Leading International Marathi News Daily
रविवार, १० मे २००९

वीरप्पा मोईली यांची हकालपट्टी
नितीशकुमार यांच्यावर केलेली टीका भोवली
नवी दिल्ली, ९ मे/खास प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकांच्या प्रारंभी संयम बाळगणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणुका अंतिम टप्प्यात पोहोचत असताना आपल्या जीभेवरील नियंत्रण गमावले आहे. परिणामी निवडणुकांनंतरच्या संभाव्य राजकीय समीकरणांची पर्वा न करता सध्या विरोधात असलेल्या नेत्यांवर जाहीर टीका केल्याबद्दल काँग्रेसच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख वीरप्पा मोईली तसेच पक्षाचे अन्य प्रवक्ते अश्विनीकुमार यांची आज तातडीने उचलबांगडी करण्यात आली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर टीका करण्याची मोईलींना शिक्षा मिळाली तर अश्विनीकुमार यांना तेलगू देसमवर केलेली टीका भोवल्याचे म्हटले जात आहे.

चेन्नई, पंजाब किंग
किंबर्ले, ९ मे / वृत्तसंस्था

मॅथ्यू हेडनची ४८ धावांची आधार देणारी खेळी आणि एस. बद्रिनाथच्या नाबाद ५९ धावा या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयलचे कडवे आव्हान मोडीत काढून इंडियन प्रीमियर लीगच्या गुणतक्त्यात १३ गुणांसह अव्वल स्थान मिळविले आहे. राजस्थान रॉयलने ठेवलेल्या १४१ धावांच्या आव्हानाचा सामना करताना चेन्नईला फारसे कष्ट पडले नाहीत. बद्रिनाथला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब मिळाला. त्याआधी, राजस्थानने ग्रॅमी स्मिथ (३०), अस्नोडकर (२६), जडेजा (२७) यांच्या जोरावर कसाबसा १४०चा टप्पा गाठला.

पंजाबदा जवाब नहीं!
किम्बर्ले, ९ मे / पीटीआय

डेक्कन चार्जर्सने ठेवलेले १६९ धावांचे आव्हान पेलताना दमछाक होत असतानाही किंग्ज इलेव्हन पंजाबने अखेरच्या षटकातील एक चेंडू शिल्लक ठेवून ही रोमहर्षक लढत तीन विकेट्सनी जिंकली आणि इंडियन प्रीमियर लीगमधील आपला उपान्त्य फेरीतील दावा मजबूत करण्याचा प्रयत्न केला.

सक्तीचे कुटुंब नियोजन
पित्याच्या धोरणाचे वरुणकडून समर्थन, भाजप असहमत
नवी दिल्ली, ९ मे/खास प्रतिनिधी

दिवंगत संजय गांधी यांनी आणीबाणीच्या काळात राबविलेली सक्तीच्या कुटुंब नियोजनाच्या अतिशय वादग्रस्त धोरणाची पुन्हा अंमलबजावणी करण्याच्या वरुण गांधी यांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचे आज भाजपला स्पष्ट करावे लागले. आणीबाणीच्या काळात मुस्लिमांना लक्ष्य करण्यासाठी संजय गांधी यांनी ही योजना सक्तीने राबविली होती. हेच धोरण पुन्हा लागू करण्याचे आपण समर्थन करतो, असे वरुण गांधी म्हटले आहे.

जयंत का ‘राज’ क्या था?
मुंबई, ९ मे / खास प्रतिनिधी

गृहमंत्री जयंत पाटील यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या घेतलेल्या भेटीबद्दल विविध तर्कवितर्क व्यक्त करण्यात येऊ लागले आहेत. उत्तर भारतीयांच्या विरोधातील हिंसक आंदोलनप्रकरणी ७० ते ८० गुन्हे दाखल असलेल्या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी राज्याचे गृहमंत्रीच गेल्याने चुकीचा संदेश गेल्याचे बोलले जाऊ लागले आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीत उत्तर भारतीयांच्या मतांसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दादापुता करावे लागले असतानाच दुसरीकडे गृहमंत्रीच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेल्याने पक्षातील उत्तर भारतीय नेत्यांमध्ये साहजिकच अस्वस्थता पसरली आहे.लोकसभा निवडणुकीत मुंबई, ठाणे, नाशिक पट्टय़ात मनसेला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

देशात सर्वाधिक जागा भाजपला
राज्यात युतीला ३३ तर आघाडीला १३ जागा
प्रबोधनचा अंदाज

मुंबई, ९ मे / खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ पैकी सर्वाधिक ३३ जागा शिवसेना-भाजप युतीला मिळतील; तसेच देशात सर्वात जास्त जागा भाजपला मिळतील, असा अंदाज प्रबोधन रिसर्च ग्रूपने व्यक्त केला आहे. भाजपला सर्वाधिक जागा मिळून केंद्रात भाजपप्रणित आघाडीचे सरकार सत्तेवर येईल, असेही अंदाजित करण्यात आले आहे.

तिसऱ्या आघाडीला धक्का
तेलंगण राष्ट्रसमिती रालोआच्या व्यासपीठावर
नवी दिल्ली, ९ मे/खास प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान होण्यापूर्वीच डाव्या आघाडीच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या आघाडीला भेगा पडायला सुरुवात झाली आहे. के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील तेलंगण राष्ट्रसमितीने तिसऱ्या आघाडीशी दोस्ती सोडून रालोआच्या तंबूत सामील होण्याची तयारी केली आहे. उद्या लुधियाना येथे होणाऱ्या संयुक्त प्रचार सभेत चंद्रशेखर राव भाजप-रालोआच्या व्यासपीठावर अवतरणार असल्याचे तेलंगण राष्ट्रसमितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

काँग्रेसला पाठिंबा देण्याबाबत डावे नरमले
कोलकाता, ९ मे/वृत्तसंस्था

सरकारस्थापनेच्या वेळी यंव करू आणि त्यंव करू, अशी बेलगाम वक्तव्ये गेले काही दिवस करणाऱ्या डाव्यांनी आज काँग्रेसबाबत उजवी भूमिका घेतली. काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देणार काय, या प्रश्नावर भारतीय मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस प्रकाश करात म्हणाले की, ‘आधी निवडणुका होऊ देत, निकाल लागू देत मग काय ते ठरविता येईल’. डावे पक्ष काँग्रेसला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देणार नाहीतच उलट केंद्रात बिगरकाँग्रेसी व बिगरभाजप सरकार स्थापन करणारी आघाडी आम्ही स्थापन करू, अशी वक्तव्ये करात यांनीच गेल्या आठवडय़ात केली होती. अर्थात माकपचे नेते व पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी मात्र या प्रश्नावर संयमित प्रतिक्रिया दिली होती. या प्रश्नावर सर्व पर्याय खुले आहेत आणि निवडणुकीच्या निकालानंतर त्याबाबतचा निर्णय घेता येईल, असे ते म्हणाले होते.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी