Leading International Marathi News Daily

गुरुवार, ७ मे २००९

विविध

‘प्रेक्षकांना चित्रपट न पाहण्याचे स्वातंत्र्य आहेच की’
‘एंजल्स अँड डेमॉन्स’च्या दिग्दर्शकाचा टोला

नवी दिल्ली, ६ मे/पीटीआय

आपल्या चित्रपटाबद्दल उठलेले वादंग हे निराधार आणि निर्थक आहेत, असा दावा करीत, जर हा चित्रपट अवमानकारक वाटत असेल तर तो न पाहण्याचा अधिकार प्रेक्षकांनी बजावावा की पण त्यावर बंदीची भाषा कशाला, असा जोरदार टोला ‘एंजल्स अँड डेमॉन्स’चे दिग्दर्शक रॉन हॉवर्ड यांनी आज लगावला. लॉस एंजेलिसहून या वृत्तसंस्थेला ईमेलद्वारे दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली बाजू मांडली.

तंबाखू उत्पादनांवर प्रतिबंधात्मक इशारा ठळक छापण्याबाबत ३१ मे पासून सक्ती
नवी दिल्ली, ६ मे/पी.टी.आय.

सिगारेट व अन्य तंबाखू उत्पादनांवर सचित्र वैधानिक इशारा छापण्यासंबंधीच्या नियमाची येत्या ३१ मेपासून अंमलबजावणी करण्यात येईल, अशी हमी केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयास दिली. या प्रकारचा इशारा छापण्याची सक्ती यापूर्वीच लागू करण्यात आली असली तरी तंबाखू उद्योगाच्या दबावापुढे झुकून केंद्र सरकार याप्रकरणी गुळमुळीत भूमिका स्वीकारत असल्याची टीका काही संघटनांकडून करण्यात येत होती. त्या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त महाभिवक्ता गोपाल सुब्रमण्यम यांनी न्यायालयास हे हमीपत्र सादर केले. सिगारेट व अन्य उत्पादने आरोग्यास घातक असल्याचा सचित्र इशारा संबंधित उत्पादनाच्या वेष्टणाच्या चाळीस टक्के एवढय़ा भागात प्रसिद्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकांनंतर भारताशी नव्याने चर्चा करण्यास पाक उत्सुक
वॉशिंग्टन, ६ मे/पीटीआय

भारतातील लोकसभा निवडणुकांनंतर तेथे सत्तेत येणाऱ्या सरकारशी नव्याने चर्चा करण्याचा पाकिस्तानचा विचार आहे. आम्हाला भारताशी सलोख्याचे संबंध हवे आहेत असे पाकिस्तानचे अध्यक्ष असीफ अली झरदारी यांनी सांगितले.

अमेरिकेतील स्वाइन फ्लूग्रस्तांची संख्या ४०३
वॉशिंग्टन, ६ मे/पीटीआय

अमेरिकेतील स्वाइन फ्लूग्रस्तांची संख्या काल एका दिवसात २८६ वरून ४०३ वर गेली असून एकाचा अंतही ओढवला आहे. राष्ट्रीय रोगनियंत्रण व प्रतिबंधक केंद्राने ही आकडेवारी जाहीर केली आहे. जॉर्जिया आणि मेन या दोन राज्यांतही प्रत्येकी एक रुग्ण आढळल्याने अमेरिकेतील स्वाइन फ्लूग्रस्त राज्यांची संख्या ३८ झाली आहे. या फ्लूग्रस्तांचे सर्वाधिक प्रमाण न्यूयॉर्कमध्ये असून तेथे ही संख्या ९० झाली आहे.

श्रीलंका लष्कराच्या धडक कारवाईस रशियाचा पाठिंबा
कोलम्बो, ६ मे/पीटीआय

श्रीलंका लष्कराकडून ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ ईलम’ या दहशतवादी संघटनेला नेस्तनाबूत करण्यासाठी सुरू असलेल्या धडक मोहीमेला रशियाने पाठिंबा दिला आहे तसेच या कारवाईत सर्वसामान्य नागरिक भरडला जाऊ नये यासाठीही केल्या जात असलेल्या उपायांबाबत समाधान व्यक्त केले आहे.

तालिबान्यांविरोधात पाक लष्कराची खतरनाक मोहीम, ६४ अतिरेकी ठार
इस्लामाबाद, ६ मे/पी.टी.आय.

तालिबानी दहशतवाद्यांच्या हाती गेलेला स्वात खोऱ्याचा परिसर पुन्हा ताब्यात घेण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराने मोठे युध्द छेडले असून खोऱ्यामधील अनेक शहरांवर तसेच तालिबानींच्या तळांवर लष्कराने रणगाडे तसेच हेलिकॉप्टर्सच्या सहाय्याने गोळ्यांचा वर्षांव केला. स्वात खोऱ्यातील मिंगोरा या सर्वात मोठय़ा शहरामधून भयभीत नागरिकांनी जिवाच्या आकांताने सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. लष्कराने आतार्पयंत ६४ तालिबानी दहशतवाद्यांना ठार केले आहे.

