Leading International Marathi News Daily
रविवार, १० मे २००९
(सविस्तर वृत्त)

सक्तीचे कुटुंब नियोजन
पित्याच्या धोरणाचे वरुणकडून समर्थन, भाजप असहमत
नवी दिल्ली, ९ मे/खास प्रतिनिधी

दिवंगत संजय गांधी यांनी आणीबाणीच्या काळात राबविलेली सक्तीच्या कुटुंब

 

नियोजनाच्या अतिशय वादग्रस्त धोरणाची पुन्हा अंमलबजावणी करण्याच्या वरुण गांधी यांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचे आज भाजपला स्पष्ट करावे लागले. आणीबाणीच्या काळात मुस्लिमांना लक्ष्य करण्यासाठी संजय गांधी यांनी ही योजना सक्तीने राबविली होती. हेच धोरण पुन्हा लागू करण्याचे आपण समर्थन करतो, असे वरुण गांधी म्हटले आहे.
सक्तीच्या कुटुंबनियोजनाच्या संजय गांधी यांच्या धोरणाचे आपण समर्थन करतो, असे वरुण गांधी यांनी ‘द टेलिग्राफ’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. पिलीभीतमध्ये मार्च महिन्यात मुस्लिमांविषयी केलेल्या चिथावणीखोर भाषणानंतर रासुकाखाली अटक झालेले वरुण गांधी तुरुंगाची हवा खाऊन कसेबसे सुटल्यानंतर पुन्हा मुस्लिमांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
वरुण गांधी यांच्या या आक्रमक मनसुब्यांचे भाजपने समर्थन केलेले नाही. वरुण गांधी यांनी सक्तीच्या कुटुंबनियोजनाविषयी व्यक्त केलेले मत त्यांचे व्यक्तिगत विचार असून त्याच्याशी भाजपचे काहीही देणेघेणे नसल्याचे पक्षाचे प्रवक्ते सिद्धार्थ नाथ सिंह यांनी सांगितले. भाजप कुटुंब नियोजनाचे समर्थन करते. पण याबाबतीत आपला पक्ष सक्ती करण्याच्या कोणत्याही धोरणाच्या विरोधात आहे, असे सिंह यांनी स्पष्ट केले.