Leading International Marathi News Daily

रविवार, १० मे २००९

राहुल देशपांडे यांना कुमार गंधर्व पुरस्कार
मुख्य अभियंता राम घोटे, अभियंता अरुण माने, पं. नाथ नेरळकर यांचा कलावैभवच्या पुरस्कारात समावेश

औरंगाबाद, ९ मे/खास प्रतिनिधी

येथील कलावैभव या संस्थेतर्फे २२ ते २४ मे दरम्यान कुमार गंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त चार पुरस्कारांची घोषणा कलावैभवचे अध्यक्ष विजय आहेरकर यांनी शनिवारी येथे केली. संगीत क्षेत्रातील तपस्वी गायक कुमार गंधर्व यांच्या नावाने द्यावयाचा पुरस्कार पुण्याचे राहुल देशपांडे यांना घोषित करण्यात आला आहे.

दोन दशके मोफत वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. बर्दापूरकर यांची लिम्का बुकमध्ये निवड
औरंगाबाद, ९ मे/खास प्रतिनिधी

गेल्या दोन दशकांपासून दमा, अॅलर्जी, फुफ्फुस विकार यावर लोकशिक्षणाचे कार्य राबविल्याबद्दल येथील डॉ. सुहास बर्दापूरकर यांची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद झाली आहे. डॉ. सुहास बर्दापूरकर यांचे सन्मित्र कॉलनी येथे श्री नर्सिग होम आहे. या माध्यमातून डॉ. बर्दापूरकर हे दमा रुग्णांची सेवा करत आहेत. १९९५ पासून डॉ. बर्दापूरकर हे दम्यासाठी आणि मोफत वैद्यकीय उपचारासाठी दीर्घकालीन शिबिरे घेत आहेत.

मराठी माणूस
दोन ‘एस. एम. एस.’ आले. तिघांनी दूरध्वनी करून कळवलं. आणखी दोघा-तिघांनी प्रत्यक्ष भेटीत सांगितलं. सगळ्यांचं म्हणणं एकच - ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय्!..असेल हिंमत तर अडवा!’ चित्रपट पाहा. अगदी आवर्जून. खास वेळ काढून. चांगला आहे. नक्की आवडेल. जिकडे-तिकडे या चित्रपटाचा बोलबाला ऐकायला मिळत होता. निवडणुकीचा प्रचार तेव्हा अगदी भरात होता. पुण्या-मुंबईत म्हणे काही कार्यकर्त्यांनी मतदारांना या चित्रपटाची तिकिटेच घरपोहोच दिली.

लाखो रुपयांची बेहिशेबी रोकड बाळगणाऱ्या मराठवाडय़ातील दोघांना मुंबईत अटक
लातूर, ९ मे/वार्ताहर

मुंबई येथील क्रॉफर्ड मार्केट परिसरात पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत टॅक्सीतून आलेल्या दोन व्यक्तींकडे ४४ लाख रुपये रोख सापडल्याची घटना शुक्रवारी घडली तर शनिवारी तपासात रोख ४५ लाख रुपये आढळून आले. शुक्रवारी रमाबाई आंबेडकर नगर पोलिसांनी सुजित शिंदे (वय २१) व गणेश शिंदे (वय २५) अशा दोघांकडून ४४ लाख रुपये ताब्यात घेऊन त्यांना अटक केली आहे. दोघेही लातूर जिल्ह्य़ातील रहिवासी असल्याचे मुंबई पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

माजी जि.प.सदस्याला दारूच्या अवैध साठय़ासह अटक
बीड, ९ मे/वार्ताहर

माजी जि.प. सदस्य गो. गो. मिसाळ यांना अवैध देशी दारूचे बॉक्स घेऊन जाताना गाडीसह पकडून पोलिसांनी पावणेतीन लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. बीड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि अंमळनेर परिसरातील पुढारी असलेले गो. गो. मिसाळ यांना शुक्रवारी (८ मे) बीड-कल्याण रस्त्यावर पिकअप व्हॅनमधून अवैध देशी दारूचे ९९ बॉक्स किंमत ७३ हजार पाचशे रुपये व गाडी असा पावणेतीन लाख रुपयांच्या मालासह पकडले. विशेष पथकाच्या पोलीस उपअधीक्षक गीता चव्हाण यांनी मिळालेल्या माहितीवरून मिसाळ यांना सापळा रचून पकडले. त्यांच्याबरोबर सुनील सानप, छगन वारे आणि सुनील शेंडगे यांना अटक करण्यात आली. मिसाळ यांना अवैध दारूच्या साठय़ासह अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

