Leading International Marathi News Daily
शनिवार, ९ मे २००९


ईस्ट लंडन, ८ मे / वृत्तसंस्था
ए बी डी’व्हिलियर्सच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने इंडियन प्रीमियर लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत मुंबईवर ७ विकेटने मात केली आणि गुणतालिकेत ‘दिल्ली ऑन टॉप’ची मोहोर उमटविली. मुंबईच्या ११६ धावांचे आव्हान दिल्लीने तीन विकेट गमावत १८.५ षटकांत साध्य केले. मुंबईचा हा सलग तिसरा पराभव आहे. या विजयाने दिल्लीचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित झाले आहे. सहा विजयांसह दिल्लीच्या नावावर आता १२ गुण जमा आहेत. ए बी डी’व्हिलियर्सने सहा चौकार आणि एका षटकारासह ३८ चेंडूंत ५० धावांची खेळी उभारली. गौतम गंभीर १९, डेव्हिड वॉर्नर २१ आणि तिलकरत्ने दिलशानने १७ धावा काढत डी’व्हिलियर्सला छान साथ दिली. दिल्लीच्या आशिष नेहराने सामनावीर पुरस्कार मिळविला.

सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारांना दणका!
नवी दिल्ली, ८ मे/पीटीआय

शिक्षणसंस्थांमधील रॅगिंगचे वाढते प्रकार रोखण्यासाठी समित्या स्थापन कराव्यात असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज सर्व राज्य सरकारांना दिला. प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मानसोपचार तज्ज्ञाकरवी समुपदेशनाची सोय उपलब्ध करून द्यावी तसेच मद्यधुंद होऊन रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व्यसनमुक्तीसाठी शिक्षणसंस्थांनी प्रयत्न करावेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अरिजीत पसायत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने आज दिला. शिक्षणसंस्थांतील रॅगिंगचे प्रकार रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पावले उचलण्यात येतील अशी हमी सर्व राज्य सरकारांनी द्यावी असेही न्यायालयाने सांगितले.

अमरसिंग यांचा पक्ष सोडण्याचा पुन्हा इशारा
आझम खान यांना आवरण्याची मागणी

रामपूर, ८ मे/पीटीआय

आपल्यावर बेताल टीका करणाऱ्या आझम खान याला मुलायमसिंग यांनी न आवरल्यास समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा अमरसिंग यांनी पुन्हा इशारा दिला. समाजवादी पक्षाच्या उमेदावार जयाप्रदा यांच्या गुरुवारी रात्री झालेल्या प्रचारसभेत त्या पक्षाचे सरचिटणीस अमरसिंग बोलत होते. जयाप्रदा या अमरसिंग व आझम खान यांच्यात तीव्र मतभेद निर्माण होण्यास कारणीभूत ठरल्या आहेत. समाजवादी पक्षात राहायचे की नाही याचा निर्णय लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा अंतिम टप्पा पार पडल्यानंतरच मी घेईन, असेही ते म्हणाले.

मनोहर कदमचे तातडीने अपील
पण लगेच जामीन नाही

मुंबई, ८ मे/प्रतिनिधी

घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरातील ११ जुलै १९९७ च्या गोळीबारप्रकरणी सदोष मनुष्यवधाबद्दल दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावणाऱ्या शिवडी येथील ‘फास्ट ट्रॅक’ सत्र न्यायालयाच्या निकालाविरुद्ध राज्य राखीव पोलीस दलाचे निलंबित उपनिरीक्षक मनोहर कदम याने आज तातडीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले. मात्र तेवढय़ाच तातडीने न्यायालयाकडून जामीन मिळविण्यात त्याला यश आले नाही. सत्र न्यायालयाने गुरुवारी शिक्षा ठोठावल्यानंतर मनोहर कदमला पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले होते.

खटले चालविण्यासाठी नऊ न्यायाधीशांची नियुक्ती
अहमदाबाद, ८ मे/पीटीआय
गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या जातीय दंगलीतील नऊ प्रकरणांची चौकशी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) केली होती. या प्रकरणांचे खटले सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानूसार गुजरातमध्येच विशेष न्यायालयांत चालविण्यात येणार असून त्यासाठी नऊ न्यायाधीशांची गुजरात उच्च न्यायालयाने आज नियुक्ती केली. या नऊ विशेष न्यायालयांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे या सर्व खटल्यांची सुनावणी होणार असून त्यांच्या कामकाजास लवकरच प्रारंभ होईल.

मुकुल शिवपुत्र यांचा शोध घेण्याचा आदेश
भोपाळ, ८ मे/वृत्तसंस्था

स्वर्गीय स्वरांचे वरदान लाभलेले विख्यात दिवंगत गायक पं. कुमार गंधर्व यांचे पुत्र व ताकदीचे गायक मुकुल शिवपुत्र हे विपन्नावस्थेत असल्याच्या बातम्यांनी आज खळबळ उडाली. शिवपुत्र हे कालपासून बेपत्ता असून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. शिवपुत्र हे राज्याचे सांस्कृतिक भूषण असून त्यांचा तातडीने शोध घ्यावा, असा आदेश त्यांनी दिला आहे. ५३ वर्षांचे मुकुल शिवपुत्र हे गेला आठवडाभर भोपाळमधील साईबाबा मंदिराबाहेर विपन्नावस्थेत होते.

