Leading International Marathi News Daily
रविवार, १० मे २००९
(सविस्तर वृत्त)

घारापुरी बेटावरील ऐतिहासिक तोफा दुर्लक्षितच
मधुकर ठाकूर

घारापुरी लेणी जगविख्यात आहेत. या लेण्यांमुळे घारापुरी बेटाला महत्त्व प्राप्त झाले असले तरी त्यापूर्वीही या बेटाला व्यापारी महत्त्व होते, याची इतिहासात साक्ष आहे. अशा या ऐतिहासिक बेटावर ब्रिटिशकालीन शंभर वर्षांहून अधिक काळातील अजस्त्र दोन तोफा आहेत.
एकीकडे प्राचीन लेण्या जतन करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजनांची

 

अंमलबजावणी केली जात आहे. मात्र केंद्र सरकारच्याच संरक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या तोफांकडे अक्षम्य दुर्लक्षच केले जात आहे. यामुळे ऐतिहासिक दुर्मिळ ठेवा काळाच्या ओघात नामशेष होतो की काय अशीच भीती वाटू लागली आहे.
घारापुरी बेट हे इसवी सन १६ व्या शतकापासून व्यापारी केंद्र म्हणून गणले गेले आहे. बेटावर सापडलेल्या वस्तू, नाणी व खापरांचे अवशेष यावरून घारापुरी हे त्या काळात भरभराटीस आलेले महत्त्वाचे बंदर असल्याच्या नोंदीही इतिहासात आढळतात. सातवाहन काळात तर महत्त्वाचे व्यापारी केंद्र असलेल्या बेटाशी रोमन, ग्रीक, अरबी व्यापारी संपर्क ठेवून होते. रुद्रसिंह व रुद्रसेन या क्षत्रपांचाही या घारापुरी बेटावर अंमल होता. समुद्रमार्गे व्यापार करण्यासाठी मुंबईजवळचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र बनलेले घारापुरी बेट ताब्यात मिळविण्यासाठी राजवंशीयांमध्ये त्या काळी भलतीच चुरस लागलेली होती.
ऐहोली जिल्हा विजापूर-कर्नाटक येथे सापडलेल्या शिलालेखात त्या काळी महत्त्वाचे व्यापारी केंद्र बनलेल्या घारापुरी बेटाचा उल्लेख ‘पश्चिम सागराची लक्ष्मी’ असा केला आहे. अशा या व्यापारी बेटाचा कब्जा मिळविण्यासाठी हर्षवर्धनचा पराभव करणाऱ्या सत्याश्रय श्रीपृथ्वीवल्लभ महाराज पुलकेशी याने शेकडो जहाजांचे आरमार घेऊन घारापुरी बेटावर हल्ला करून त्यावेळचा तेथील राजा सुकेतुवर्मा मौर्य याचा पराभव केला आणि ताबा मिळविला. त्यामुळेच अपरान्त प्रांत आपल्या राज्यास जोडून पुलकेशीला गोकर्ण ते गुजरातपर्यंतच्या सलग समुद्रकिनाऱ्यावर अंमल बसविता आला. उत्तर कोकणच्या शिलाहारांचे इ.स. नवव्या शतकात अपरान्तावर राज्य होते. त्यांची मुख्य राजधानी ठाणे येथे तर उपराजधानी मंगलपुरी म्हणजेच घारापुरी येथे होती. या घराण्याचा शेवटचा राजा सोमेश्वर याचा पराभव करून यादवांनी पुरीचा मुलुख देवगिरीच्या राज्यास जोडला. सन १५३४ मध्ये घारापुरी बेट पोर्तुगीजांनी काबीज केले. पुढे शिवाजी महाराजांच्या काळात बेट मराठय़ांनी जिंकून घेतले होते. त्यानंतर इ.स. १७७४ मध्ये घारापुरी बेट इंग्रजांनी ताब्यात घेतले. १९४७ पर्यंत घारापुरी बेटाचा ताबा इंग्रजांकडेच होता.
इतिहास काळापासूनच महत्त्वाचे व्यापारी केंद्र बनलेल्या घारापुरी बेटाच्या व मुंबईच्या रक्षणासाठी इंग्रजांनी १९०४ व १९१७ साली दोन प्रचंड लोखंडी तोफा घारापुरी माथ्यावर बसविल्या. उत्तर-दक्षिण दिशेला बसविण्यात आलेल्या दोन्ही अजस्त्र तोफांना समांतर भुयारी मार्गही बनविले. तसेच दारूगोळा ठेवण्यासाठी व पुरविण्यासाठी खंदकही खोदले.
साधारणत: सव्वा दोन फूट व्यासाच्या व सुमारे १८ ते २० फूट लांबीच्या तोफा पुढे एक फूट व्यासापर्यंत निमुळत्या होत गेल्या आहेत. चहुबाजूने गोळाबारी करण्याची सोय असलेल्या तोफा पोलादी आहेत. खंदक व भुयारी मार्गात प्रकाश व हवा मिळावी यासाठी जमिनीच्या उंचावर दीड-दोन फुटाचे झरोकेही (व्हेन्टिलेशन) ठेवण्यात आले आहेत. मात्र ऐतिहासिक दोन्ही तोफांपैकी एका तोफेवर १९०५ तर दुसऱ्या तोफेवर १९०६ असे कोरण्यात आले आहे. यामुळे इतिहासकारांमध्येच संभ्रम आहे.
घारापुरी बेटाबाबतही इतिहास संशोधकांमध्ये मतभेद आहेत. पुरी म्हणजे घारापुरी नव्हे, तर रत्नपुरी होय असे काही संशोधकांचे म्हणणे आहे, तर घारापुरीचा विस्तार राजधानीला शोभेल एवढा नाही व तेथे किल्लाही नाही असे काही संशोधकांचे म्हणणे आहे. काही संशोधकांकडून घारापुरी हे नाव गिरीपुरी या नावापासून निघाले असावे तर काही संशोधकांच्या मते अग्रहारपुरीचे घारापुरी झाले असावे, असा तर्क मांडतात. मात्र घारापुरी बेट इतिहास काळापासूनच व्यापारी केंद्र असल्याबाबत बहुतांश संशोधकांचे एकमत आहे.
अशा या ऐतिहासिक घारापुरी बेटावरील ब्रिटिशकालीन दुर्मिळ तोफा जतन करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे.
एकीकडे केंद्र सरकार घारापुरी लेण्यांच्या सुरक्षिततेसाठी व लेण्या जतन करण्यासाठी कोटय़वधी रुपयांचा निधी खर्च करते, तर दुसरीकडे केंद्राच्याच संरक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या तोफांकडे अक्षम्य दुर्लक्ष करते, हे संरक्षण विभागाला नक्कीच भूषणावह नाही. मध्यंतरीच्या काळात तोफा परिसर सुशोभित करून पर्यटकांना आकर्षित करण्याची योजना ग्रामपंचायतीने आखली होती. मात्र तीही योजना फक्त कागदावरच मर्यादित राहिली. संरक्षण विभागाने दुर्लक्षित शंभरीच्या तोफा जतन करण्यासाठी वेळीच उपाययोजना न केल्यास ऐतिहासिक दुर्मिळ, राष्ट्रीय ठेवा दृष्टीआड जाण्याचीच भीती अधिक आहे.