Leading International Marathi News Daily

रविवार, १० मे २००९

मुलांना घडवताना..
संपूर्ण स्वातंत्र्य

प्रज्ञाशील अभियंता व्हावा, अशी घरातील सर्वाची ईच्छा होती परंतु, त्याचा कल त्या अभ्यासक्रमाकडे नव्हता. त्याला आयएएस व्हायचे होते. त्याच्या मनाप्रमाणे त्याला करू दिले. त्याला त्याच्या आवडीनुसार परीक्षेची तयारी करू दिली, असे सांगून प्रज्ञाशीलची आई कुसूम जुमळे म्हणाल्या, यवतमाळ जिल्ह्य़ात त्याचे शालेय शिक्षण झाले. त्याला विद्यार्थीदशेपासून वाचनाची आवड होती. ती त्याने पुढेही जोपासली. वाचन करतानाच पुस्तके विकत घेऊन घरीच लायब्ररी करण्याचा छंद त्याला जडला. फुले, शाहू, आंबेडकरी विचारांची पुस्तके आजही संग्रही आहेत. या विचारांचा आजही त्याच्यावर प्रभाव आहे. याशिवाय, चित्रकलेची आणि तबला वाजवण्याची आवडही त्याला लहानपणी होती. आता हे छंद मागे पडले आहेत. आयएएस परीक्षेची तयारी सुरू असताना त्याला घरातील सर्वांकडून प्रोत्साहन मिळाले. त्याचा आत्मविश्वास कायम राहील, असेच प्रयन सर्वानी केले. त्याच्या खाण्यापिण्याकडे लक्ष पुरवले, प्रकृतीला जपले तरीही त्याने जे यश मिळवले आहे, त्यामागे त्याची जिदद, परिश्रम आणि चिकाटी हे गुण आहेत. त्याने अहोरात्र परिश्रम घेतले. परीक्षेच्या तयारीसाठी स्वत:ला झोकून दिले. यामुळेच त्याला एवढे मोठे यश मिळू शकले.

वैष्णव जन तो तेणे कहिये रे..
चंद्रकांत ढाकुलकर

आपण सारे खरोखरच निलाजरे झालो आहोत का, असा प्रश्न आता पडला आहे. आपल्या आजुबाजूला काय काय गतिविधी होत आहेत, याचेही भान आपल्याला राहिलेले नाही, असे आता म्हणावेसे वाटते. आपण पुरेसे दांभिक आहोत, याची पुन्हा कुणाकडून खातरजमा करून घेण्याची गरज नाही. ही सारी उद्विग्नता येण्याचे कारण सेवाग्राममधील गांधी आश्रमाच्या विपन्नावस्थेकडे कुणाचेही लक्ष जाऊ नये, हे आहे. या विपन्नावस्थेकडे आपले कुणाचे लक्षच गेलेले नाही की, पाहून न पाहिल्यासारखे केले गेले, असाही प्रश्न आहे. सारे जग ज्यांच्या पायाशी लोळण घेत आहे त्या महात्मा गांधींच्या आश्रमाच्या जीर्णोद्धाराला वर्षांनुवर्षे कोणी वाली मिळू नये, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.

‘प्राचीन पुरुष’ नाबाद ६८!
संदीप देशपांडे, नागपूर, ९ मे

ग्रेस यांच्या कवितांसारखेच त्यांच्या व्यक्तिमत्वाभोवतीही गूढ असे वलय आहे.. या गूढ गर्तेत खोदकाम कराल तितके ग्रेस निसटत जातात.. ग्रेस हाती लागले अशी जाणीव होईपर्यंत ते दूर गेलेले असतात.. ग्रेस कळले असा समज करून घेणाऱ्याला ग्रेस अजून उरलेच आहेत, असेही वाटत राहते.. ग्रेसच ते! दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाला अनेकांच्या शुभेच्छा येतात. ग्रेस त्या स्वीकारतातच असे नाही पण, हा क्रम सुरू आहे. आजही इष्टमित्र अशीच चौकशी करताहेत पण, ग्रेस गावात नाहीत.

