Leading International Marathi News Daily
शनिवार, ९ मे २००९
  आई म्हणजे ..
  वाळवणी खाद्ययात्रा
  आनंद की आसूया?
  मूल्य आणि मोल
  गुरुब्र्रह्मा
  विज्ञानमयी
  अनोखे मतृत्व
  आईची ती आई झाली
  भैरवी
  हिरवळ
  गुपितं सांगण्याचा कट्टा
  प्रतिसाद
  लग्नाच्या आहेराची गोष्ट!
  नोट्स टू इच अदर!
  आधारवड होण्यासाठी..
  ऐन ग्रीष्मात चांदण्या रात्री
  मातृसती
  निळ्या डोंगरांचे प्रसन्न गाव
  त्रिपुरसुंदरी

 

उद्या जगभरातील अनेक देशांत मदर्स डे साजरा होत आहे. त्यानिमित्त आज ही खास मदर्स डे स्पेशल पुरवणी! कवितेच्या वाटेवर जशा या वात्सल्याच्या नात्याचा गौरव गाणाऱ्या कविता हमखास भेटतात, तशी माय-लेकराच्या नात्याची बदलती वीण उलगडणारी कविताही भेटते.. नव्या युगाच्या आईच्या ओंजळीत नवा विचार देणारी कविताही मनावर ठसा उमटवून जाते..
बाई असते, तिची आई केव्हा होते? बहुतेकींचा अनुभव असा की आपल्या पोटात एक जीव आला आहे हे कळतं तेव्हाच बाईमध्येही एक आई जन्माला येते. नऊ महिन्यांनी मूल तिच्या गर्भाशयातून बाहेर येतं, तेव्हा त्याला जोजावण्याची, त्याला पोसण्याची, वाढवण्याची आईची तयारी पुरी होत असते; पण ही तयारी म्हणजे एका जीवशास्त्रीय प्रक्रियेत भाग घेणाऱ्या दोन

 

घटकांची नैसर्गिकरीत्या होणारी तयारी असते. त्या प्रक्रियेतून एक सुंदर नातं तयार होण्यासाठी लागणारं समृद्ध भावनिक पोषण हळूहळू नंतरच होत असतं. मूल मोठं होत जाताना त्याच्या डोळ्यात आईचं जे रूप बिंबत असतं, त्यातून त्याला आईपणाचे अर्थ समजत जातात.
शांताबाई शेळके यांची एक छान कविता आहे. आई म्हणजे काय ते मुलानं सांगितलं आहे-
आई म्हणजे तव्यावरची गरम गरम पोळी
औषधावर दिलेली लिमलेटची गोळी
आई म्हणजे प्रसादाचा खडीसाखर खडा
शाळेआधी पाटीवर लिहून दिलेला धडा
आई म्हणजे पाठीवरून फिरवलेला हात
मेतकूट कालवलेला मऊ तूपभात
आई म्हणजे देव्हाऱ्यातले लक्ष्मीचे चित्र
सगळ्या मित्रांमधला माझा आवडता मित्र
आईच्या भूमिकेचे सगळे पैलू शांताबाईंच्या कवितेतल्या छोटय़ाच्या मनानं अनुभवले आहेत. आई सांभाळते, दक्षतेनं वाढवते, श्रद्धेचा संस्कार करते, गुरू होऊन शिकवते. आई क्षमा करते, प्रोत्साहन देते, माया करते. एकीकडे त्या लहानग्या जिवाला अक्षरश: दैवी वाटावा असा तिच्या उदार वात्सल्याचा अनुभव येतो आणि दुसरीकडे त्याला समजून घेणारी, साथ करणारी, त्याचं मन ओळखणारी ती त्याची मैत्रीणही होऊ शकते.
आई मैत्रिण होण्याचे दिवस तसे आजकालचे. पन्नास-साठ वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजे दोन पिढय़ा मागेपर्यंत आईला मैत्रीण व्हायची उसंतही नव्हती आणि आजही नव्हती. ती बिचारी आई म्हणजे नुसती आईच असायची. अर्थात तिच्या आईपणाला आपल्या मुलांच्या कुटुंबातल्या आणि समाजातल्या स्थानाची स्वच्छ जाणीव असायची. म्हणजे मुलग्यांना वाढवणं आणि मुलींना वाढवणं यात फरक करण्याची गरज तिला परंपरेनं आणि व्यवस्थेनं जी सांगितली होती, ती समजून घेऊन वागायची तिला सवयच पडून जायची.
