Leading International Marathi News Daily
रविवार, १० मे २००९
(सविस्तर वृत्त)

वीरप्पा मोईली यांची हकालपट्टी
नितीशकुमार यांच्यावर केलेली टीका भोवली
नवी दिल्ली, ९ मे/खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकांच्या प्रारंभी संयम बाळगणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणुका

 

अंतिम टप्प्यात पोहोचत असताना आपल्या जीभेवरील नियंत्रण गमावले आहे. परिणामी निवडणुकांनंतरच्या संभाव्य राजकीय समीकरणांची पर्वा न करता सध्या विरोधात असलेल्या नेत्यांवर जाहीर टीका केल्याबद्दल काँग्रेसच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख वीरप्पा मोईली तसेच पक्षाचे अन्य प्रवक्ते अश्विनीकुमार यांची आज तातडीने उचलबांगडी करण्यात आली.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर टीका करण्याची मोईलींना शिक्षा मिळाली तर अश्विनीकुमार यांना तेलगू देसमवर केलेली टीका भोवल्याचे म्हटले जात आहे.
नितीशकुमार यांची काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी प्रशंसा केल्यानंतर शुक्रवारी त्यांच्यावर मोईली यांनी सडकून टीका केली. नितीशकुमार यांनी जातीयवादी भाजपशी संबंध कायम राखल्यामुळे त्यांची धर्मनिरपेक्ष प्रतिमा दूषित झाली आहे. अशा नितीशकुमार यांना काँग्रेस हीरो बनविणार नाही, असे मोईली यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत गैरहजर राहिल्याबद्दल लालूप्रसाद यादव आणि रामविलास पासवान यांच्यावरही मोईलींनी चांगलीच टीका केली होती. पक्षाच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख असूनही जीभेवर ताबा न ठेवता तसेच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी सल्लामसलत न करता असंबद्ध विधाने करणाऱ्या मोईली यांना काँग्रेसश्रेष्ठींनी तात्काळ शिक्षा दिली. कर्नाटकच्या चिकबल्लापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित असल्यामुळे मोईलींकडून निवडणुकांच्या काळात प्रसिद्धी विभागा प्रमुखपदाची जबाबदारी काढून पक्षाचे संघटन सरचिटणीस जनार्दन द्विवेदींकडे सोपविण्यात आली आली होती. पण कर्नाटकातील निवडणूक संपताच मोईली दिल्लीत पुन्हा सक्रिय झाले होते. आज मात्र मोईलींची उचलबांगडी करून द्विवेदी यांच्याकडे पुढची व्यवस्था होईपर्यंत ही जबाबदारी टाकण्यात आली आहे. आपल्याला हटविण्यात आल्याच्या वृत्ताचा मोईलींनी इंकार केला आहे. निवडणुका सुरु होण्यापूर्वीच द्विवेदी यांच्याकडे आपला पदभार सोपविण्यात आला होता, असा दावा करून ही जुनीच गोष्ट असल्याचे भासविण्याचा त्यांनी प्रयत्न केला.