Leading International Marathi News Daily

रविवार, १० मे २००९

राज्य

साहित्य संस्थांमध्ये युवकांना
संधी द्यावी - विश्वास पाटील
रत्नागिरी, ९ मे/खास प्रतिनिधी

मराठी साहित्याची परंपरा अखंडित चालू ठेवायची असेल तर साहित्य संस्थांमध्ये युवा पिढीला काम करण्याची संधी दिली पाहिजे, अशी सूचना कादंबरीकार विश्वास पाटील यांनी केली.
मालगुंड येथे ११ व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाला आज प्रारंभ झाला. याप्रसंगी अध्यक्षपदावरून बोलताना पाटील म्हणाले, ‘कॅच देम यंग’ हे सूत्र जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये स्वीकारण्याचा आज प्रयत्न दिसतो, पण साहित्य क्षेत्र याला अपवाद आहे. येथे बरीचशी मंडळी पन्नाशी किंवा साठी ओलांडलेली दिसून येतात. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांपैकी बहुतेकांनी सत्तरी ओलांडली आहे. अशा ज्येष्ठांचा अनुभव निश्चितपणे उपयुक्त असतो, पण त्याचबरोबर ही साहित्य परंपरा अखंडितपणे पुढे चालवायची असेल तर युवा पिढीलाही अशा संस्थांच्या कामामध्ये सहभागी करून घेतले पाहिजे. राजकारणी मंडळींची पुढची पिढी आज राजकारणामध्ये दिसते, पण साहित्यामध्ये तशी वंशपरंपरागत संधी मिळू शकत नाही. येथे साहित्यिक गुणवत्ता सिद्ध करावी लागते, असा टोमणाही पाटील यांनी मारला.
मराठी भाषेच्या प्रसारासाठी अमेरिकेत झालेल्या विश्व साहित्य संमेलनासारखे उपक्रम उपकारक असल्याचे मत व्यक्त करून ते म्हणाले की, मात्र सध्याच्या साहित्य संस्थांमध्ये अधिक लोकशाहीकरणाची गरज आहे. अन्य भारतीय भाषांमधील साहित्य राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी ठरते, पण मराठी साहित्याच्या वाटय़ाला हा सन्मान क्वचितच येतो, खरे तर येथेही उत्कृष्ट साहित्यनिर्मितीला भरपूर वाव आहे, त्यादृष्टीने ग्रामीण व दलित लेखकांनी भोवतालच्या स्थित्यंतरांचा सजगपणे वेध घेणारी साहित्यनिर्मिती करावी, अशी सूचना पाटील यांनी केली.
संमेलनाचे उद्घाटक डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी समाजाची संवेदनशीलता व सहिष्णुता झपाटय़ाने कमी होत असल्याबद्दल खंत व्यक्त केली, तसेच अध्यक्षाविना झालेल्या महाबळेश्वरच्या साहित्य संमेलनाबाबतही नापसंती नोंदवली.
मनुष्यत्वाचे आत्मभान असणे हे साहित्याचे उद्दिष्ट असले पाहिजे, असे मत व्यक्त करून ‘अस्मितादर्श’कार गंगाधर पानतावणे म्हणाले की, समीक्षेचे काम मराठीमध्ये फारशा उत्साहाने होत नाही. निकोप वाङ्मयीन दृष्टीचाही येथे अभाव दिसतो. खरे तर साहित्याला प्रवाही ठेवण्याचे काम समीक्षेत करायला हवे. पण मराठी समीक्षेमध्ये तसा मनाचा मोकळेपणा दिसत नाही. कै. दि. के. बेडेकर, नरहर कुरुंदकर, शरच्चंद्र मुक्तिबोध यांच्या साहित्यासारखी समृद्ध वैचारिक वाङ्मयनिर्मितीही होताना दिसत नाही. त्यामुळे साहित्य, समाज आणि संस्कृतीबाबतचे येथील विचारवंतांचे आकलन थिटे झाले आहे काय, अशी शंका येते.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक मधु मंगेश कर्णिक यांनी आपल्या मनोगतामध्ये मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यपद्धतीवर टीका करून यापुढे महामंडळाची संलग्नता न मागण्याचा निर्णय ‘कोमसाप’ने घेतला असल्याचे जाहीर केले. ‘कोमसाप’चे कार्याध्यक्ष महेश केळुसकर यांनी प्रास्ताविक केले, तर नवनिर्वाचित अध्यक्ष भास्करराव शेटय़े यांनी भावी काळातही ‘कोमसाप’च्या उद्दिष्टांना अनुसरून वाटचाल करण्याची ग्वाही दिली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष रमेश कीर यांनी याप्रसंगी बोलताना कोकण मराठीकोश तयार करण्याची सूचना करून त्यासाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. प्रसिद्ध कवी अशोक बागवे आणि चौगुले कंपनीतर्फे प्रत्येकी एक लाख रुपयांची देणगी ‘कोमसाप’ला देण्यात आली.
नाना मयेकर यांनी आभार मानले. प्रमोद पवार यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संमेलनाचा समारोप रविवारी होणार असून त्यामध्ये सकाळच्या सत्रात संमेलनाध्यक्ष पाटील यांची प्रकट मुलाखत ‘लोकप्रभा’चे संपादक प्रवीण टोकेकर आणि प्रा. बागवे घेणार आहेत.