कायगाव दगडफेक प्रकरणी ३२ आरोपींना न्यायालयीन कोठडी
औरंगाबाद, ९ मे/खास प्रतिनिधी

कायगाव टोका येथे गुरुवारी अपघातानंतर झालेल्या जाळपोळ, दगडफेक प्रकरणी ३२ आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश गंगापूर न्यायालयाचे न्यायाधीश ए. पी. कुलकर्णी यांनी दिले आहेत. त्यांना २२ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. एक आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याची रवानगी बाल न्यायालयात करण्यात आली आहे. जुने कायगाव येथील दत्तू कर्डिले यांचे अपघाती निधन झाल्यानंतर गुरुवारी जमावाने जाळपोळ आणि दगडफेक केली होती. तसेच कायगाव पेपर मिलमध्येही आग लावण्याचा प्रयत्न केला होता. गंगापूर पोलिसांनी या प्रकरणात ३३ जणांना अटक केली. त्यापैकी ३२ जणांना न्यायाधीश कुलकर्णी यांच्यासमोर उभे केले. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर या सर्व आरोपींची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली आहे.

टिप्परने धडक दिल्याने मोटरसायकलस्वार ठार
गेवराई, ९ मे/वार्ताहर

वाळू घेऊन जाणाऱ्या टिप्परने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बागपिंपळगाव येथे शनिवारी (९ मे) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात तालुक्यातील खांडवी तांडा येथील गणेश सीताराम राठोड (वय ३०) हे जागीच ठार झाले.

आई हे एक विश्वश्रेष्ठ नाते आहे - प्रा. आगळे
लातूर, ९ मे/वार्ताहर

जन्म व संस्कार या दोन महान गोष्टी देणारी आई हे एक विश्वश्रेष्ठ नाते आहे. आई जीवनाचा एक संदर्भग्रंथच असतो, असे प्रतिपादन प्रा. श्याम आगळे यांनी केले. डॉ. राममनोहर लोहिया जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय सानेगुरुजी कथामालेत प्रा. आगळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणपतराव तेलंग होते. प्रा. आगळे पुढे म्हणाले, ‘श्यामची आई’मुळे कोणत्याही आक्रमणाची भीती वाटत नाही. आईचे हृदय लाभलेल्या सानेगुरुजींच्या मायेने आपण समाजात काम करतो. आजच्या परिस्थितीत तोंड, डोळे, कान बंद करून बसलेल्या समाजाला जागे करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. प्रा. सुशीला पिंपळे म्हणाल्या, बिनभिंतीच्या जनतेच्या विद्यापीठातून वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांनी माणुसकीचे मूल्यशिक्षण आत्मसात केले. त्यांच्या विचारांची आज गरज आहे. व्यसन व कर्मकांडाच्या अतिरेकामुळे समाजाची दिवसेंदिवस अधोगती होत आहे. प्रत्येकाने निरोगी जीवन जगत आपले आयुष्य समाजासाठी खर्ची केले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

घराला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान
परळी वैजनाथ, ९ मे/वार्ताहर

येथील गंगासागर नगरमध्ये एका घरात विजेच्या दाबाने फ्रीजचा स्फोट होऊन घराला भीषण आग लागली. त्यात दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली. गंगासागरनगर भागातील सुधाकर ज्ञानोहा वाडे यांच्या निवासस्थानी गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास विजेच्या जास्त दाबामुळे फ्रीजचा स्फोट झाला. त्याने संपूर्ण घरालाच आग लागली. यात घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. दरम्यान, श्री. वाडे यांच्या पत्नी जयश्री बाजारात गेल्या होत्या. आजूबाजूच्या रहिवाशांनी तात्काळ आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. घटनास्थळाचा पोलीस आणि तहसीलच्या वतीने पंचनामा करण्यात आला आहे.

