Leading International Marathi News Daily
शनिवार ९ मे २००९

गृहनिर्माण क्षेत्र मंदीच्या गटांगळ्या खात असताना गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये परिस्थिती बदलू लागली आहे. थांबा आणि पाहा ही भूमिका बदलून गरजू ग्राहक घराच्या शोधात बाहेर पडू लागला आहे. नेमके त्याच वेळी बांधकाम व्यावसायिकांनीही ग्राहकाच्या गरजा ओळखून छोटय़ा क्षेत्रफळाचे आणि परवडतील असे गृहप्रकल्प उभारण्यास सुरुवात केली आहे. वसंत ऋतूच्या निमित्ताने निसर्गात जाणवणारा बदल व्यवहारातही नजरेस येऊ लागला आहे, ही त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणता येईल.
९०च्या दशकात जशी पुण्याच्या उपनगरांची वाढ होऊ लागली आणि या भागात गृहनिर्माण प्रकल्प नेटाने उभे राहू लागले, त्याचप्रमाणे एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी ‘आयटी ’ हा परवलीचा शब्द झाल्यामुळे पुण्यात रोजगाराच्या संधी मोठय़ा प्रमाणावर निर्माण होऊ लागल्या. मुंबई, बंगलोरपाठोपाठ आयटीनगरी म्हणून पुणं उदयाला येऊ लागलं. मुळातच पुण्यात ज्ञानाची आणि बुद्धीची कधीच कमतरता नव्हती. किंबहुना पुण्याचं टॅलेन्ट जागतिक पातळीवर नावाजलं गेलं होतं. त्यामुळंच पुण्यात आयटीचा उदय झाल्यानंतर पुण्याची वाढ आणखी झपाटय़ाने होऊ लागली. आयटीतील नोकरीमुळे हजारो तरुणांना परदेशात जाऊन राहण्याचा व तेथील जीवनशैली अनुभवण्याचा योग आला. या वास्तव्यात त्यांनी

 

तिथली जीवनशैली तर जवळून पाहिलीच पण इथे परतल्यानंतर त्यांची जगण्याची दृष्टीही काहीशी बदलली. या गोष्टींचा भारतातील आणि त्यातही विशेषत पुण्यातील गृहबांधणी उद्योगावर सकारात्मक परिणाम झाला.
नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशी जाऊन परत येणाऱ्या आणि पुन्हा आपल्या पुण्यनगरीत रममाण होणाऱ्या तरुणांना नवी दृष्टी प्राप्त झाली. या दृष्टीतूनच त्यांची जीवनशैली बदलली आणि साहजिकच त्यांचं घराचं स्वप्न अधिक विस्तृत होत गेलं. शनवार, नारायण, सदाशिव पेठात वास्तव्य करणाऱ्या मध्यमवर्गीयांची मुलं मोठी होऊन एव्हाना कमावती झाली होती. आयटीत नोकरी मिळाल्यामुळं त्यांच्या हातात चांगला पैसाही येऊ लागला होता. पुण्यातील बहुतांश मध्यमवर्गीय लोक वर नमूद केलेल्या पेठांमधील चाळी पाडून बांधण्यात आलेल्या अपार्टमेन्टमध्ये वास्तव्य करू लागले होते. त्यांना विस्तारीत घराची आवश्यकता निर्माण झाली होती. याच वेळी पुण्याभोवताली कोथरूड, सिंहगड रस्ता, नगर रस्ता, हडपसर, बाणेर, पाषाण यासारख्या उपनगरांमध्ये गृहनिर्माण प्रकल्पांचा वेगाने विस्तार होऊ लागला होता. त्यामुळे गृहनिर्माण उद्योगाला एक प्रकारची चालनाच मिळाली होती.
