Leading International Marathi News Daily

रविवार, १० मे २००९

नगरच्या रेल्वेस्थानकात दुसरा मालधक्का
नव्याने ६०० माथाडींना रोजगार

नगर, ९ मे/प्रतिनिधी

नगरच्या रेल्वे वाहतुकीत वाढ होऊन मालाची आवक-जावक, चढ-उतार वाढल्याने आणखी एका मालधक्क्य़ाच्या उभारणीचे काम सुरू करण्यात आले. नवीन मालधक्का पूर्ण क्षमतेचा, ४५ व्ॉगन माल साठवता येईल एवढा आहे. दुसऱ्या ७१५ मीटर लांबीच्या या मालधक्क्य़ाच्या उभारणीचे काम जानेवारीत सुरू करण्यात आले. येत्या सप्टेंबर २००९मध्ये ते संपेल.

सहा साखर कारखान्यांनाही सावंतने घातला गंडा!
संगमनेर, ९ मे/वार्ताहर

संगमनेर कारखान्यावरील दरोडय़ाचा मुख्य सूत्रधार कैलास हिंदूराव सावंत याने पूर्वी इतरही सहा साखर कारखान्यांना अशाच प्रकारे गंडा घातला आहे. बारामतीच्या गुन्ह्य़ात तो फरारी तर इतर गुन्ह्य़ांत त्याला शिक्षा झालेली आहे. दि. ५ ऑक्टोबरला ‘संगमनेर’च्या गोदामाला भगदाड पाडून साखरपोत्यांची चोरी होत असल्याचे सुरक्षारक्षकांच्या लक्षात आले. त्यानंतर कारखान्याचे कर्मचारी, स्थानिक गावकरी यांच्या मदतीने पोलिसांनी पहाटे साडेतीन ते सकाळी सहा वाजेपर्यंत कारवाई करत एकूण ३२ आरोपींना ताब्यात घेतले होते.

‘लिटिल चॅम्पस्’च्या स्वरधारांत नगरकर ओलेचिंब!
नगर, ९ मे/प्रतिनिधी

झी सारेगमप लिटिल चॅम्पस् कार्तिकी गायकवाड, प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, आर्या आंबेकर आणि रोहित राऊत या पंचरत्नांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस गीतांनी आज नगरकर रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाला प्रतिसादही मोठा मिळाला.
साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टतर्फे स्मारक उभारणीसाठी निधी संकलनासाठी रेसिडेन्शिअल हायस्कूलच्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला हजारो आबालवृद्ध नगरकरांची उपस्थिती होती. चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांची ‘हास्यसम्राट’फेम संजय कळमकर यांनी घेतलेल्या मुलाखतीने कार्यक्रमाला आणखी रंगत आणली.

निमंत्रण पत्रिका
गेले तीन-चार आठवडे
माझा मोबाईल सारखा
‘पत्रिका खूप छान झाली’
हे ऐकविण्यासाठी वाजत होता
आणि तशाच आशयाचे
काही एसएमएसही आले
निमित्त होते
मुग्धा अन् हर्षवर्धनच्या
वाडनिश्चयाच्या निमंत्रण पत्रिकेचे.
खरं तर अतिशय साधी
अन् कुठलाही झगमगाट नसलेली
यलो, ऑरेंज कलरच्या पेपरवर
लालसर शुभ्र रंगातील अक्षरे
अन् थोडय़ा डार्क ब्राऊन रंगाची
त्या दोघांचीही दिलखुलास हास्यमुद्रेची
स्केचेस छापलेली.

मतमोजणीसाठी कडेकोट बंदोबस्त
नगर, ९ मे/प्रतिनिधी

लोकसभेच्या नगर व शिर्डी मतदारसंघांतील मतमोजणी दि. १६ रोजी एमआयडीसी येथील सरकारी गोदामात होत आहे. मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे ४२५ पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. शहरातही २२५ पोलीस तैनात करण्यात येणार असून, मतमोजणी केंद्राजवळील २०० मीटर परिसरात वाहनांना प्रतिबंध करण्यात आला आहे. परवानापत्राशिवाय कोणासही आत प्रवेश दिला जाणार नाही. निवडणूक आयोगाच्या कडक सूचनांची अंमलबजावणी पोलीस करत आहेत. मतमोजणी केंद्रात, गोदाम सभोवताली व २०० मीटपर्यंत अशा तीन टप्प्यांत पोलीस पथके काम करतील.

गौतम बँकेच्या लिपिकाविरुद्ध कोपरगावला फसवणुकीचा गुन्हा
पासवर्ड चोरून अपहार
कोपरगाव, ९ मे/वार्ताहर

गौतम सहकारी बँकेतील लिपिकाने संगणक प्रणालीतून अकाऊंटचा पासवर्ड चोरला व त्याचा गैरवापर करून बँकेतून वेळोवेळी ४ लाख ५५ हजार ५०० रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले. सुनील लक्ष्मण नेहे या लिपिकाविरुद्ध बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गौतम सहकारी बँकेच्या कोळपेवाडी शाखेत १६ जुलै २००५ ते ८ फेब्रुवारी २००९दरम्यान आरोपी सुनील नेहे (रा. गंगापूर, ता. राहुरी) याने बँकेच्या संगणक प्रणालीतून अकाऊंटचा पासवर्ड चोरून रकमांमध्ये फेरबदल करून ४ लाख ५५ हजार ५०० रुपयांचा अपहार करून बँकेची फसवणूक केली. बँकेचे व्यवस्थापक निरंजन अप्पासाहेब होन (रा. डाऊच, कोपरगाव) यांनी आरोपी लिपीक नेहे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा पोलिसांत दाखल केला.

जेऊर कुंभारी सोसायटीवर प्रशासकाची नियुक्ती
कोपरगाव, ९ मे/वार्ताहर

तालुक्यातील जेऊर कुंभारी सोसायटीचा तहसीलदार एस. एस. सोनवणे यांच्या आदेशानुसार व पोलिसांच्या मदतीने कुलूप तोडून ताबा घेण्यात आला. प्रशासक म्हणून सहकार अधिकारी संजय पाटील यांची सोसायटीवर नियुक्ती करण्यात आली. या संस्थेचे अध्यक्ष, सचिव व संचालक मंडळाकडून वारंवार लेखी मागणी करूनही कार्यालय व कागदपत्रे सुपूर्द करण्यात आली नव्हती. उलट संस्थेस कुलूप लावून सचिव गणपत कोते दोन महिन्यांपासून रजेवर होते. त्यामुळे संस्थेचे कामकाज ठप्प झाले होते. सहायक निबंधक सी. एम. बारी यांनी कलम ८० अन्वये तहसीलदार एस. एस. सोवनणे यांच्याकडे रितसर अर्ज केला. पोलीस संरक्षणात संस्थेचे कुलूप उघडल्यात आले. संस्थेचे कार्यालय सचिव व १३ संचालकांकडून ही कागदपत्रे प्रशासनाच्या ताब्यात देण्याचा आदेश तहसीलदार सोनवणे यांनी दिला. त्यानुसार आज ही कारवाई करण्यात आली. कार्यालय प्रशासक पाटील यांच्या ताब्यात देण्यात आले. संस्थेचे दफ्तर मिळविण्याची कारवाई सुरू असल्याचे प्रशासक पाटील यांनी सांगितले.

कर्ज परतफेड सवलतीच्या लाभाची जिल्ह्य़ात मोहीम
नगर, ९ मे/प्रतिनिधी

शेतकऱ्यांना कर्ज परतफेड सवलत लाभाची व खरीप कर्जवाटपाची विशेष मोहीम जिल्ह्य़ात राबविण्यात येत आहे. केंद्र सरकारची कृषी कर्ज परतफेड सवलत योजना व राज्य सरकारच्या कर्ज परतफेड योजनेतील पात्र लाभधारक शेतकऱ्यांच्या याद्या विविध कार्यकारी सेवा संस्था व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखास्तरावर यापूर्वीच निश्चित करून प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या दोन्ही योजनेंतर्गत पात्र लाभार्थीनी दि. ३० जूनपर्यंत काही रक्कम भरणा करावयाची आहे. मात्र, यासाठी शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करण्याच्या सूचना बँक अधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. खरीप हंगामात कृषी कर्जवाटपासाठी कृषी पत आराखडय़ांतर्गत उद्दिष्ट पूर्ततेसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. कर्ज पूर्ण माफ झाल्याने जे शेतकरी कर्ज मिळण्यास पात्र झाले आहेत, अशा शेतकऱ्यांनाही कर्ज घेण्यास आवाहन करण्यात येत आहे.