चुकीची माहिती देणाऱ्या मुख्याध्यापकास दंड
बीड, ९ मे/वार्ताहर

माहिती अधिकाराअंतर्गत चुकीची माहिती दिल्याच्या कारणावरून कोल्हारवाडी येथील शहागीरबाबा विद्या मंदिराच्या मुख्याध्यापकास वीस हजार रुपये दंड आणि शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस राज्य माहिती आयुक्ताकडे करण्यात आली आहे. बीड तालुक्यातील कोल्हारवाडी येथील शहागीर बाबा विद्या मंदिर शाळेतील शिक्षक हजेरीच्या सत्यप्रती मिळविण्यासाठी ४ फेब्रुवारी २००९ ला माहितीच्या अधिकारानुसार राम नारायण खेडकर यांनी अर्ज केला होता. मात्र मुख्याध्यापकांनी चुकीची आणि अपूर्ण माहिती दिल्याबद्दल अर्जदाराने प्रथम अपिलीय अधिकारी तथा शिक्षणाधिकारी यांच्याकडे अपील केले. याची सुनावणी होऊन मुख्याध्यापकाने अर्जदारास चुकीची व अपुरी माहिती उपलब्ध करून दिल्याने माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधील तरतुदीचा भंग केल्याचे निदर्शनास आल्याने वीस हजार रुपयांचा दंड व शिस्तभंगाच्या कार्यवाहीची शिफारस राज्य माहिती आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

पैशांचा अपहार करणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्याविरूद्ध गुन्हा
नांदेड, ९ मे/वार्ताहर

दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत एक वर्षांपूर्वी रक्कम उचलून काम न करता २९ हजार रुपयांचा अपहार करणाऱ्या रामराव चालावाड या ग्रामविकास अधिकाऱ्यांविरुद्ध सोनखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनुसार, २००६-०७ या आर्थिक वर्षांत लोहा तालुक्यातल्या पेनूर येथील गावात दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत दोन लाख रुपयांच्या कामास तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली होती. गेल्या वर्षी हे काम करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी रामराव चालावाड यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेतून २९ हजार रुपये उचलले. ही रक्कम उचलल्यानंतर काम सुरू करणे अपेक्षित असताना चालावाड यांनी काम सुरू केले नाही. शिवाय ही रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरली.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर लोह्य़ाचे विकास अधिकारी शिवाजी ढवळे यांनी आज सोनखेड पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदविली. पोलिसांनी चालावाडविरुद्ध फसवणूक करणे, अपहार करणे आदी आरोपांवरून गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात अद्यापि कोणालाही अटक करण्यात आली नाही.

बुद्ध लेणीत उसळला जनसागर
औरंगाबाद, ९ मे/प्रतिनिधी

बुद्ध पौर्णिमेनिमित्त आज हजारो साधकांनी बुद्ध लेणीत दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. बौद्ध नागरिकांनी शांतीसंदेश फेरी काढली होती. त्यात शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
जगाला शांती व अहिंसेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धाची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. सकाळी बौद्ध भिक्खूंच्या उपस्थितीत क्रांती चौकातून मोठी शांतीसंदेश फेरी निघाली. सर्वत्र वाढत चाललेला हिंसाचार, दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून शांततेचा संदेश पोहोचावा हा त्या फेरीमागील उद्देश होता. ही शांतीसंदेश फेरी पैठण गेटमार्गे भडकल गेट येथे पोहोचली. बौद्ध नागरिकांनी एकत्रितपणे परित्राण पाठ, व्याख्यान, खीरदान, धम्मदेशना अशा प्रकारे गौतम बुद्धांचे स्मरण केले. तत्पूर्वी सकाळी बुद्ध लेणीत पंचशील ध्वजारोहण झाल्यानंतर सूत्रपठण करण्यात आले. यावेळी हजारो बौद्ध भिक्खूंची तर उपस्थिती होतीच शिवाय शेकडो साधकांनी दर्शनासाठी रिघ लावली. दिवसभर बुद्ध लेणीत दर्शन घेण्यासाठी भाविक येत होते.

