Leading International Marathi News Daily
रविवार, १० मे २००९
(सविस्तर वृत्त)

पंजाबदा जवाब नहीं!
किम्बर्ले, ९ मे / पीटीआय

डेक्कन चार्जर्सने ठेवलेले १६९ धावांचे आव्हान पेलताना दमछाक होत असतानाही

 

किंग्ज इलेव्हन पंजाबने अखेरच्या षटकातील एक चेंडू शिल्लक ठेवून ही रोमहर्षक लढत तीन विकेट्सनी जिंकली आणि इंडियन प्रीमियर लीगमधील आपला उपान्त्य फेरीतील दावा मजबूत करण्याचा प्रयत्न केला.
त्याआधी, अ‍ॅन्ड्रय़ू सायमण्ड्सच्या ३६ चेंडूंतील नाबाद ६० धावांच्या यंदाच्या आयपीएलच्या पहिल्याच सामन्यातील झुंजार खेळीमुळे डेक्कनला १६८ धावापर्यंत मजल मारता आली. मात्र पंजाबने हे आव्हान महेला जयवर्धनेच्या २३ चेंडूंतील ४३ व ब्रेट लीगच्या चिवट १४ धावांच्या खेळीमुळे मोडीत काढले व तीन विकेट्सनी एक महत्त्वपूर्ण व आत्मविश्वास उंचावणारा विजय साजरा केला. डेक्कनने दिलेले आव्हान पेलताना पंजाबची ५ बाद ११६ अशी अवस्था झाली होती आणि त्यावेळी केवळ पाच षटके शिल्लक होती. अशा परिस्थितीतही जयवर्धनेने जिद्दीने किल्ला लढविला आणि चेंडू व धावा यातील फरक फारसा वाढू दिला नाही. स्वत: जयवर्धने १८व्या षटकात बाद झाला तेव्हा पंजाबला दोन षटकांत २० धावांची गरज होती. मात्र पियुष चावला (८) आणि ब्रेट ली (१४) यांनी घाईगडबड न करता ही धावसंख्या गाठली आणि पंजाबला एक अनपेक्षित असा विजय मिळवून दिला.