लेकाच्या परीस लेक कशियाने उणी
लाडाचे मैना माझी हिरा नव्हे ती हिरकणी
असा मनातला भाव ती उमाळ्यानं ओवीत गायची खरी, पण मुळात तिचंच अस्तित्व घरात दुय्यम. तिला माहीत असायचं की मुलगा आणि मुलगी दोघं जरी आपल्याच पोटचे, तरी मुलगा पुरुष म्हणून जगणार आहे आणि लेकीला बाई म्हणूनच जगायचं आहे.
लेका रे, तुझा खेळ नित कवडी-गोटी हाती
मैना जाते सासऱ्याला, घर अंगन लागे पाठी
अशा ओव्या गाणाऱ्या त्या काळच्या आईची मानसिकता आज आपण सहज समजू शकतो. तेव्हाचे बहुतेक मुलगे बाप्यांच्या जगात सामील होता होता आईला गृहित धरायला, दुर्लक्षायला, विसरायला किंवा वगळायलाही स्वाभाविकपणेच शिकत असत. काही थोडय़ांना आईच्या कष्टांची, तिनं घरादारासाठी आणि मुलांसाठी केलेल्या त्यागाची जाणीव असे आणि ते आईच्या ऋणात नव्हे, आज्ञेतही रहात (त्यातून दुसऱ्यावर उदा. बायकोवर होणाऱ्या अन्यायाची एक आणखी दुसरीच गोष्ट आहे.)
आई- मुलींचं नातं मात्र वेगळं असायचं. आईच्या कष्टांशी, दुय्यमपणाशी, त्यागाशी आणि सोशिकपणाशी लेक बाई म्हणून थेट जोडलेलीच असायची. त्यामुळे आईच्या काळजाची कळ ओळखणाऱ्या, तिच्या आई असण्याचं आणि बाई असण्याचं सुखदु:ख वाढत्या वयाच्या निरनिराळ्या टप्प्यांवर स्वत:च्या अनुभवाच्या अंगानं समजू शकणाऱ्या आणि एकप्रकारे आईच्याच आयुष्याचा विचार जगणाऱ्या मुली आईशी जणू नाळेनं जोडलेल्या रहात. आईकडून त्या जगण्याचं बळ मिळवत, तिच्यामुळं जगण्याला तोंड देत आणि तिला आठवतच सोशिकतेच्या कमाल मर्यादेपर्यंत तग धरून रहात.
बापानं दिल्या लेकी, जणू आंधळ्याच्या हाती
धरली त्याची काठी मायबाईच्या नावासाठी
बापानं दिल्या लेकी, दिल्या दूर मुलुखात
मायेच्या नावासाठी राबती चिखलात
सासराचं घर नांदून केलं गोड
माय गं बाई, तुझ्या धीराची हाये जोड
अशा कितीतरी ओव्या याच वस्तुस्थितीचं प्रमाण देणाऱ्या. बयाच्या म्हणजे आईच्या दुधाचं सत्व लेकीच्या मनगटी कसं खेळतं याचा अनुभव सांगणाऱ्या. अगदी आजसुद्धा नीरजासारखी एखादी कवयित्री प्रिय आईस उद्देशून कविता मालिका लिहिते आणि कदाचित पूर्वीच्या मुलींच्या सुरात उमटला नसेल तो त्रागा, कडवटपणा, हताशपणा, राग आणि दु:ख यांचं मिश्रण नि:संकोच मोकळेपणानं शब्दांमधून कालवून देते.
तुझी मुलगी सुखरूप
यातनांच्या महापुरात
त्याच्या अविनाशी प्रेमाची पिलावळ
ती प्रसवते आहे विनातक्रार
(तू केलेल्या संस्कारानुसार)
इथे सारेच मुबलक
मुलांपासून छळांपर्यंत
तसे थोडे आहेत हाल,
हवाल मात्र काहीच नाही
तिची प्रकृती (नेहमीच) उत्तम,
त्याला थोडे अपचन.