होय, हाच तो दहशतवादी ज्याने ओंबळेंवर गोळ्या झाडल्या..
साक्षीदाराने कसाबला कोर्टात ओळखले
मुंबई, ८ मे / प्रतिनिधी

मुंबईवरील हल्ल्याच्या रात्री चौपाटीवर पोलिसांची ज्या दोन दहशतवाद्यांशी चकमक झाली त्या दोघांपैकी कोणी आज न्यायालयात उपस्थित आहे का, अशी विचारणा अभियोग पक्षाच्या वकिलांकडून केली गेल्यावर साक्षीदार सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर कदम यांनी, आरोपीच्या पिंजऱ्यात बसलेला पाकिस्तानी दहशतवादी अजमल अमीर कसाबकडे बोट दाखवून हाच तो दहशतवादी असल्याचे सांगत त्याला ओळखले. तसेच यानेच ओंबळेंवर एके-४७ रायफलमधून गोळ्या झाडल्या होत्या आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गोविलकर यांना जखमी केल्याचे न्यायालयाला सांगितले. कदम यांनी कसाबची ओळख पटविताना तो निर्लज्जासारखा हसत होता.

परतवाडा-भसदेही मार्गावर
ऑटो दरीत कोसळून नऊ ठार
अमरावती, ८ मे / प्रतिनिधी

परतवाडा-भसदेही मार्गावर मध्यप्रदेशातील कुकरूनजीक एक सहा आसनी ऑटो दरीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात नऊ ठार तर एक गंभीररीत्या जखमी झाला. हा अपघात गुरुवारी सायंकाळी घडला. मध्यप्रदेशातील भसदेहीजवळच्या बारामासा येथील तसेच चांदूर बाजार तालुक्यातील कुऱ्हा-कोंडवर्धा येथील भाविक या अपघातात ठार झाले. जखमींवर अचलपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये पाच महिला व एका बालिकेचा समावेश आहे. शिरजगाव कसबा नजीकच्या कुऱ्हा-कोंडवर्धा येथील श्यामराव कचाये यांचे काही नातेवाईक गुरुवारी मध्यप्रदेशातील खामलानजीकच्या पीरबाबा दग्र्यावर दर्शनासाठी गेले होते. खामला ते कुकरूदरम्यान उतारावर ऑटोचा क्लच एका चार वर्षीय बालिकेने दाबल्यानंतर ऑटोचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ऑटो दरीत कोसळली.

मुंबईत मलेरियाची साथ
मुंबई, ८ मे / प्रतिनिधी

मुंबईत सध्या मलेरियाची साथ सुरू आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी एप्रिल मध्ये मलेरियाचे रुग्ण जास्त आढळून आले आहेत, अशी माहिती आज आयुक्तांच्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत देण्यात आली. पालिकेला एप्रिल महिन्यात एक हजार ३५१ रुग्णांत हिवतापाची लक्षणे आढळून आली. २७ एप्रिल ते ३ मे या आठवडय़ात मलेरियाचे १०८ रुग्ण पालिका रुग्णालयात भरती झाले. परप्रांतून येणाऱ्या मजुरांमुळे मुंबईत मलेरियाचे जास्त रुग्ण आढळून येत आहेत. आंध्र प्रदेश, बंगाल, बिहार या काही प्रांतातून येणारे मजूर हे साथीच्या आजाराचे वाहक आहेत. मुंबईत ४४ ठिकाणी मोठय़ा प्रकल्पांचे बांधकाम सुरू आहे. बांधकामामुळे डासांची पैदास होण्यास पोषक वातावरण निर्माण होते. त्यामुळे सध्या शहरात मोठय़ा प्रमाणावर डासांची पैदास झाली असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. जयराज ठाणेकर यांनी दिली.

खड्डय़ातील पाण्यात पडून तीन शाळकरी मुले मृत्युमुखी
सासवड, ८ मे/वार्ताहर

वीर धरणाजवळ जेजुरी औद्योगिक वसाहतीसाठी जाणाऱ्या पाण्याच्या जलवाहिनीच्या गळतीमुळे तयार झालेल्या मोठय़ा खड्डय़ात पडून तीन मुलांना प्राण गमवावा लागल्याची घटना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास समगीरवाडी येथे घडली. रोहित अनिल समगीर, अपर्णा चिंतामण जैनक व रेश्मा अनिल समगीर अशी या तिघांची नावे आहेत. रोहित याला वाचविण्यासाठी अपर्णा व रेश्मा यांनी प्रयत्न केले पण त्यात त्यांना आपला प्राण गमवावा लागला.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.प्रत्येक शुक्रवारी