Leading International Marathi News Daily
रविवार, १० मे २००९
(सविस्तर वृत्त)

देशात सर्वाधिक जागा भाजपला
राज्यात युतीला ३३ तर आघाडीला १३ जागा
प्रबोधनचा अंदाज
मुंबई, ९ मे / खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ पैकी सर्वाधिक ३३ जागा शिवसेना-भाजप

 

युतीला मिळतील; तसेच देशात सर्वात जास्त जागा भाजपला मिळतील, असा अंदाज प्रबोधन रिसर्च ग्रूपने व्यक्त केला आहे. भाजपला सर्वाधिक जागा मिळून केंद्रात भाजपप्रणित आघाडीचे सरकार सत्तेवर येईल, असेही अंदाजित करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक १८ जागा भाजपला मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यापाठोपाठ शिवसेनेला १५ जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात ३३ जागाजिंकून शिवसेना-भाजप युती आपले वर्चस्व सिद्ध करेल, असा प्रबोधन संस्थेचा अंदाज आहे. शरद पवारांच्या पंतप्रधानपदासाठी महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून यावेत, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असला तरी राज्यात या पक्षाला फक्त सहा जागांचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. काँग्रेसला सात जागांवर समाधान मानावे लागेल, असे मत प्रबोधन रिसर्च ग्रुपचे विनोद जोशी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले. प्रबोधनच्या अंदाजानुसार युतीला ३३; तर आघाडीला १३ जागा तर अन्य पक्षांना दोन जागा मिळतील. अन्य पक्ष म्हणजे कोण हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.
देशाचा विचार करता भाजपला १७३ तर काँग्रेसला १२२ जागा मिळतील, असे प्रबोधनचे म्हणणे आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला १८ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मध्य प्रदेश (२३), गुजरात (२०), कर्नाटक (२०), राजस्थान (१४), छत्तीसगड (आठ) जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
काँग्रेसला फक्त १२२ जागा मिळतील, असे जोशी यांचे म्हणणे आहे. काँग्रेसला सर्वाधिक १७ जागा आंध्र प्रदेशमध्ये; तर राजस्थानमध्ये ११ जागांची शक्यता वर्तविण्यात आली आहे. देशातील सर्वाधिक जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला आठ जागांची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
डाव्या आघाडीला ३६; तर बसपला २७ जागा मिळतील, असा प्रबोधनचा अंदाज आहे. छोटय़ा किंवा प्रादेशिक पक्षांना १८५ जागा मिळतील, असा अंदाज आहे. १० ते ३० एप्रिल या काळात करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे हा अंदाज वर्तविण्यात आला आहे.