Leading International Marathi News Daily

गुरुवार, ७ मे २००९

विशेष लेख

झळा ज्या लागल्या..

महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर गेल्या आठवडय़ात उष्णतेची लाट पसरली. या वाढलेल्या उकाडय़ाचा ग्लोबल वॉर्मिगशी संबंध आहे का? की उगाचच सर्व ठिकाणी या ग्लोबल वॉर्मिगचा संबंध जोडला जात आहे?..
देशाच्या बहुतांश भागात गेल्या आठवडय़ात उष्णतेची लाट पसरली होती. त्यातही मुख्यत: विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात उन्हाळ्याने भयंकर अवतार धारण केला होता. तिकडे राजस्थानात जोधपूर, जयपुरात तापमान ४४-४५ अंश सेल्सिअसच्या आसपास कायम असताना अकोला, नागपूरमध्ये पारा ४७ अंशांपर्यंत चढला होता! कमीअधिक फरकाने जळगाव आणि मालेगावातही हीच स्थिती होती. नागपूर येथे महाराष्ट्रदिनी या हंगामातील उच्चांकी तापमान (४७.४ अंश सेल्सिअस) नोंदवले गेले. त्या भागात असा जीवघेणा उकाडा असतानाच महाराष्ट्राच्या इतर भागातही तापमानात मोठी वाढ झाली होती. उकाडय़ाचा हा आलेख सलग आठ-दहा दिवस वाढताच राहिल्याने अस्वस्थता वाढत गेली. आता त्यात किंचित घट झाल्याने काहीसा दिलासा मिळण्याजोगी परिस्थिती आहे.
तापमानात अशा प्रकारे वाढ झाली की चर्चा सुरू होते ती या वर्षी उकाडा जास्त दाहक

 

