Leading International Marathi News Daily

रविवार, १० मे २००९

सेझविरोधात आंदोलन तीव्र
अनिरुद्ध भातखंडे

शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी विकासाच्या नावाखाली भांडवलदारांच्या घशात घालण्याचा डाव राजरोस खेळला जात आहे. कृषिप्रधान देशाचा शेतकरी सरकारच्या या अन्यायाकारक धोरणामुळे एकाकी पडत चालला आहे. त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पनवेल आणि उरणमध्ये येऊ घातलेल्या सेझ प्रकल्पांमुळे तालुक्याची ‘भाताचे कोठार’ अशी आजवर असणारी ओळख नामशेष होण्याची भीती आहे. इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर ‘अब कोई गुलशन न उजडे, अब वतन आझाद है’ या शब्दांत प्रतिभासंपन्न कवी शाहीर लुधियानवी यांनी भावना व्यक्त केल्या होत्या. त्यांचे हे स्वप्नरंजन कवीकल्पनेपुरतेच मर्यादित राहील, याची पुरेपूर काळजी राजकारण्यांनी घेतली.

संस्कृतप्रेमी डॉ. गं. के. गुर्जर
संस्कृत पंडित, लेखक, उत्तम शिक्षक, संशोधक, अभ्यासक, उत्तम वक्ता, चांगला ज्योतिषी आणि उत्तम आयुर्वेद तज्ज्ञ असे अष्टपैलु व्यक्तिमत्त्व म्हणजे स्व. प्रा. डॉ. गं. के. गुर्जर. त्यांच्या निधनाला अलिकडेच दहा वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनपटाचा घेतलेला हा छोटासा आढावा.
भगवान मंडलिक
डॉ. गं. के. गुर्जर यांचा जन्म सोलापूर येथे एका सधन कुटुंबात झाला होता. आजोबा(आईचे वडिल) संस्कृत पंडित होते. तोच वारसा डॉ. गुर्जर यांच्याकडे आला. वडिलांच्या निधनानंतर गुर्जर यांना काही काळ गरीबी, कष्ट सहन करावे लागले. उपजत संस्कृतचे ज्ञान आणि एकपाठी बुध्दी असल्याने शाळेमध्ये शिकण्यापेक्षा गुरूजींच्या चुका काढण्यात त्यांचा वेळ जात असे.

घारापुरी बेटावरील ऐतिहासिक तोफा दुर्लक्षितच
मधुकर ठाकूर

घारापुरी लेणी जगविख्यात आहेत. या लेण्यांमुळे घारापुरी बेटाला महत्त्व प्राप्त झाले असले तरी त्यापूर्वीही या बेटाला व्यापारी महत्त्व होते, याची इतिहासात साक्ष आहे. अशा या ऐतिहासिक बेटावर ब्रिटिशकालीन शंभर वर्षांहून अधिक काळातील अजस्त्र दोन तोफा आहेत. एकीकडे प्राचीन लेण्या जतन करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र केंद्र सरकारच्याच संरक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या तोफांकडे अक्षम्य दुर्लक्षच केले जात आहे. यामुळे ऐतिहासिक दुर्मिळ ठेवा काळाच्या ओघात नामशेष होतो की काय अशीच भीती वाटू लागली आहे.

मकरंद अनासपुरे आता गंभीर भूमिकेत
सुनील डिंगणकर

‘सातच्या आत घरात’पासून मकरंद अनासपुरेने सुरू केलेली हसवणूक आजतागायत अखंडपणे सुरू आहे. मराठवाडी बोलीत संवादफेक करणाऱ्या या अभिनेत्याचा स्वत:चा असा एक प्रेक्षकवर्ग तयार झाला आहे. गेल्या जवळपास सर्वच चित्रपटांत मकरंद केवळ विनोदी भूमिकांमध्येच दिसला. आता मात्र विनोदी अभिनेत्याच्या प्रतिमेला छेद देत ‘गोष्ट छोटय़ा डोंगराची’ या चित्रपटात मकरंद ‘सुशिक्षित शेतकऱ्या’च्या गंभीर स्वरूपाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची संकल्पना मकरंदचीच आहे. त्याने सांगितले की, ‘गोष्ट छोटय़ा डोंगराची’मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येचा विषय हाताळला आहे. मी स्वत: ग्रामीण भागातून आल्यामुळे हा प्रश्न मी जवळून पाहिलेला आहे. एक कलाकार म्हणून हा प्रश्न चित्रपटाच्या माध्यमातून मांडावासा वाटला. गेली पाच वर्षे मी या कथेवर काम करत होतो. त्यातूनच हा चित्रपट आकारास आला. सातत्याने केवळ विनोदी भूमिका का स्वीकारल्यास, असे विचारल्यावर तो म्हणाला की, मला गंभीर भूमिका वज्र्य नाहीत. पण गंभीर भूमिकांसाठी मला कधी विचारणाच झाली नाही. खास अनासपुरे शैलीत तो म्हणतो की, आता मात्र मी माझी विनोदी प्रतिमा बॉम्ब लावून उडवून टाकण्याचे ठरविले आहे. ‘गोष्ट..’मधील भूमिकेविषयी विस्तृतपणे माहिती देताना त्याने सांगितले की, हा शिकलेला, कृषि विषयातील पदवी घेतलेला शेतकरी आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येमुळे तो अत्यंत व्यथित होतो आणि या आत्महत्त्या का होत आहेत, याचा शोध घेऊ लागतो. मकरंद अनासपुरेची ओळख केवळ एक विनोदी अभिनेता म्हणून असली तरी त्याने यापूर्वी एकांकिकांचे दिग्दर्शनही केले आहे. ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’च्या निमित्ताने त्याने मराठी निर्मितीक्षेत्रात पाऊल ठेवले. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘गोष्ट छोटय़ा डोंगराची’ या चित्रपटाची निर्मितीतही मकरंदचा सहभाग आहे. ‘गल्लीत गोंधळ..’च्या टीममधील बहुतेक कलाकार ‘गोष्ट..’मध्ये आहेत. सयाजी शिंदे, नागेश भोसले त्याचप्रमाणे निळू फुले, माधुरी जुवेकर यांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन नागेश भोसलेने केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने शेतक ऱ्यांच्या सद्यपरिस्थितीवर भाष्य करण्यात आले असून हा चित्रपट सर्वानी पाहावा, अशी इच्छा असल्याचे मकरंद म्हणाला. येत्या ऑगस्ट महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. प्रदर्शनाच्या मार्गावर असलेल्या ‘गृहलक्ष्मी’ आणि ‘चंदा’ या चित्रपटांमध्येही मकरंदने आपली विनोदी भूमिकांची चोकारी मोडली आहे. गंभीर स्वरूपाच्या भूमिका स्वीकारून मकरंदने इमेज बदलण्याचे आव्हान स्वीकारले आहे. त्या आव्हानाचे यश मात्र प्रेक्षकांवर अवलंबून आहे. अभिनय, निर्मिती यानंतर दिग्दर्शनाची संधी मिळाल्यास त्या क्षेत्रातही मुशाफिरी करण्याचा मानस मकरंदने ‘वृत्तान्त’शी बोलताना व्यक्त केला.