Leading International Marathi News Daily
रविवार, १० मे २००९
(सविस्तर वृत्त)

तिसऱ्या आघाडीला धक्का
तेलंगण राष्ट्रसमिती रालोआच्या व्यासपीठावर
नवी दिल्ली, ९ मे/खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान होण्यापूर्वीच डाव्या

 

आघाडीच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या आघाडीला भेगा पडायला सुरुवात झाली आहे. के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील तेलंगण राष्ट्रसमितीने तिसऱ्या आघाडीशी दोस्ती सोडून रालोआच्या तंबूत सामील होण्याची तयारी केली आहे.
उद्या लुधियाना येथे होणाऱ्या संयुक्त प्रचार सभेत चंद्रशेखर राव भाजप-रालोआच्या व्यासपीठावर अवतरणार असल्याचे तेलंगण राष्ट्रसमितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांचे निकाल लागण्यापूर्वीच तिसऱ्या आघाडीला खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे. पंधराव्या लोकसभेत तिसऱ्या आघाडीचेच सरकार येईल, असा ठामपणे दावा करणारे माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांच्यासाठीही हा मोठा धक्का आहे. केंद्रात गैरभाजप-गैर काँग्रेस सरकार आणण्यासाठी तिसरी आघाडी उभी करण्यात करात यांनी गेल्या तीन महिन्यांत बरेच परिश्रम घेतले आहेत.
अकाली दलाचे प्रमुख प्रकाशसिंग बादल यांच्या निमंत्रणावरून उद्या लुधियाना येथे होत असलेल्या भाजप-रालोआ मेळाव्यात चंद्रशेखर राव उपस्थित राहणार असल्याचे तेलंगण राष्ट्रसमितीचे नेते विनोदकुमार यांनी सांगितले. मात्र, याचा अर्थ तेलंगण राष्ट्रसमिती रालोआमध्ये सामील झाली असा होत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रालोआमध्ये सामील होण्याविषयी तेलंगण राष्ट्रसमितीने कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही, असे ते म्हणाले. स्वतंत्र तेलंगण राज्याच्या निर्मितीचे जो पक्ष आश्वासन देईल, त्याचे समर्थन करण्याचे धोरण तेलंगण राष्ट्रसमितीने स्वीकारले आहे. केंद्रातील युपीए सरकारच्या पाच वर्षांंच्या कार्यकाळात स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीच्या मुद्यावर चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला सोबत घेऊनही काँग्रेसला डाव्या पक्षांच्या, विशेषत माकपच्या दबावाखाली या मुद्यावर निर्णय घेणे शक्य झाले नव्हते. स्वतंत्र तेलंगण राज्याला डाव्यांचा विरोध ठाऊक असूनही तेलंगण राष्ट्रसमिती निवडणुकीपुरती तिसऱ्या आघाडीत सामील झाली होती. यंदा लोकसभा निवडणुकीत तेलंगण राष्ट्रसमितीला पाच ते सहा जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. २००४ साली या पक्षाने पाच जागाजिंकून केंद्रात सत्तेत भागीदारी केली होती.