प्राथमिक शिक्षकांचे वेतन नियमित देण्याचे आश्वासन
नगर, ९ मे/वार्ताहर

प्राथमिक शिक्षकांचे विलंबाने होणारे वेतन यासाठी तालुका प्राथमिक शिक्षक संघ व सदिच्छा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी सिद्धार्थ अजवेलकर यांची भेट घेतली. अजवेलकर यांनी यापुढे नियमितपणे वेतन अदा करण्याची ग्वाही शिष्टमंडळास दिली.नगर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे मार्चचे वेतन अद्यापि अदा झालेले नाही. या वेतनाचा धनादेश त्वरित शिक्षक विभागाकडे देण्यात आला. तसेच शालेय पोषण आहार, उपस्थिती भत्ता व एप्रिल वेतनाचा धनादेश चार दिवसांमध्ये काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. याशिवाय वैद्यकीय बिले, रजा पगार, वरिष्ठ वेतनश्रेणी फरक बिलांचा प्रश्नही सोडवण्याचे मान्य करून या प्रकारची बिले प्रत्येक महिन्याच्या २० तारखेपर्यंत लेखाधिकाऱ्यांकडे जमा करण्याची सूचना त्यांनी केली.

रवींद्र लांगोरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
कर्जत, ९ मे/वार्ताहर

रवींद्र दिनकर लांगोरे यांचे आज सकाळी साडेअकरा वाजता हैदराबाद येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ४१ वर्षांचे होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे. लांगोरे एअर फोर्समधून अधिकारी म्हणून निवृत्त झाले. सध्या ते हैदराबाद येथे एका खासगी हवाई कंपनीत अधिकारी पदावर कार्यरत होते. येथील समर्थ माध्यमिक विद्यालयातील प्रा. दीपक लांगोरे व सक्सेस क्लासेसचे प्रा. पंकज लांगोरे यांचे ते मोठे बंधू होत. (कै.)लांगोरे यांचे शिक्षण येथील महात्मा गांधी विद्यालयात झाले. आज सकाळी हैदराबादहून भ्रमनध्वनीवरून या घटनेने वृत्त दीपक लांगोरे यांना समजले. हैदराबादहून रुग्णवाहिकेत त्यांचा मृतदेह येथे आणण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर उद्या (रविवारी) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दोन टेम्पोच्या धडकेत एक ठार, दोन जखमी
संगमनेर, ९ मे/वार्ताहर

भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन टेम्पोंची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार, तर दोन्ही चालक गंभीर जखमी झाले. पुणे-नाशिक मार्गावरील चंदनापुरी गावाजवळच्या जावळेवस्ती परिसरात आज सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. रावसाहेब लक्ष्मण गायकवाड (वय ३२, राहणार जळगाव, ता. राहाता) असे ठार झालेल्याचे नाव आहे. ते आंबेगाव पंचायत समितीत पशुधन पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते. जखमी असलेल्या दोन्ही टेम्पोचालकांची नावे समजू शकली नाहीत.
भरधाव वेगात जाणारे टेम्पोंची (एमएच १५ ७१४८ व एमएच १५ एजी ८४३) जावळेवस्तीनजीकच्या वळणावर समोरासमोर धडक झाली. त्यात चालकाशेजारी बसलेले गायकवाड टेम्पोतून रस्त्यावर पडल्याने जागीच ठार झाले. पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

पतसंस्था कर्मचारी संघटनेचा बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय
नगर, ९ मे/प्रतिनिधी