परदेशातील घरं पाहून स्वप्नांचं स्वरुप बदललेला आणि हाती बक्कळ पैस असलेला आयटीतील तरुण पुण्यात परतला होता. मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणं आयटीतच नोकरी करणारी त्याची पत्नी आणि तो स्वत असा दोघांचा मिळून टेक होम पगार लाखाच्या घरात जात होता. त्यामुळं महिन्याकाठी पन्नास-साठ हजार रुपयांपर्यंत पडणारा ईएमआय त्याच्या दृष्टीनं काहीच नव्हता. म्हणूनच एखादा गृहप्रकल्प पहावयास गेलेला ‘आयटी’तील असा तरुण पन्नास-साठ लाखांच्या करारावर अगदी ऐटीत सही करीत असे. बांधकाम व्यावसायिकांनाही असा होतकरू ग्राहक प्रिय होऊ लागला.
पुण्यात आयटीचं हब निर्माण होऊ लागलं तसतशी आयटीतील रोजगारांची संधीही वाढू लागली. परिणामी, पुण्यात येऊन सुरुवातीला भाडय़ाच्या घरात आणि कालांतराने स्वतच्या घरात स्थायिक होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले. अगदी वर्षभरापूर्वीपर्यंत म्हणजे गेल्या वषीच्या एप्रिल महिन्यापर्यंत परिस्थिती सगळ्यांनाच फील गूड वाटावी, अशी होती. बाजारात घरांची मागणी आणि पुरवठा यामध्ये फारशी तफावत नव्हती. गरजूला त्याच्या आवाक्यातलं घर सहजी उपलब्ध होत होतं. पुण्यात सदनिका खरेदीचे व्यवहार मोठय़ा प्रमाणावर होत होते. नगर रस्ता, बाणेरसारख्या परिसरात अनेक मोठय़ा टाऊनशिप किंवा सोसायटय़ा उभारल्या जात होत्या. सारे काही सुखेनैव चालू होते. आयटीतील तरुणांची बदलती दृष्टी आणि बदलती जीवनशैली पाहून त्यांच्या गरजेबरहुकूम (टेलर मेड) घरं बांधण्यासाठी बांधकाम उद्योग सज्ज होता.
किंबहुना या काळात (विशेषत गेल्या चार-पाच वर्षांत)आयटी क्षेत्रातील ग्राहक डोळ्यासमोर ठेवूनच अनेक बांधकाम प्रकल्प निर्माण झाले. एक बीएचकेचे फ्लॅट कालबाह्य़ झाले. टू बीएचके, टू अँड हाफ बीएकचे असे शब्द गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिरातींमध्ये सर्रास दिसू लागले. मागणी तसा पुरवठा या न्यायाने बांधकाम क्षेत्र काम करू लागले. मोठय़ा, प्रशस्त आणि अत्याधुनिक सुख-सुविधांनीयुक्त अशा गृहप्रकल्पांची उभारणी होऊ लागली.
ज्या घरात दिवसातील जास्तीत जास्त काळ राहायचे त्या घराच्या तपशिलापेक्षा अ‍ॅमेनिटीजची यादी ग्राहकाला खुणावू लागली. अनेक सोयी-सुविधांमध्ये (उदा. घरात प्रवेश करणे, टीव्ही लावणे, गॅस चालू राहिल्यास तो कार्यालयात बसून रिमोटद्वारे बंद करणे, घरात कोणी त्रयस्थ आल्यास त्याची प्रतिमा समोरच्या टीव्हीवर पाहू शकणे आदी )स्वयंचलितपणा (ऑटोमायझेशन) येऊ लागला. तुमच्या मूडप्रमाणे घरातील दिव्यांचा प्रकाश बदलू लागला. टाईमर लावल्यामुळे घरात उन्हं येताना पडदे आपोआप बंद होऊ लागले तसेच तुम्ही घरात प्रवेश करते होत असतानाच ते उघडू लागले. ज्या ज्या खोलीत तुम्ही पाऊल टाकाल, त्या त्या खोलीतील दिवे तुम्ही प्रवेशण्यापूर्वीच प्रखर तेजाने झळकू लागले. ही सारी स्थित्यंतरे मनाला मोहविणारी होती आणि आयटीतील क्रांतीमुळे खिशालाही फारशी चाट न लावणारी होती. गेल्या पाच-सहा वर्षांचा बांधकाम उद्योगातील काळ हा असाच गेला. मागणी तसा घरांचा पुरवठा होऊ लागला. घराच्या शोधात असलेल्या मध्यमवर्गीयाची घरघर याच काळात वाढली. त्याचं स्वप्न अपुरं राहतंय की काय असं त्याला वाटू लागलं. घराच्या किमती त्याच्या आवाक्यातून केव्हाच बाहेर गेल्या होत्या. सर्वात जास्त किमतीच्या सदनिका विकण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांमध्ये अहमहमिका लागली. अर्थातच त्यासाठी त्यांनी अनेक चांगल्या सुविधा देऊ केल्या होत्या. वर म्हटल्याप्रमाणं शहाणं सुरतं किंवा अलीकडच्या भाषेत बोलायचं तर ‘स्मार्ट होम ’ निर्माण केलं जाऊ लागलं. एका मजल्यावर एकच घर आणि तेही स्वतंत्र जलतरण तलावासह अशा जाहिराती येऊ लागल्या. जीवनशैली बदलल्याचंच हे सारं द्योतक होतं.
हे सारं अविश्रांत सुरू असतानाच एप्रिल २००९ उजाडला. एका पक्षाने केलेल्या आंदोलनामुळे परप्रांतीय बांधकाम मजूर पुन्हा मायदेशी परतले. गृहनिर्माण क्षेत्रात बांधकाम मजुरांचा तुटवडा निर्माण झाला. जे होते त्यांनी मजुरी वाढवून मागायला सुरुवात केली. नेमकी याचवेळी स्टीलच्या दरातही वाढ झाली. स्टीलचा दर जवळजवळ दुप्पट झाला. या साऱ्याचा परिणाम बांधकामाच्या दरात होणे अपरिहार्यच होते. आणि तसा तो झालाही. बांधकाम साहित्याच्या किमतीतील वाढ, मजुरांची कमतरता यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी प्रति चौरस फुटांमध्ये चारशे रुपयांपर्यंत वाढ केली. आधीच आवाक्याबाहेर गेलेल्या घरांच्या किमती आणि त्यातच बांधकाम दरातील वाढ यामुळे मध्यमवर्गीयांनी घराचा विषयच सोडून दिल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.
घराची अत्यंत निकड असतानाही ग्राहकांनी ‘वेट अ‍ॅंड वॉच’ ची भूमिका घेतली आणि नकळत गृहनिर्माण क्षेत्राकडं पाठ फिरवली.
हे सारे होत असतानाच अमेरिकेत वादळ निर्माण झाले. सबप्राईम घोटाळ्यामुळं अमेरिकेतील गृहनिर्माण क्षेत्र आणि बँका अडचणीत आल्या. घरांच्या किमती झपाटय़ाने उतरू लागल्या. दिलेल्या कर्जापेक्षा घराची किंमत कमी येऊ लागली. त्यामुळे बँकांची अर्थव्यवस्था ढासळण्यास सुरुवात झाली. भारतीय अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम झाला. भारतीय गृहनिर्माण क्षेत्रात नुकतीच परदेशी गुंतवणूक होण्यास सुरुवात होत असतानाच हे वादळ आल्यामुळे भारतीय गृहनिर्माण क्षेत्राचे जहाजही हेलकावे खाऊ लागले. परदेशी गुंतवणूक कमी झाली. मुळातच रिअल इस्टेट क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिला न गेल्यामुळे बँकांनीही त्यांना सवलतीच्या दरात किंवा माफक दरात कर्ज देण्यास नकार दिला.