जालन्यात बुद्ध जयंती उत्साहात साजरी
जालना, ९ मे/वार्ताहर

भगवान गौतम बुद्ध जयंती आज जालना शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हा उपासक संघाच्या वतीने सकाळी सात वाजता मस्तगड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर धम्म ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी त्रिशरण पंचशील वंदना घेण्यात आली. या वेळी भन्ते अंगुलीमाल शाक्यपुत्र महाथेरो यांनी उपस्थितांना धम्मदेसना दिली. त्यानंतर भगवान गौतम बुद्ध यांची प्रतिमा ठेवलेल्या रथासह शहरातून शांतीयात्रा काढण्यात आली. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघालेल्या या शांतीयात्रेचा समारोप छत्रपती संभाजी उद्यान येथे झाला. शांतीयात्रेत बौद्ध उपासक सहभागी झले होते भास्कर शिंदे, प्रा. कालिदास सूर्यवंशी, भीमराव इंगळे, प्रा. डॉ. शांताराम रायपुरे, प्रा. गजहंस, पी. एस. गडवे, गौतम भालेराव, कैलास रत्नपारखे, बाबूलाल पंडित, बी. एम. साळवे, ब्रह्मानंद चव्हाण, सुधाकर निकाळजे, सुनील साळवे, सुधाकर रत्नपारखे, गणेश रत्नपारखे, सुशीलकुमार वाठोरे आदी उपस्थित वेळी होती.

हातगाडीवाल्यांचा प्रश्न मार्गी लागणार
लातूर, ९ मे/वार्ताहर

शहरातील विविध ठिकाणी फिरते व्यवसाय करणारे व एका ठिकाणी हातगाडी टाकून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र जागा नगरपालिकेमार्फत देऊन त्यांचा प्रश्न कायमचा निकाली काढण्याचा निर्णय पालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
शहरात गंजगोलाई, कापडलाईन, गांधी मार्केट, बसस्थानक, शहरातील जुने रेल्वेस्थानक, गुळमार्केट, कव्हानाका, राजीव गांधी चौक, नंदी स्टॉप, खर्डेकर स्टॉप, शिवाजी चौक, नवीन रेणापूर नाका, पाच नंबर चौक, एमआयडीसी चौक, शाहू चौक, विवेकानंद चौक आदी ठिकाणी सुमारे ५०० हातगाडय़ा असून अतिक्रमित दुकानांची संख्याही १०० च्या वर आहे. गेल्या ४० वर्षांपासून गंजगोलाई येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी या प्रश्नांचा निकाल लागत नसल्यामुळे प्रश्न भिजत पडलेला आहे. शहरातील वाढती रहदारी लक्षात घेऊन गंजगोलाई परिसरातील छोटय़ा विक्रेत्यांनी स्वत:हून तडजोडीची भूमिका घेतली आहे. पर्यायी जागा नगरपालिकेने दिली तर आम्ही येथून विनातक्रार जागा सोडू. सध्या नव्याने बांधण्यात आलेल्या फळमार्केटमधील रिकामी जागा उपलब्ध करून दिली तर त्या ठिकाणी स्थलांतरित होण्यास या हातगाडीवाल्यांनी संमती दर्शविली आहे.

मोबाईल चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला पूर्णा येथे अटक
परभणी, ९ मे/वार्ताहर

पूर्णा शहरात एका १४ वर्षांच्या मुलास मोबाईल चोरी प्रकरणात पोलिसांनी पकडले असून त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे पंधरा मोबाईल संच जप्त केले. पूर्णा शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले होते. काही दिवसांपूर्वी आदर्श कॉलनीतील लक्ष्मण माने यांच्या घरातून २५ हजार रुपये किमतीचा नोकिया कंपनीचा मोबाईल संच तर अशोक रोडवरील सुधीर कुलकर्णी यांच्या घरातून २ मोबाईल संच चोरीस गेले होते. पूर्णा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोबाईल चोरांचा बंदोबस्त करण्याची मोहीम हाती घेतली. आज दोदी मोहल्ला येथून शेख वाहब शेख अकबर या १४ वर्षांच्या मुलास ताब्यात घेतले. त्याच्या घरातून १५ मोबाईल संच पोलिसांनी जप्त केले. पूर्णा पोलिसांनी वाहबवर कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस कर्मचारी गणेश गंभिरे, किशोर बिंदू, युसूफ पठाण, अब्दुल रौफ, डी. के. पवार यांनी परिश्रम घेतले.