ओबामा, झरदारी, करझाई यांच्यात
इस्लामी दहशतवादाबाबत चर्चा
वॉशिंग्टन, ६ मे/पीटीआय

वाढत्या इस्लामी दहशतवादाबाबत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे बुधवारी पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी आणि अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई यांच्याशी ‘व्हाइट हाऊस’मध्ये चर्चा करणार आहेत. या दोन देशांना वाढत्या इस्लामी दहशतवादाने ग्रासले असून तेथील लोकशाही सरकारांना अमेरिका भक्कम पाठबळ देत असल्याचे सरकारी प्रवक्त्याने सांगितले.

बंगळुरूमध्ये दोन शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
बंगळुरू, ६ मे/पीटीआय

बंगळुरू विकास प्राधिकरणाने संपादित केलेल्या जमिनींपोटी अधिक भरपाई द्यावी या मागणीसाठी निदर्शने करणाऱ्यांपैकी दोन शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.
बंगळुरूच्या ईशान्य विभागाचे पोलीस उपायुक्त बसवराज मलगट्टी यांनी सांगितले की, दोन शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा केलेला प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. बंगळुरू विकास प्राधिकरणाने संपादित केलेल्या शेतजमिनीपैकी काही भाग मेट्रोपोलिटन हाऊसिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटीला दिला आहे. ही खासगी संस्था असून त्यात आयपीएस व आयएएस अधिकाऱ्यांसाठी घरे बांधली जाणार आहेत. या निर्णयाविरोधात तसेच अधिक भरपाई मिळावी या मागणीसाठी सुमारे २०० शेतकऱ्यांनी निदर्शने केली. संपादित जमिनीपोटी बंगळुरू विकास प्राधिकरणाने याआधीच प्रत्येक शेतकऱ्याला १० लाख रुपये भरपाई दिली आहे. मात्र त्यापेक्षा अधिक रक्कम मिळायला हवी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

जागतिक आरोग्यासाठी अमेरिकेची ६३ अब्ज डॉलर्सची योजना
वॉशिंग्टन, ६ मे/पीटीआय

जागतिक पातळीवर अनारोग्य व रोगराईशी लढा देण्यासाठी ओबामा प्रशासनाने ६३ अब्ज डॉलरची सहा वर्षांची योजना आखली आहे. परराष्ट्र उपमंत्री जॅक ल्यु यांनी अध्यक्षीय प्रासादातील पत्रकार परिषदेत आज ही घोषणा केली. आरोग्यविषयक जागतिक कार्यक्रमासाठी आणि विशेषत: एड्स नियंत्रणासाठी माजी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी घेतलेल्या पुढाकाराचाही ल्यु यांनी विशेष उल्लेख केला. या योजनेला अमेरिकन प्रतिनिधीगृहाची मंजुरी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ओरिसात उष्माघातातील मृतांची संख्या १००
नवी दिल्ली, ६ मे/वृत्तसंस्था

उष्णतेच्या लाटेने उत्तर भारत तापला असून ओरिसात आणखी सहाजण उष्माघाताने दगावल्याने तेथील मृतांची संख्या १०० च्या वर गेली आहे. अर्थात राज्य प्रशासनाने मात्र यातील केवळ २४ मृत्यू उष्माघाताने ओढवल्याचा दावा केला आहे. राज्यातील ३० पैकी १२ जिल्ह्यांतील तापमान ४० अंश सेल्सियसच्या पुढे गेले होते तर संबलपूर आणि तेल्चर येथे ४५ अंश सेल्सियस एवढे तापमान नोंदले गेले. उत्तर प्रदेशात वाराणसी येथे सर्वाधिक म्हणजे ४३.२ अंश सेल्सियस एवढे तापमान नोंदले गेले.

पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये दरडी कोसळून २८ ठार
इस्लामाबाद, ६ मे/पी.टी.आय.

पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील नीलम घाटी भागातील गेहाल खेडय़ाजवळ दरडी कोसळून किमान २८ जण ठार झाल्याचे स्थानिक रहिवाशांनी आज सांगितले. ढिगाऱ्यांखाली अडकलेल्यांना वाचविण्याचे व मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून खराब हवामानामुळे या कामात अडथळे येत आहेत, असे प्रशासनाने सांगितले. या दुर्घटनेतील मृतांची संख्या यापेक्षा अधिक वाढण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

मतदान केंद्रावर हल्ल्याचा प्रयत्न
श्रीनगर, ६मे/पी.टी.आय.

निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात काश्मीरमध्ये उद्या मतदान होत असताना अतिरेक्यांनी मतदान केंद्रावर हल्ला करून गोंधळ माजविण्याचा प्रयत्न केला. परंतु सुरक्षादलांच्या जागरूकपणामुळे तो असफल ठरला.