कळावे,
लोभाची अपेक्षा ती काय?
शेवटी तुझीच वारस आहे
अजूनही ती जशी आहे, तशी त्याला पचत नसल्याचं वास्तव मुकाट स्वीकारून, आपल्या आईचा पारंपरिक वारसा सांभाळणाऱ्या लेकी कुठे कुठे दिसतातच. पण त्याचबरोबर काळजीपोटी का होईना, पण आपले पंख छाटून लहान करू बघणाऱ्या आईचे हात दूर सारून, कर्तृत्वाच्या क्षितीजाकडे सरळ झेप घेणाऱ्या हाय प्रोफाईल मुलीही दिसतात.
अजूनही असते तिच्यापाशी नखभर काजळ
माझ्या जळजळत्या डोळ्यांसाठी
आणि चिमूटभर अंगारा, माझी असली नसली इडापिडा टाळण्यासाठी
मऊ सूत गोधडीची हवीहवीशी ऊब
मला वेढून असते तिच्या आसपास
आणि बाळ जीभ जागी करतो तिच्या हातचा एखादा घास
अशी शांताबाईंच्या कवितेतली लेक म्हणते तशी, मुलीसाठी मागे उरलेली आई आज दिसणार नाही असं नाही, पण जगण्याचा आनंद घेण्याची मिळेल ती संधी दोन्ही हातांनी पकडताना मुलीच्या बरोबरीला आलेली आणि कधी कधी तर त्या जगण्याच्या स्पर्धेत स्वाभाविकपणे मागे पडल्यावर खंतावणारी, नाराज होणारी, वाद करणारी आईही अधूनमधून दिसते आहे.
आपल्याकडे आईच्या, नव्हे एकूणच बायांच्या बाबतीत वस्तुस्थिती निदर्शक म्हणून काहीएक विधान केलं तर त्याच्या अगदी विरुद्ध टोकाचं विधानही त्याच वेळी, तितकंच खरं असतं. या विसंगतीला काय म्हणावं?
आई-मुलीच्या नात्याची वीण तर सारखीच बदलते आहे. एकेकाळी त्या वीणकामाचे धागे मुख्यत: त्यागाचे, सोशीकपणाचे, मूल्यांच्या संस्कारांचे आणि नकारांच्या निमूट स्वीकाराचे होते. काळ बदलत चालला तसे ते समजुतीचे आणि मैत्रीचे होत गेले. मुलीच्या जागी आई आणि आईच्या जागी मुलगी अशी नात्यांनी उलटापालटही याच काळानं अनुभवली. आता या काळाचा हात कधी कधी धडधडत्या हृदयावर काळजीनं धरला जातो की ही वीण असूयेची आणि स्पर्धेची तर नाही ना होणार?
मुलीबरोबर शिक्षण पुरं करणारी, वेगवेगळे कोर्सेस हौसेनं करू बघणारी, सिनेमा-सहलींचा आनंद घेणारी किंवा पार्लरमधल्या सौंदर्योपचारात, असो की आधुनिक पोषाख करण्यात असो, जराही मागे न राहणारी मुलीची आई मुलीबरोबरच्या नात्यात स्पर्धेच्या धाग्याची वीण नाही ना घालणार? मुक्त स्वातंत्र्याचा अनुभव मुलीच्या बरोबरीनं घेण्यासाठी आज आईलाही मुली इतकंच आभाळ हवं आहे. पण त्या आभाळात तुमच्या कुशीतलं पाखरू झेपावताना पाहण्यातला आनंद निरपेक्ष उदारपणाच्या ज्या भावनेला स्पर्श करतो, ती भावना जास्त मोलाची आहे. इंदिराबाई संतांची एक सुरेख साधी कविता या नव्या, अस्वस्थ आईच्या ओंजळीत द्यावीशी वाटते-
आभाळासाठी पाखरू हवे
पाखरासाठी झाड हवे
झाडासाठी अंगण हवे
अंगणासाठी घर हवे
घराला दोन डोळे हवे
एका डोळ्यात आनंदाचे पाणी हवे
एका डोळ्यात जिव्हाळ्याचे दाणे हवे
दोन्ही डोळ्यात आभाळासकट
सगळे सगळे मावायला हवे
अरुणा ढेरे