रासायनिक खताचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होणार - डवले
लातूर, ९ मे/वार्ताहर

येत्या खरीप हंगामात रासायनिक खताचा शेतकऱ्यांना पुरेसा पुरवठा करण्यात येणार असून खताचा १७,५०० मेट्रिक टन साठा करण्यात आला आहे. या साठय़ातून सर्व तालुक्याला कृषी उद्योग व जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्यामार्फत खत उपलब्ध करून देण्यात येणार असून शेतकऱ्यांनी त्याप्रमाणे नियोजन करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एकनाथ डवले यांनी केले आहे. खरीप हंगाम सुरू होण्यास अल्प कालावधी उरलेला असून रासायनिक खते व बी-बियाणांची पूर्वतयारी शेतकरी करीत आहेत. रासायनिक खताची मागणी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे मागणी केल्यानुसार एकूण ८७,३७० मेट्रिक टन रासायनिक खताचा पुरवठा होणार आहे. सध्या खताचा पुरवठा सुरू झालेला आहे व प्राप्त झालेले रासायनिक खत जिल्ह्य़ातील सर्व तालुक्यात उपलब्ध करून देण्यात येत आहे. पुरवठा करण्यात आलेले खत शेतकऱ्यांना योग्य किमतीमध्ये विक्री करण्याबाबत सर्व विक्रेत्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. जादा दराने कुठे खताची विक्री होत असल्यास याबाबतची माहिती त्वरित कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद लातूर तसेच पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांना द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा वेळेवर करण्याचे आवाहन
जालना, ९ मे/वार्ताहर

खरीप हंगामासाठी बियाणे, खते आणि कीटकनाशके खरेदी करताना जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, त्याचप्रमाणे खतांचा पुरवठा करणाऱ्या शासकीय-निमशासकीय संस्था, विक्रेते, एजंट यांनीही शेतकऱ्यांना शुद्ध खतांचा पुरवठा विहित वेळेत करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. डी. शिंदे यांनी येथे केले. खत कारखान्याचे पणन अधिकारी, एजंट, विक्रेते तसेच कृषी विभागाचे अधिकारी यांच्या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते.
बियाणांची अथवा खतांची जादा दराने विक्री होत असेल किंवा ती कमी वजनाची असतील तर या संदर्भातील तक्रारींसाठी अटकोरे, जिल्हा निरीक्षक वजन मापे भ्रमणध्वनी क्र. ९९२३४८३४९३, एस. एस. भागवत, भ्रमणध्वनी क्र. ९४२१७६१०१७, निरीक्षक वजने मापे, के. डी. राठोड, भ्रमणध्वनी ९४२०२१८०९० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘शेतकऱ्यांच्या कर्जवाटपातील अटी शिथील कराव्या’
अंबड, ९ मे/वार्ताहर

जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकऱ्यांच्या कर्जवाटप प्रकरणात जाचक अटी शिथिल करून तातडीने सर्व शेतकऱ्यांना कर्ज वाटप करावे यासह या बँकेविषयीच्या अन्य मागण्या माजी आमदार विलासराव खरात यांनी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना शुक्रवारी (८ मे) पाठविलेल्या निवेदनात केल्या आहेत. त्यासंदर्भात लक्ष घालून बँकेला तसे आदेश द्यावेत अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांना केली असल्याची माहिती श्री. खरात यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाविषयी आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना खरात यांनी सांगितले की, जिल्हा मध्यवर्ती बँक कर्ज वाटपात शेतकऱ्यास वेढीस धरत आहे. शेतकऱ्यांच्या सातबारावर दुप्पट कर्जाचा बोझा टाकून घेत आहे. ऊस, कापसाशिवाय इतर पिकांवर कर्ज दिल्या जात नाही. साखर कारखान्याच्या हमीपत्रात एकाच कारखान्याचे हमीपत्र ग्राह्य़ धरले जात असून या कार्यक्षेत्रातील साखर कारखान्याचे हमीपत्र ग्राह्य़ धरावे, मोसंबी पिकावर कर्ज देण्यात यावे व कर्ज देताना इतर बँकेच्या बेबाकीची अट ठेवू नये यासह अनेक मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.