गृहनिर्माण क्षेत्र मंदीच्या गटांगळ्या खाऊ लागले. बाजारात अफवांना पेव फुटले. त्यातील काही कालांतराने खऱ्याही ठरल्या. दोन-दोन, तीन-तीन महिने बांधकाम व्यावसायिकांकडे एकाही सदनिकेची नोंदणी होईनाशी झाली. बाजारात विक्रीसाठी ठेवलेला माल खपला नाही, तर काही काळ तोटा सहन करण्याची कोणत्याही उत्पादकाची क्षमता असते. आणि तशी ती नसली, तरी तो काहीही करून वेळ निभाऊन नेतो. बांधकाम क्षेत्राच्या बाबतीत बोलायचे तर काही विपरीत घडू लागले. बाजारात विक्रीसाठी उपलब्ध सदनिकांची खरेदी ग्राहकाकडून जवळपास पूर्ण थांबली. त्याचवेळी घराचे दर आणखी कमी होतील आणि आपण घेतलेले घर तुलनेने महाग असेल, त्यामुळे आपण पुन्हा दर कमी झाल्यावर घर घेऊ अशी अटकळ बांधून काही ग्राहक सदनिकांची नोंदणी रद्द करू लागले. नोंदणी खात्यातील एका उच्चपदस्थाने दिलेल्या माहितीनुसार एरवी अगदी अभावानेच रद्द होणाऱ्या नोंदणी करारांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आणि हीच खरी बांधकाम व्यवसायाच्या दृष्टीने चिंतेची बाब झाली.
ग्राहकाने फिरविलेली पाठ, बँकांनी कर्ज देण्यास वाजविलेली नकारघंटा, परदेशी गुंतवणुकीचा आटलेला ओघ, बांधकाम साहित्याच्या दरात झालेली वाढ या साऱ्या पाश्र्वभूमीवर गृहनिर्माण क्षेत्रात प्रचंड अनिश्चितता पसरली. बांधकाम व्यावसायिकांनी बचतीच्या उपाययोजना सुरू केल्या. अनेकांनी कामे थांबविली. काहींनी नोकरवर्ग कमी केला. काहींनी नवे प्रकल्प पुढे ढकलले. शहराच्या चौकाचौकात उभी असलेली गृहप्रकल्पांच्या जाहिराती करणारी आकर्षक आणि भव्य अशी होर्डिग्ज एकेक करून खाली उतरू लागली.
या क्षेत्राला उभारी यावी, यासाठी सिमेंट, स्टीलचे दर कमी करण्यासारख्या उपाययोजना न आखता सरकारनेही या क्षेत्राकडे दुर्लक्ष केले. त्याऐवजी गृहकर्जावरील व्याजाचे दर कमी करण्यावर भर दिला गेला. परिणामी, बँकांचा धंदा झाला. पण नव्या घरांच्या खरेदीसाठी अर्थसाहाय्य झाले नाही. अनेकांनी खासगी बँकांची महागडी कर्जे राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये कमी दराने वर्ग केली. कमी व्याजदराने गृहकर्ज उपलब्ध झाले, तरी घराचे दर काही कमी होईनासे झाले.
या साऱ्या गदारोळात ग्राहक पुरता निराश झाला. घराचं आपलं स्वप्न स्वप्नच राहतं की काय, अशी शंका त्याला वाटू लागली. तथापि, गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये परिस्थिती बदलू लागली आहे. बांधकाम व्यावसायिकांन कमी क्षेत्रफळाची घरे बांधण्यास सुरुवात केली आहे. सिंहगड रस्त्यावरील अशाच एका प्रकल्पात एका दिवसांत काही शे सदनिका नोंदणी झाल्या. त्यातच पाडवा आणि अक्षयतृतीयेसारखे मुहूर्ताचे दिवस आले. बाजाराने उभारी धरली. ग्राहकही बाहेर पडला. या साऱ्या बदलाचा गृहनिर्माण क्षेत्रावर आता सकारात्मक परिणाम होऊ लागला असून मंदीचा ट्रेंड बदलू लागला आहे. गृहनिर्माण क्षेत्राच्या दृष्टीने ही विशेष आनंदाची बाब आहे.
डी. आर. कुलकर्णी