असल्याची आणि अर्थातच या सर्व घटनांच्या पाठीमागे ग्लोबल वॉर्मिग (जागतिक तापमानवाढ) हेच प्रमुख कारण असल्याची! (एखाद्या वर्षी थोडा जास्त पाऊस पडला किंवा थंडीचा कडाका वाढला, तरीसुद्धा अशीच चर्चा सुरू होते. पण त्या-त्या ऋतूचा कडाका ओसरला की मग या चर्चेचा ज्वरही उतरतो.) याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जातात आणि त्यासाठी वाढलेल्या उकाडय़ाचा दाखला दिला जातो. पण असे करताना सर्वानाच इतिहासाचा विसर पडतो; इतका की गेल्या पाच-दहा वर्षांतही असे घडले होते, हे विचारातच घेतले जात नाही. म्हणूनच सगळी फसगत होते आणि याबाबतची चर्चा ही केवळ ‘गप्पां’च्या पातळीवरच राहते.
वाढलेला उकाडा हा ग्लोबल वॉर्मिगचा परिणाम आहे, असे विधान करण्यासाठी त्याला ठाम आधार असायला हवा. हा आधार म्हणजे अर्थातच वेळोवेळी नोंदवली गेलेली आकडेवारी! त्यात सातत्याने वाढ होत असेल आणि अलीकडच्या काळात महाराष्ट्रात ठिकठिकाणी तापमानाचे उच्चांक नोंदवले गेले असतील तर ही बाब सत्य मानावी लागेल. अन्यथा तसे विधान करणे धाडसी ठरेल. ग्लोबल वॉर्मिग ही हळूहळू घडत आलेली क्रिया असली तरी त्याचे परिणाम मुख्यत: १९७०-८० च्या दशकापासून जाणवू लागले आहेत. त्यामुळे १९८० सालानंतर महाराष्ट्रातील जास्तीत जास्त भागातील तापमानात वाढ झालेली दिसायला हवी. आकडेवारीवर नजर टाकली की याबाबतची वस्तुस्थिती समजेल.
मुंबईच्या हवामानाबाबत कुलाब्यात १९व्या शतकापासूनच्या नोंदी उपलब्ध आहेत. सांताक्रुझ येथे मात्र १९५० सालापासूनच्या नोंदी आहेत. सांताक्रुझला आतापर्यंत ४२.२ अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. हा आकडा गेल्या २५-३० वर्षांतील नाही, तर १९५२ सालचा आहे. हीच बाब इतर काही शहरांच्या तापमानाबाबत दिसते. पुण्यात पाऱ्याने ४३.३ अंशांपर्यंत मजल मारली आहे. पुण्यातील ही उच्चांकी नोंद दोनदा नोंदवली गेली. ते दोन्ही दिवस होते १९ व्या शतकातील- ३० एप्रिल १८९७ आणि ७ मे १८८९. नाशिक शहरातही १९६० साली ४२.४ अंशांचा उच्चांक नोंदवला गेला आहे. (नाशिकमधील ओझर येथे मात्र २००२ साली तापमान ४३.९ अंशांवर पोहोचले होते.) विदर्भात जिथे राज्यात सर्वाधिक उकाडा असतो त्या नागपूर व अकोला येथेसुद्धा आतापर्यंतचे उच्चांकी तापमान ४७.८ अंशांपर्यंत गेले होते. नागपूर येथे ही नोंद १९५४ साली, तर अकोला येथे १९४७ साली झाली आहे. मराठवाडय़ातही औरंगाबाद येथे पारा ४५.६ अंशांपर्यंत चढला होता. तो दिवस होता २५ मे १९०५. यापैकी जवळजवळ सर्वच उच्चांकी नोंदी किमान ५० वर्षांपूर्वी नोंदविल्या गेल्या आहेत.
या शहरांच्या व्यतिरिक्त विदर्भात अमरावती, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, महाबळेश्वर, मराठवाडय़ात परभणी, नांदेड या ठिकाणी मात्र सर्वोच्च नोंद अलीकडच्या ३०-४० वर्षांमध्ये झालेली आहे. अमरावती येथे ६ मे १९८८ रोजी सर्वाधिक ४८.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याच वर्षी परभणी येथे ४६.५ अंश आणि सोलापूर येथे ४६ अंशांचा उच्चांक नोंदवला गेला. नांदेड येथे तर १९९५ साली ४६.७ अंश सेल्सिअस या उच्चांकी तापमानाची नोंद झाली.
महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी पाऱ्याने आतापर्यंतची सर्वाधिक ३७.६ अंशांची पातळी गाठली. तो दिवस होता- २१ एप्रिल १९७६. कोकणात रत्नागिरी येथेसुद्धा तेथील सर्वोच्च ४०.६ अंशांचे तापमान १९८२ साली नोंदवले गेले.. अशा प्रकारे सर्व नोंदींचा एकत्रित विचार केला तर राज्यात कमाल तापमानात वाढ होत असल्याचा कल दिसून येत नाही. उलट गेल्या ४० वर्षांमध्ये ज्या ठिकाणी उच्चांकी तापमान नोंदवले गेले आहे, अशा शहरांमध्ये तापमान मोजण्याची सुरुवातच मुळी अलीकडच्या काळात झाली आहे. त्यामुळे तिथे ८० वर्षांपूर्वी किंवा १०० वर्षांपूर्वी तापमान किती होते याची माहितीच उपलब्ध नाही. म्हणूनच या ठिकाणीसुद्धा अलीकडच्या काळात तापमानात वाढ झाली आहे, असे ठामपणे म्हणता येणार नाही. कारण या म्हणण्याला हवामानाची आकडेवारी पुष्टी देत नाही.
आकडे असे बोलत असतील तर मग या वर्षी जाणवलेल्या उकाडय़ाचा ग्लोबल वॉर्मिगशी संबंध कसा जोडता येईल? पण ग्लोबल वॉर्मिगचा भारतातील हवामानावर काहीच परिणाम झालेला नाही, हेसुद्धा खरं नाही. हवामानशास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढल्याने मुख्यत: रात्रीच्या तापमानात वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. गेल्या शंभर-सव्वाशे वर्षांमध्ये जागतिक तापमानवाढ ही सुमारे ०.७४ अंश इतकी झालेली आहे. त्या तुलनेत भारतात ०.३४ अंश इतके तापमान वाढले आहे. मात्र, गेल्या तीस-पस्तीस वर्षांमध्ये हा तापमानवाढीचा वेग वाढला आहे. त्याचा भारताच्या व महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम होणारच. पण प्रत्येक गोष्टीत त्याचा संबंध येईलच असे नाही. ग्लोबल वॉर्मिग म्हणजे सर्वच भागात तापमान वाढत राहणार किंवा प्रत्येक उष्ण उन्हाळ्यामागे हे कारण चिकटविणे, हा वस्तुस्थितीचा विपर्यास आहे. आपल्या भागात शंभर वर्षांपूर्वीसुद्धा उन्हाळा कमी-अधिक प्रमाणात आजसारखाच होता. फरक इतकाच की त्या काळातील परिसर आणि आताचा परिसर यात मोठा बदल झाल्यामुळे उन्हाच्या झळा आज जास्त त्रस्त करत आहेत. पूर्वीचा झाडोरा, घरांसाठी वापरण्यात येणारे गवत-माती-लाकूड-दगड अशा गोष्टी, त्या वेळची उपलब्ध नैसर्गिक संपत्ती, त्या काळातील निसर्गाची बऱ्यापैकी असलेली स्थिती या सर्वच गोष्टी आज आमूलाग्र बदलल्या आहेत. शिवाय त्यावेळी एकूणच नैसर्गिक आपत्ती झेलण्याची माणसाची सहनशीलता आणि आताचे बऱ्यापैकी आरामदायी बनलेले जीवन या गोष्टींचा परिणाम आज जाणवणारच. आज उकाडा जाणवतो आहे तो या बदलांमुळे, तापमानात मोठी वाढ झाल्यामुळे नव्हे!
अभिजित घोरपडे
abhighorpade@rediffmail.comX
या लेखात संदर्भ म्हणून वापरण्यात आलेली आकडेवारी भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अधिकृत नोंदीवर आधारित आहे. या नोंदी शास्त्रीय पद्धतीने घेतल्या जातात. त्यात त्रुटी राहू नयेत म्हणून त्यांची छाननी केली जाते.