांनी शपथग्रहण केली. या सदस्यांना मुख्याध्यापिका नीती लाखट यांनी आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडावी, तसेच भविष्यात योग्य निर्णय घेऊन देशाचे चांगले नागरिक बनण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाची सांगता शालेय गीत व राष्ट्रगीताने करण्यात आली.

चंद्रपूर जिल्हा बुद्धिबळ स्पर्धेला प्रतिसाद
चंद्रपूर, ६ मे / प्रतिनिधी

सरदार पटेल क्रीडा प्रबोधिनींतर्गत राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे उद्घाटन छोटुभाई पटेल सभागृहात झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य व सरदार पटेल स्पोर्टस् अकादमीचे सचिव डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित तर प्रमुख पाहुणे म्हणून मोहन गोडबोले व दत्तात्रय वैद्य उपस्थित होते. प्राचार्य डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित यांनी मनोगत व्यक्त करताना सर्व सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. उत्कृष्ट खेळाडूंसाठी सरदार पटेल प्रबोधिनी सर्व प्रकारे मदत देऊन खेळाडूंना स्तर उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही दिली. मुख्य पंच मोहन गोडबोले यांनी सर्व खेळाडूंना स्पध्रेचे नियम समजावून देत स्पध्रेमध्ये संपूर्ण कौशल्य वापरून सुंदर खेळ करण्याचे आवाहन केले. स्पध्रेत १६ वर्षांखालील व २५ वर्षांखालील २५ स्पर्धकांचा सहभाग लाभला असून स्पध्रेत अवघ्या ५ वर्षांचा शंतनू देशमुख स्पध्रेचे आकर्षण आहे. या कार्यक्रमाचे संचालन शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. टी. एफ. गुल्हाने यांनी केले. कार्यक्रमासाठी संजय दैवलकर, संजय फुलझेले, सूर्यकांत बुरडकर, हरीष इंदूरकर यांनी सहकार्य केले.

शिंगोरीत श्री गुरुदेव सर्वागीण सुसंस्कार शिबीर
वरुड, ६ मे / वार्ताहर

शिंगोरी येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत निवासी श्रीगुरुदेव सर्वागीण सुसंस्कार शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती पुरुषोत्तम कापसे गुरुजी यांनी दिली. हे शिबीर १७ मे पर्यंत चालणार आहे. या सुसंस्कार शिबिरात सहभागी होण्यासाठी (९४०३११५६८) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन के.डी. वैद्य, आर.एस. चोरोडे, राजेंद्र काळमेघ यांनी केले आहे. व्यक्तिमत्त्व विकास छंद जागृत विद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व व्यक्तिमत्त्व विकास छंद शिबीर नुकतेच पार पडले. विद्यार्थ्यांचे संभाषण कला व वक्तृत्व कला विकसित व्हावे म्हणून विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चासत्र घेण्यात आली. इंग्रजी स्पिकींग, स्पर्धा परीक्षांची तयारी व अभ्यासक्रमांची ओळख करून देण्यात आली.

वाहतूक शाखेच्या महिला शिपायाला मारहाण
भंडारा, ६ मे / वार्ताहर

येथील शीतला माता मंदिर परिसरात वाहतूक नियंत्रण शाखेच्या महिला पोलीस शिपाई योगीता जांगळे यांना मिनिडोअर चालकाने मारहाण केली. विजय देवानंद मेहर (२३) हा मिनिडोअर (एमएच३६/१६५७)मध्ये अवैध प्रवासी घेऊन जात असता योगीता जांगळे यांनी मिनिडोअर थांबविण्याची सूचना केली; परंतु त्याने दुर्लक्ष करून मिनिडोअर दामटली. जांगळे यांनी पाठलाग करून मिनिडोअर थांबविली आणि कायदेशीर कारवाई सुरू केली. यामुळे चिडून विजय मेहरने त्यांच्या चेहऱ्यावर ठोसा लगावला. जांगळे यांच्या तक्रारीवरून, शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या गुन्ह्य़ाखाली विजय मेहर यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पुढील तपास पोलीस हवालदार मदन चौरागडे करीत आहेत.

जागृती अभियानांतर्गत रस्त्यांची सफाई
कारंजा-लाड, ६ मे / वार्ताहर

प्रेस क्लबच्यावतीने कर्तव्य जागृती अभियान राबवण्यात आले. रस्त्यावरील दगडांमुळे अपघात झाल्यामुळे रस्त्यावरील दगड व कचरा हटवण्याचे अभियान सुरू करण्यात आले.
बसस्थानक रस्त्यावरील टी-पॉईंट जवळील दगड उचलून रस्ता साफ करण्यात आला. ज्येष्ठ कलावंत शिवमंगल राऊत यांनी संत गाडगेबाबांची वेशभूषा केली होती. बस स्थानकावरील प्रवेश रस्त्याची सफाई करून अभियानाची सांगता करण्यात आली.
यावेळी पत्रकार गोपाल भोयर, सुधीर देशपांडे, डॉ, सुभाष गढीकर, श्याम सवाई, संतोष वैद्य, हमीद शेख, विजय गागरे, दिगंबर सोनोने, ज्ञानेश्वर खंडारे, संदीप सुपनर, देवेंद्र राऊत, आरिफ पोपटे, विलास खपली, गजानन भवाने, सागर अंभोरे, राजू श्यामसुंदर, दीपक वाघमारे, मो. शारिक मो. कासम, विजय निघोट, देहुल वासनिक पवन लाहे, मंगेश राऊत, प्रफुल्ल बाणगावकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन ज्ञानेश्वर खंडारे यांनी केले. हमीद शेख यांनी प्रास्ताविक केले. संतोष वैद्य यांनी आभार मानले.

कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे प्रशिक्षण
वाशीम, ६ मे / वार्ताहर

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण २१ मे ३० दरम्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशन (विज्युक्टा)चे सरचिटणीस प्रा. साहेबराव मांजरे यांनी पत्रकाद्वारे दिली.
मराठी विषयाचे प्रशिक्षण अमरावती येथील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, इंग्रजी विषयाचे प्रशिक्षण नागपूर येथील धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये, इतिहास विषयाचे प्रशिक्षण अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रशिक्षण मंडळाच्या रामकृष्ण क्रीडा विद्यालयामध्ये, गणित विषयाचे प्रशिक्षण पुणे येथील जिल्हा शिक्षण मंडळाचे म्हाळसाकांत कनिष्ठ महाविद्यालयामध्ये, भौतिकशास्त्र विषयाचे प्रशिक्षण औरंगाबाद येथे तर रसायनशास्त्र विषयाचे बीड येथे आयोजन करण्यात आले आहे. वेगवेगळ्या विषय शिक्षकांचे प्रशिक्षण संबंधित प्रशिक्षण केंद्रावर होणार आहे. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या प्राध्यापकांनी आपल्या केंद्राविषयी आपल्या विज्युक्टा जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधावा, असे आवाहनही प्रा. मांजरे यांनी केले आहे.

पर्यावरण परीक्षेत ‘सेन्ट जॉन’ला यश
पुलगाव, ६ मे / वार्ताहर

पर्यावरणाचा समतोल राखून वसुंधरेला वाचवण्याचे प्रयत्न सर्वच स्तरावर केले जात आहे. अशाच प्रयत्नाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांच्या मनात वसुंधरेविषयी व तिच्यावर मानवातर्फे करण्यात येणाऱ्या अत्याचाराविषयी तळमळ निर्माण व्हावी, या हेतूने जीम ‘कॉरबेट’ या संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या अखिल भारतीय पर्यावरण परीक्षेत स्थानिक सेन्ट जॉन हायस्कूलने घवघवीत यश संपादन केले व विद्यालयाला सुवर्णपदक मिळवून दिले.
विद्यालयाचा वर्ग ९ चा विद्यार्थी प्रशिक गवई हा गट क मधून अ.भा. पातळीवर प्रथम आला व सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. शंभर टक्के निकाल देणारी संस्था म्हणून प्राचार्य शैलजा सुदामे व कुरझडकर यांना रजतपदक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
अ गटात अम्मार खान प्रथम, द्वितीय साक्षी बदनोरे, शार्दुल गावंडे, अनुज हनमंते, ब गटात प्रथम अमर चव्हाण, शक्ती तिवारी, द्वितीय अनुजा ढोमणे, शिवम जुनेजा, पलाश श्रावक, प्राजक्ता मेश्राम, क गटात प्रथम प्रशिक गवई, द्वितीय दिव्या बैस ठरले.

येरणगावात योजनेचे काम अपूर्ण
वडनेर, ६ मे / वार्ताहर

पाणी टंचाई निवारणार्थ गेल्या पाच वर्षांपूर्वी मंजूर झालेले ‘स्वजलधारा’ योजनेचे काम अद्यापही पूर्ण न झाल्याने येरणगावात पाण्यासाठी संघर्ष उभा ठाकला आहे.
िहगणघाट तालुक्यात येणाऱ्या येरणगाव ही ३१० घरांची वस्ती आहे. या गावात चार सार्वजनिक विहिरी, पाच हातपंप आहे; परंतु अल्प पावसामुळे काही विहिरी आणि हातपंप कोरडे पडले आहे. गावात इतरत्र पाण्याचे स्रोत नसल्याने गावकऱ्यांना लांब शेतावरून बैलबंडीने पाणी आणावे लागत आहे. अशातच गेल्या पाच वर्षांपूर्वी ‘स्वजलधारा’ योजनेंतर्गत मंजूर झालेले पाणीपुरवठय़ाचे काम आजपावेतो पूर्ण झाले नाही. सन २००४-०५ मध्ये येरणगाव येथील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता ९ लक्ष रुपये किमतीची प्रस्तावित पाण्याची टाकी, गावात नळाद्वारे पाणी पुरवठय़ासाठी जलवाहिनीचे काम मंजूर झाले. गेल्या वर्षांपर्यंत कंत्राटदारामार्फत केलेले हे काम अपूर्ण आहे.