Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ८ मे २००९

चेन्नईच सुपरकिंग
प्रिटोरिया, ७ मे/ वृत्तसंस्था
राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जने गुरुवारी इंडियन प्रीमियर लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत आपले शानदार विजय नोंदविले. मॅथ्यू हेडन आणि कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या स्फोटकी अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नईने पंजाब किंग्स इलेव्हनविरुद्ध १२ धावांनी सामना जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकाविले. त्या आधीच्या लढतीत राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा आज सात विकेट राखून पराभव करीत विजयाची हॅट्ट्रिक साजरी केली.

मनोहर कदम यांना जन्मठेप
रमाबाई आंबेडकर नगर गोळीबार प्रकरण

मुंबई, ७ मे / प्रतिनिधी

घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरात ११ जुलै १९९७ रोजी गोळीबाराचे आदेश देऊन ११ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले राज्य राखीव पोलीस दलाचे तत्कालीन उपनिरीक्षक मनोहर कदम यांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली दोषी ठरवून शिवडीच्या जलदगती न्यायालयाचे न्या. एस. वाय. कुलकर्णी यांनी आज जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तब्बल एका तपानंतर या खटल्याचा निकाल लागला आहे. दोन दिवसांपूर्वी या खटल्याचा निकाल देण्यास सुरुवात झाली होती. मूळ प्रश्न अनुत्तरीतच

चौथ्या टप्प्यात सरासरी
५७ टक्के मतदान

नवी दिल्ली, ७ मे/खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यात आज बिहार, दिल्ली, हरयाणा, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या ८५ जागांसाठी सरासरी ५७ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. चौथ्या टप्प्यानंतर आता लोकसभेच्या ४५७ जागांसाठी मतदान पार पडले असून १३ मे रोजी होणाऱ्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यात ८६ मतदारसंघांमध्ये मतदान व्हायचे बाकी आहे. नंदीग्राम, फिरोजपूर, सवाई माधोपूर, मुर्शिदाबाद येथे मतदानादरम्यान उफाळलेल्या िहसाचाराचा अपवाद वगळता चौथ्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले. बठिंडातील बसप उमेदवारापाशी पिस्तुल सापडले.

राजस्थानची ‘रॉयल्स’ हॅट्ट्रिक
सेंच्युरियन, ७ मे / पीटीआय

वेगवान गोलंदाज अमित सिंग आणि डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा यांच्या दीमाखदार गोलंदाजीच्या रचलेल्या पायावर मग नमन ओझा चढविलेला कळस हेच राजस्थानच्या ‘रॉयल्स’ हॅट्ट्रिकचे वैशिष्टय़ ठरले. राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमियर लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या साखळीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा आज सात विकेट राखून पराभव केला. बेंगळुरूचे १०६ धावांचे माफक आव्हान स्वीकारलेल्या राजस्थान रॉयल्सने नमन ओझाच्या (५२) सलग दुसऱ्या अर्धशतकाच्या जोरावर पाच षटके शिल्लक असतानाच आपला शानदार विजय साजरा केला.

‘चकमक’फेम प्रदीप शर्मा यांना दिलासा
मुंबई, ७ मे / प्रतिनिधी

शंभरहून अधिक गुंडांना यमसदनी धाडणारे चकमकफेम पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांची बडतर्फी ‘महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणा’ने (मॅट) आज रद्द केली आणि त्यांना वेतनाचे संपूर्ण लाभ देऊन पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले. या शिवाय बडतर्फीचा काळ त्यांच्या वैयक्तिक गोपनीय अहवालात नमूद न करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. कुविख्यात गुंम्ड दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असल्याच्या आरोपावरून शर्मा यांना ऑगस्ट २००८ मध्ये भारतीय राज्य घटनेच्या ३११ मधील २ (ब) अन्वये बडतर्फ करण्यात आले होते. शर्मा यांनी बेकायदेशीर मार्गाने कोटय़वधी रुपयांची मालमत्ता गोळा केल्याचाही त्यांच्यावर प्रमुख आरोप होता. या आरोपांबाबत आवश्यक असल्यास चौकशी करण्यात यावी आणि त्याबाबत शर्मा यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात यावी, असे आदेशही न्या. राधाकृष्णन व न्या. ए. पी. सिन्हा यांच्या खंडपीठाने दिले आहेत.

जादा सागरी हद्दीवर पाकिस्तानचा दावा
मुंबई, ७ मे/खास प्रतिनिधी

पाकिस्तानने आपल्या सागरी हद्दीला २०० नॉटिकल मैलांवरून ३५० नॉटिकल मैलांपर्यंत वाढवून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. पाकिस्तानच्या या चालीस भारताकडून तातडीने विरोध केला गेला नाही किंवा आपली सागरी हद्द वाढवून घेण्याविषयी प्रतिदावा केला नाही तर यापुढील काळात नवनव्या कटकटींना सामोरे जावे लागणार आहे. पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक मंत्री आझम खान स्वाती यांनी इस्लामाबादमध्ये गुरुवारी पत्रकार परिषदेत पाकिस्तानचा साडेतीनशे नॉटिकल मैल सागरी हद्दीचा दावा संयुक्त राष्ट्रसंघाने स्वीकारला असल्याचे जाहीर केले. भारताने पाकिस्तानच्या या दाव्यास अजूनपर्यंत विरोध केलेला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. अशा तऱ्हेच्या दाव्याला येत्या पाच दिवसांत विरोध केला गेला नाही तर पाकिस्तानची सागरी हद्द भारताच्या आणखी जवळ येण्याचा धोका आहे.

