Leading International Marathi News Daily

रविवार, १० मे २००९

प्रादेशिक

नारायण सुर्वेच्या कवितांत समाजाला प्रेरणा देणारी व्यथा
साहित्यिका पुष्पा भारती यांचे गौरवोद्गार

मुंबई, ९ मे / प्रतिनिधी

अंत:करणातून भुकेलेला, गरीब माणूस कधी विकाऊ नसतो. त्याचादेखील स्वाभिमान असतो. असा स्वाभिमानी माणूस कधीही आपला आत्मा विकायला तयार होत नाही. अशा श्रमिक कष्टकरी माणसाच्या जीवनातील सुख-दु:ख त्यांनी कवितेतून मांडले. नि:शब्द, नि:संकोच अशा शब्दांतून त्यांनी आपल्या कविता रचल्या व समाजाला प्रेरणा देणारी व्यथा मांडली.. ज्येष्ठ हिंदी साहित्यिका पुष्पा भारती यांनी कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कवितांबद्दल हे गौरवोद्गार काढले आहेत. नऊ विविध क्षेत्रांत तेजस्वी कामगिरी करणाऱ्यांना ‘सह्याद्री’ वाहिनीतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘नवरत्न’ पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. एकेकाळी ज्याने गोदरेज कंपनीत पत्रे घासण्याचे काम केले. त्याला आज सह्याद्री वाहिनी व गोदरेज कंपनीकडून पुरस्काराने गौरविण्यात येत आहे.

चतुरंगकृत ‘संगीत सन्मान’ म्हणजे
नोबेल पुरस्काराचा मान - विनायक आठवले

डोंबिवली, ९ मे/प्रतिनिधी
मुंबईत गेली ४४ वर्षे मी सार्वजनिक जीवनात संगीत सेवा केली. परंतु, मुंबईतील कोणत्याही संस्थेला माझ्या कार्याची दखल घ्यावेसे वाटले नाही. ती दखल चतुरंग प्रतिष्ठानने घेतली आणि मला चतुरंग ‘संगीत सन्मान’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. हा पुरस्कार म्हणजे माझ्या दृष्टीने नोबेल पुरस्काराचा मान आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ संगीततज्ज्ञ-गायक महामहोपाध्याय विनायक रा. आठवले यांनी येथे काढले. ‘चतुरंग प्रतिष्ठान’तर्फे म्हैसकर फाऊंडेशनच्या सहकार्याने संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना ‘संगीत सन्मान’ पुरस्कार व याच क्षेत्रातील उदयोन्मुख गायकाला ‘संगीत शिष्यवृत्ती’ दिली जाते.

पंडित अजय पोहनकर यांना ‘माणिक वर्मा’ पुरस्कार प्रदान
मुंबई, ९ मे/प्रतिनिधी

भारत गायन समाज, पुणे या संस्थेतर्फे संगीत क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी केल्याबद्दल देण्यात येणारा यंदाचा माणिक वर्मा पुरस्कार ज्येष्ठ गायक पं. अजय पोहनकर यांना अलीकडेच प्रदान करण्यात आला.संगीत क्षेत्रात त्यांनी वयाच्या नवव्या वर्षीच पदार्पण केले. १० व्या वर्षी म्हणजे १९५७ साली त्यांना नागपूर कॉन्फरन्समध्ये आमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये पं. भीमसेन जोशी, सलामत अली, नसाकत अली इत्यादींचा समावेश होता. १९५८ साली अमीरखाँसाहेबांच्या शिफारसीवरुन त्यांना कलकत्ता येथे होणाऱ्या ऑल इंडिया म्युझिक कॉन्फरन्समध्ये आमंत्रित करण्यात आले होते.

दाखला देण्यापूर्वीच जातीची पूर्ण शहानिशा करा
उच्च न्यायालयाचा आदेश
मुंबई, ९ मे/प्रतिनिधी
मागासवर्गीय जातीचा दाखला मिळण्यासाठी अर्ज केलेली व्यक्ती खरोखरच त्या जातीची आहे की नाही याची पूर्ण शहानिशा संबंधित अधिकाऱ्यांना दाखला देण्यापूर्वीच करता यावी यासाठी आवश्यक असलेली सर्व यंत्रणा राज्य सरकारने त्यांना दोन महिन्यांत उपलब्ध करून द्यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. एवढेच नव्हे तर जातीचा दाखला दिला जाण्याआधी खात्री करण्यासाठी संबंधित अधिकारी जी काही माहिती गोळा कलील ती नंतर त्या दाखल्याची पडताळणी करणाऱ्या समितीकडेही पाठविली जावी, असे न्यायालयाने सांगितले आहे. जातीच्या दाखल्यांची पडताळणी करताना पडताळणी समितीने नेमके कोणते पुरावे तपासावेत याविषयी भिन्न मते व्यक्त करणारे निकाल न्यायालयाच्या विविध खंडपीठांनी गेल्या काही वर्षांत दिले होते.

विक्रोळी येथे गीतांजली एक्स्प्रेसखाली दोन महिला चिरडल्या
मुंबई, ९ मे / प्रतिनिधी

ठाण्याकडून मुंबईकडे येणाऱ्या गीतांजली एक्स्प्रेसने आज विक्रोळी स्थानकाजवळ रुळ ओलांडणाऱ्या दोन महिलांना धडक दिली. या धडकेत एक महिला ठार झाली असून, दुसरी गंभीररीत्या जखमी झाल्याचे रेल्वे पोलीसांनी सांगितले. विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ अप जलद मार्गावर रात्री ८.५५ वाजता हा अपघात घडला. या अपघातात जखमी झालेल्या महिलेला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र दोघींची नावे अथवा पत्ते अद्यापही कळू शकले नाही. रुळ ओलांडताना गाडी जवळ येत असल्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला असण्याची शक्यता रेल्वे पोलिसांनी वर्तविली आहे. या अपघातामुळे काही काळासाठी वाहतूक मंदावली होती. मात्र मध्य रेल्वेची वेळापत्रकावर त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे रेल्वे सूत्रांनी स्पष्ट केले.