जिल्हा पतसंस्था संघटनेच्या बंद व मोर्चात पतसंस्था कर्मचारी संघटनेने सहभागी होण्याचा निर्णय घेतला. संघटनेच्या आज झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत तसा निर्णय झाल्याची माहिती सरचिटणीस सुधीर टोकेकर यांनी दिली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास दौंड व कार्याध्यक्ष बाबूराव रांधवणे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. पतसंस्थांचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल झाल्याच्या निषेधार्थ पतसंस्था संघटनेने सोमवारी (दि. ११) बंद पाळून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला. त्यास संघटनेने पाठिंबा दिला. वसुली करताना कर्मचाऱ्यांना नाहक त्रास दिला जाणार नाही, याची काळजी घेण्यासाठी संघटना प्रयत्न करणार आहे. संघटनेच्या स्थापनेस आज (दि. ९) १५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने स्मरणिका प्रकाशन व सभासद वाढवण्याचे ठरले. बैठकीत विद्या कानडे, भास्कर महाजन, गोविंद गायकवाड, संपत पवार, संतोष शहा, साहेबराव वांढेकर, आबासाहेब गोरे यांची भाषणे झाली.

चोरलेली मोटरसायकल पुन्हा जागेवर!
सोनई, ९ मे/वार्ताहर

सोनईच्या स्वामी समर्थ केंद्राजवळून चोरीला गेलेली मोटरसायकल चोरटय़ाने दोन दिवसांनंतर रात्रीच्या वेळी पुन्हा आणून लावली. चोराला सुबुद्धी सुचल्याने मोटरसायकल मालकाने आनंद व्यक्त केला.बुधवारी रात्री तुकाराम विश्वनाथ निमसे (रा. श्रीरामवाडी, सोनई) यांची मोटरसायकल (एमएच १७ एन ७८९०) सोनईतील स्वामी समर्थ रस्त्यावरील दरंदले बंगल्यासमोरून चोरी गेली होती. काही दक्ष तरुणांनी मोटरसायकल चोराचा पाठलाही केला होता.सोनई पोलीस ठाण्यात माहिती देऊन या चोरटय़ाचे नावही कळवले होते. त्यानंतर या चोरटय़ाने मोटरसायकल स्वामी समर्थ मंदिरासमोर आणून लावली.

कुकडी कारखान्याच्या चौकशीचे आदेश
श्रीरामपूर, ९ मे/प्रतिनिधी

उसाचा दर कमी दिल्याबद्दल कुकडी साखर कारखान्याची चौकशी करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बबनराव काळे यांनी ही माहिती दिली. राज्य सरकारने २००६-०७ या गळीत हंगामाकरिता ९०० रुपये प्रतिटन पहिली उचल द्यावी, असे आदेश दिले. परंतु कुकडी कारखान्याने ७६२ रुपये ८० पैसे दराने बिल अदा केले. हा सरकारी आदेशाचा भंग असल्याने साखर आयुक्तांकडे तक्रार केली होती. तक्रारीवरून आयुक्तांनी कमी दर दिल्याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश नगरच्या प्रादेशिक सहसंचालकांना दिले असल्याचे काळे यांनी सांगितले. ‘कुकडी’ने ५ लाख ७२ हजार ८४५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. परंतु सरकारी आदेशापेक्षा १३८ रुपये २० पैसे कमी भाव दिल्याने शेतकऱ्यांना ७ कोटी ९१ लाख ६७ हजार रुपयांची रक्कम कमी मिळाली. कारखान्याला उसाचा पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेकडे संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

बाजार समितीचे संचालक दादासाहेब पवार यांचे निधन
जामखेड, ९ मे/वार्ताहर

जामखेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक दादासाहेब पवार यांचे काल (दि. ८) रात्री आठच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्य़ाने निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, ४ मुली असा परिवार आहे. आज सकाळी १० वाजता त्यांच्यावर पाडळी या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. पवार राजकारणात अजातशस्त्रू म्हणून ओळखले जात. राजकारणात बऱ्याच वेळा त्यांनी त्यागाची भूमिका घेत एक वेगळा आदर्श घालून दिला. पाडळी गावचे सरपंच, पंचायत समितीचे उपसभापती, बाजार समितीचे उपसभापती अशा अनेक पदांवर काम करताना त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. अंत्यसंस्कारास आमदार शिवाजी कर्डिले, सदाशिव लोखंडे, आष्टी येथील देवीदास धस, जिल्हा बँकेचे माजी संचालक जगन्नाथ राळेभात, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, जि. प. सदस्य दत्तात्रेय वारे, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य राजेंद्र कोठारी, तालुकाध्यक्ष सुरेश भोसले, माजी सभापती डॉ. पी. जी. गदादे, मन्सूरभाई सय्यद आदींसह सुमारे ५ हजारांचा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी शोकसभा झाली.