ठाण्यातील ‘ती’ बेकायदा इमारत आज जमीनदोस्त होणार
मुंबई, ७ मे/प्रतिनिधी

ठाण्यातील लोकमान्य नगर, पाडा क्र. १ मधील जी पाच मजली बेकायदा इमारत पाडण्याची महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी हाती घेतलेली कारवाई राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्या हस्तक्षेपामुळे थांबवावी लागल्याचा आरोप आहे ती इमारत उद्या शुक्रवारी पाडण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला. या पाडकामाला स्थानिक लोकांकडून कितीही विरोध झाला तरी तो परिणामरकाकरपणे मोडून काढता येईल एवढा पुरेसा सशस्त्र पोलीस बंदोबस्त पोलीस आयुक्तांनी पुरवावा आणि ही इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याखेरीज कारवाई थांबवू नये, असेही न्यायालयाने सांगितले आहे.

वर्सोव्यातील घरांचा म्हाडाने केला परस्पर सौदा!
निशांत सरवणकर / मुंबई, ७ मे

तीन हजार ८६३ घरांसाठी सोडत काढण्याची तयारी म्हाडाने पूर्ण केलेली असतानाच आता म्हाडा अधिकाऱ्यांनी वर्सोव्यातील घरांबाबत लपविलेला एक घोटाळा समोर आला आहे. वर्सोवा येथील परवडणाऱ्या किमतीतील एक हजार ८८ घरांपैकी फक्त ६८६ घरांसाठीच जाहिरात प्रसिद्ध करून लोकांची दिशाभूल केल्याची माहिती हाती आली आहे. उर्वरित ३९१ घरांपैकी २२५ घरे विक्री योग्य असतानाही त्याची दखल विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध करताना घेण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ही आलिशान घरे आमदारांच्या पदरी पाडण्यासाठीच म्हाडाने ही चाल खेळल्याचे दिसून येत आहे.

अंगणवाडीतील ४७ मुलांना विषबाधा
मालेगाव, ७ मे / वार्ताहर

एकात्मिक बालविकास प्रकल्पातंर्गत देण्यात येणाऱ्या पोषण आहारामुळे शितलामातानगरामधील अंगणवाडीतील ४७ मुले व नऊ माता अशा ५६ जणांना विषबाधा झाली. सर्वाना ग्रामीण तसेच वाडिया रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्वाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. मालेगाव कॅम्प भागात असलेल्या ६२ क्रमांकाच्या अंगणवाडीत गुरूवारी सकाळी अकराच्या सुमारास पोषण आहार म्हणून मुलांना हरभरा व वाटाण्याची उसळ देण्यात आली. उसळ खाल्ल्यानंतर थोडय़ा वेळात मुलांना मळमळ व उलटय़ा होऊ लागल्याने प्रशासनाची एकच धावपळ उडाली. विषबाधेचा प्रकार लक्षात येताच परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्व रूग्णांना रूग्णालयात दाखल केले. या प्रकाराची माहिती मिळताच अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे, प्रांताधिकारी अजय मोरे, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील, महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. भरत वाघ यांनी रूग्णालयात धाव घेतली. सायंकाळी जिल्हाधिकारी पी. वेलरासु यांनीही रूग्णालयात जाऊन हा प्रकार कसा झाला, त्याची माहिती घेतली. या प्रकाराच्या चौकशीचे आदेशही त्यांनी दिले. दरम्यान उसळीचे नमुने तपासणीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहेत. अंगणवाडीसह इतर आठ ठिकाणी आहार शिजविण्याचा ठेका माहेश्वरी महिला बचत गटाकडे असल्याचे सांगितले जाते.

स्पर्धात्मक कृषी विकास प्रकल्पाला मान्यता
मुंबई , ७ मे / प्रतिनिधी
राज्य मंत्रिमंडळाने आज शेतकऱ्यांसाठीच्या स्पर्धात्मक कृषी विकास प्रकल्पाला मान्यता दिली. तसेच बीटी कापसाच्या बियाण्यांचे भाव निश्चित करण्यासंबंधी अध्यादेश काढण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. हा प्रकल्प ६४६.३६ कोटी रुपयांचा असून , त्यातील ४१४ कोटी रुपये जागतिक बँक कर्जरुपाने देणार आहे. राज्यात पणनक्षम शेती विकसित करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येणार असून , राज्यातील १२ लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. त्यासाठी शेतकऱ्यांच्या आठ हजार सहकारी गटांची स्थापना करण्यात येईल. बीटी कापसाच्या बियाण्यांचे भाव निश्चित करण्याबाबतचा अध्यादेश काढण्यासही आज मंजुरी देण्यात आली. याबाबतचे विधेयक विधानसभेत मंजूर झाले होते. विधान परिषदेत मात्र त्याला मंजुरी मिळाली नव्हती.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.प्रत्येक शुक्रवारी