Leading International Marathi News Daily
रविवार, १० मे २००९
(सविस्तर वृत्त)

जयंत का ‘राज’ क्या था?
मुंबई, ९ मे / खास प्रतिनिधी

गृहमंत्री जयंत पाटील यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या घेतलेल्या

 

भेटीबद्दल विविध तर्कवितर्क व्यक्त करण्यात येऊ लागले आहेत. उत्तर भारतीयांच्या विरोधातील हिंसक आंदोलनप्रकरणी ७० ते ८० गुन्हे दाखल असलेल्या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी राज्याचे गृहमंत्रीच गेल्याने चुकीचा संदेश गेल्याचे बोलले जाऊ लागले आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीत उत्तर भारतीयांच्या मतांसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दादापुता करावे लागले असतानाच दुसरीकडे गृहमंत्रीच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेल्याने पक्षातील उत्तर भारतीय नेत्यांमध्ये साहजिकच अस्वस्थता पसरली आहे.
लोकसभा निवडणुकीत मुंबई, ठाणे, नाशिक पट्टय़ात मनसेला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मनसेचे दोन-तीन खासदार निवडून येतील, अशीही चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या शरद पवारांसाठी एक-एक खासदाराचा पाठिंबा महत्त्वाचा ठरणार आहे. यातूनच पवारांनी जयंत पाटील यांना राज ठाकरे यांच्या निवासस्थानी धाडल्याची चर्चा आहे. स्वत: जयंत पाटील यांनी मात्र त्याचा इन्कार केला आहे. ही राजकीय भेट नव्हती, असे त्यांचे म्हणणे आहे. आपण व राज ठाकरे हे बालमोहनचे माजी विद्यार्थी. बालमोहनच्या गल्लीतील एका आपल्या मित्राला भेटायला गेलो होतो तेव्हा फौजफाटा बघून राजने आपल्याला फोन केला व चहाला घरी येण्याचे निमंत्रण दिले. यापूर्वी एकदा राज ठाकरे हे आपल्या निवासस्थानी आले असता त्यांनी त्यांच्या घरी येण्याचे निमंत्रण दिले होते. मित्राच्या घरातून अगदी १०० फुटावर असलेल्या राज यांच्या घरी चहासाठी गेलो. २० ते २५ मिनिटे ठाकरे यांच्या निवासस्थानी होतो. तेव्हा दोघांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. एवढीच काय ती चर्चा, असा पाटील यांचा दावा आहे.
राज ठाकरे यांच्या विरोधात पोलिसांनी गेल्या वर्षभरात ८०च्या आसपास गुन्हे दाखल केले आहेत. एक रात्र त्यांना पोलीस स्थानकाची हवा खावी लागली होती. ही पाश्र्वभूमी असताना राज्याचा गृहमंत्रीच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जात असल्यास त्याचा अन्य भाषकांमध्ये काय संदेश जाणार, असा सवाल काँग्रेसच्या एका नेत्याने व्यक्त केला आहे. राज ठाकरे आणि जयंत पाटील यांच्या भेटीमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राष्ट्रवादीत आधीच अस्वस्थता आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत अपेक्षेऐवढे यश मिळण्याबाबत पक्षाचे नेते साशंक आहेत. या भेटीमागे नाशिक मतदारसंघातील निवडणुकीची किनार नाही ना, अशी कुजबुज सुरू झाली आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या एका गटाने मनसेच्या उमेदवाराला मदत केल्याचे बोलले जाते.
राज ठाकरे यांनी अलीकडेच नरेंद्र मोदी यांचे गुणगान गायल्यामुळे मनसेला निवडणुकीत पाठिंबा दिलेल्या मराठी मुस्लिमांमध्ये नाराजी पसरली आहे. तर नितीन गडकरी हे चांगले मुख्यमंत्री होऊ शकतात, असे ठाकरे यांनी दिलेले प्रशस्तीपत्र भाजपमधील मुंडे गटाला फारसे पसंत पडलेले दिसत नाही.
राज ठाकरे यांचे उत्तर भारतीयांच्या विरोधातील आंदोलन राष्ट्रवादीकडे असलेल्या गृहखात्याने योग्यपणे हाताळले नाही, असा उत्तर भारतीय समाजाचा आक्षेप आहे. ईशान्य मुंबईत उत्तर भारतीयांच्या मतांसाठी शरद पवार व डी. पी. त्रिपाठी यांनी उत्तर भारतीयांचा मेळावा आयोजित केला होता. तेव्हा सर्वच उत्तर भारतीय वक्त्यांनी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांना लक्ष्य केले होते. या मेळाव्यात पवारांनी मुंबईत राहणाऱ्या सर्व भाषिकांना संरक्षणाची ग्वाही दिली होती. आता पक्षाचेच गृहमंत्री राज ठाकरे यांच्याकडे जात असल्यास उत्तर भारतीय राष्ट्रवादीवर कसा विश्वास ठेवणार, असा सवाल पक्षाच्या एका उत्तर भारतीय नेत्याने केला आहे.