अजि मी ‘ब्रह्म’ पाहिला!
जयंत केळकर

प्रत्येक माणसाची आयुष्यात एकदा तरी आपल्या आवडत्या व्यक्तीला भेटण्याची इच्छा असते. कोणाला सचिनला, तर कोणाला लता मंगेशकरला, तर कोणाला चित्रपट तारे-तारकांना वगैरे. मी शास्त्रीय संगीताचा अत्यंत शौकीन तसेच हौशी सनई वादक, शीळ वादक आहे. माझी नुकतीच भारतरत्न पदवी मिळालेले शास्त्रीय संगीतातील भीष्मचार्य पंडित भीमसेन जोशी यांना त्यांच्या स्वगृही जाऊन भेटण्याची इच्छा पूर्ण झाली. प्रत्यक्ष देव भेटला तर माणसाला कसा आनंद होईल तसाच आनंद झाला व कित्येक दिवस पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले. पुण्याला मेव्हण्याकडे गेलो असता पंडितजींच्या घरी फोन करून, मी त्यांचा एक निस्सीम चाहता असून त्यांना भेटण्याची इच्छा त्यांच्या सूनबाईला सांगितली.

रिक्षा चालकाने दारुडय़ास भोसकले
नागपूर, ९ मे / प्रतिनिधी

अश्लील शिवीगाळ केल्याच्या कारणावरून रिक्षा चालकाने एका दारुडय़ास भोसकल्याची घटना बंगाली पंजा भागात शुक्रवारी रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास घडली. शेख अकिल अब्दुल रहमान हा त्याच्या घराजवळ दारूच्या नशेत स्वत:शी बडबड करीत होता़ जवळच रिक्षात आरोपी गुड्डू ऊर्फ पचपन शेख रमजान सायकल रिक्षामध्ये बसला होता़ शेख अकिल हा आपल्यालाच शिव्या देत आह़े, असे त्याला वाटल़े घरी जाऊन त्याने चाकू व भाल्याचे पाते आणले आणि त्याने शेख अकिलच्या छाती, पोट व गुप्तांगावर भोसकले. त्याला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर पळून गेलेल्या गुड्डू ऊर्फ पचपन शेख रमजान याच्याविरुद्ध पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला़ वाटमारी दुकान बंद करून घरी जात असलेल्या एका व्यापाऱ्यास लुटल्याची घटना जपानी गार्डनजवळ शुक्रवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. अनिल छागोमल केवलरामानी (रा़ जरिपटका) याचे वाडीमध्ये कापडाचे दुकान आहे. काल रात्री दुकान बंद करून तो बजाज चेतकने (एमएच/३१/एफ/२१५०) घरी जात होता. जपानी गार्डनकडे जात असता लुर्द माता मंदिर पुलाजवळ मोटारसायकलने आलेल्या दोन लुटारूंनी त्याच्या खांद्यावरील बॅग िहसकून पळ काढला. त्यात ७० हजार रुपये होते. गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आह़े

सविता हरकरे यांचा ‘लोकसत्ता’ कार्यालयात सत्कार
नागपूर, ८ मे/ प्रतिनिधी

रामनाथ गोयनका फाऊंडेशनचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार सविता विक्रम हरकरे यांचा ‘लोकसत्ता’च्या नागपूर कार्यालयात नुकताच सत्कार करण्यात आला.
दै. लोकमतच्या वरिष्ठ उपसंपादक पदावर कार्यरत असलेल्या सविता हरकरे यांना नुकताच नवी दिल्लीत झालेल्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. एच.आय.व्ही-एड्स या विषयावरील लेखनासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. या कामगिरीबद्दल इंडियन एक्सप्रेस वृत्तसमूहातर्फे सविता हरकरे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीचे संपादक प्रवीण बर्दापूरकर यांनी सविता हरकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सत्काराच्या उत्तरात हरकरे यांनी वरिष्ठांकडून वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. याप्रसंगी इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र समूहाच्या नागपूर कार्यालयातील उपमहाव्यवस्थापक (जाहिरात) बी.के. ख्वाजा, वितरण व्यवस्थापक वीरेंद्र रानडे, मनुष्यबळ विकास विभागाचे व्यवस्थापक रमेश चरडे, वृत्तसंपादक चंद्रकांत ढाकुलकर आणि संपादकीय विभागातील इतर सहकारी उपस्थित होते.