जिल्हा पतसंस्था संघटनेच्या मोर्चात सहभागी व्हा - कोयटे
श्रीरामपूर, ९ मे/प्रतिनिधी

नगर येथे येत्या सोमवारी (दि. ११) जिल्हा सहकारी पतसंस्था संघटनेच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन काका क ोयटे यांनी केले आहे.
पतसंस्थांनी संघटित न झाल्यास येत्या काळात पतसंस्था चालविणे अवघड बनणार असल्याचे कोयटे यांनी सांगितले. श्रीरामपूर येथे पतसंस्था चालकांच्या बैठकीत क ोयटे बोलत होते. अध्यक्षस्थानी भरत बाबरिया होते. राज्यातील काही बँका बुडित निघाल्या. या बँकांत पतसंस्थांच्या कोटय़वधी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. आमच्या ठेवी अडकल्या असताना सहकार खाते कारवाईचा बडगा दाखवत आहे. कर्जदार, सहकार व पोलीस खात्यास जाग आणण्यासाठी आयोजित या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन क ोयटे यांनी केले. प्रास्ताविक बाबरिया यांनी केले. स्वागत राजेश राठी यांनी, तर आभार सुहास चुडिवाल यांनी मानले. बैठकीस डी. टी. लिहिणार, प्रकाश गोर्डे, जी. जी. जोंधळे, उमेश केणेकर, राजेंद्र मुंदडा, अनिरूद्ध महाले उपस्थित होते.

पतसंस्थांच्या कारभाराविरोधात सोमवारी नगरमध्ये मोर्चा
नगर, ९ मे/प्रतिनिधी

कायद्याच्या तरतुदीचा गैरफायदा घेत अनेक पतसंस्था समाजावर अन्याय करत आहेत. या पतसंस्थेच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी वकील शिवाजी डमाळे यांनी केली आहे. या मागणीसाठी दि. ११ला पतसंस्था कारभाराच्या विरोधात मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला. श्री. डमाळे यांनी कार्यकर्त्यांसह नुकतीच जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांची भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निवेदने देऊन व मोर्चे काढून सहकारी पतसंस्था करीत असलेला सामाजिक गुन्हा लपवू शकत नाही. पतसंस्थांनी कायद्याच्या चौकटीत काम करणे आवश्यक असताना त्यांना कायद्याकडे दुर्लक्ष केले. पतसंस्थांच्या मोर्चाला मोर्चानेच प्रत्युत्तर देण्यात येईल, असे सांगितले. या प्रसंगी वकील अनिता दिघे, वकील राजेंद्र गडाख, राम धोत्रे, वकील श्रीराम वाघ, शफी जहागीरदार, वकील मनीषा पंडित आदी उपस्थित होते.

ख्रिश्चन समाजाची जमीन हडपण्याचा बिल्डरांचा प्रयत्न
गायकवाड यांचा आरोप
नगर, ९ मे/प्रतिनिधी

शहरातील तारकपूर परिसरातील ख्रिश्चन समाजाची जमीन पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून ताब्यात घेण्याचा प्रयत्न काही बिल्डर व्यावसायिकांनी चालवल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) जिल्हा कार्याध्यक्ष अशोक गायकवाड यांनी केला.
तारकपूर परिसरात वर्षांनुवर्षे राहणाऱ्या ख्रिश्चन कुटुंबीयांना विस्थापित करणाऱ्यांवर कारवाई करावी; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा गायकवाड यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात दिला. शहरातील ख्रिश्चनधर्मियांच्या जागा व जमिनी ताब्यात घेण्यासाठी बिल्डर लॉबी कार्यरत आहे. या प्रयत्नास काही पोलीस अधिकाऱ्यांचेही आशीर्वाद आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. मुस्लिमधर्मियांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी ज्याप्रमाणे वक्फ बोर्ड आहे, त्याच धर्तीवर ख्रिश्चनधर्मियांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र बोर्ड निर्माण करावे, अशी मागणीही गायकवाड यांनी केली.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विविध विकासकामांचा प्रारंभ
नगर, ९ मे/प्रतिनिधी

अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने सुमारे १ कोटी खर्च करून करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचा प्रारंभ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विनिता देशपांडे यांच्या हस्ते व उपाध्यक्ष झेव्हिअर भिंगारदिवे, बोर्डाचे सदस्य सुनील पतके यांच्या उपस्थितीत नुकताच करण्यात आला. गौतमबुद्ध स्मृती उद्यान व अण्णासाहेब शिंदे उद्यानमार्गे गवळीवाडा भागाकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण, भिंगारमधील सर्व उद्यानांचे सुशोभीकरण व देशभाल दुरुस्ती, प्रभाग ७मधील सफाईवाला क्वार्टर ते एम. जी. रोड रस्त्याच्या डांबरीकरणासह ड्रेनेज, गटारांची दुरुस्ती, इंटर लॉकिंग ब्लॉक बसविणे आदी विकासकामांचा यात समावेश आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्याचा बोर्डाचा मनोदय आहे. भिंगारचा पाणीप्रश्न, चटई क्षेत्राचा निर्देशांक वाढविणे, रिंगरोड, भुयारी गटार योजना या कामांसंदर्भात दिल्लीस्थित वरिष्ठ कार्यालयाकडे पुढील आठवडय़ात पाठपुरावा करणार असल्याचे श्री. पतके व भिंगारदिवे यांनी या वेळी सांगितले. कार्यक्रमाला बोर्डाचे वरिष्ठ अभियंता महेंद्र सोनवणी, अशोक फुलसौंदर, दराडे, पठाण, परवेज इनामदार, साके, अनिल कर्डिले आदी उपस्थित होते.

दोन हजारांची लाच घेताना कालवा निरीक्षकास पकडले
नगर, ९ मे/प्रतिनिधी

मुळा पाटबंधारे विभागातील कालवा निरीक्षक अशोक शंकर धाडगे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोन हजार रुपये लाच घेताना पकडले. काल दुपारी राहुरी येथे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी उंबरे (ता. राहुरी) येथील राजेंद्र नामदेव ढोकणे यांनी फिर्याद दिली. त्यांची आई गणाबाई नामदेव ढोकणे या मळगंगा पाणीवाटप संस्थेच्या अध्यक्ष आहेत. दि. २८ एप्रिल रोजी मुळा कालव्याला आवर्तन सुटले असून, कालवा निरीक्षक धाडगे यांनी पाणी कमी सोडले असा वरिष्ठांना रिपोर्ट पाठवितो. त्यामुळे बिल कमी येईल असे सांगून धाडगे यांनी ढोकणे यांच्याकडे दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. यानंतर ढोकणे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या विभागाच्या पथकाने अखेर धाडगे यांना लाचेचे दोन हजार रुपये घेताना पकडले. त्यांच्याविरुद्ध राहुरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांच्या या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक विजय धोपावकर, निरीक्षक राम सोमवंशी, राजेंद्र खोंडे, संजय तिजोरे, अरुण बांगर, रवींद्र पांडे, दशरथ साळवे यांनी भाग घेतला.

अंगारकी चतुर्थीनिमित्त दर्शनाची खास व्यवस्था
नगर, ९ मे/प्रतिनिधी

शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्रीविशाल गणेश मंदिरात दि. १२ मे रोजी होणाऱ्या अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांसाठी दर्शनाची खास व्यवस्था करण्यात आली आहे. वर्षांतून दोनदाच अंगारकी चतुर्थीचा योग येत असल्याने अभिषेक करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. हे लक्षात घेऊन दर्शनाचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांसाठी मंडप, पिण्याचे पाणी, जनरेटर आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. महिला पोलीस व पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. अंगारकीनिमित्त मंदिराचे प्रवेशद्वार सुशोभित करण्यात येणार असून, फुलांची सजावट केली जाणार आहे. मंदिराच्या जीर्णोद्धाराचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, दानशूर व्यक्तींनी जीर्णोद्धारासाठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन देवस्थानतर्फे अध्यक्ष जगन्नाथ आगरकर यांनी केले आहे.