Leading International Marathi News Daily
रविवार, १० मे २००९
(सविस्तर वृत्त)

महेश विचारे
मारणाऱ्यापेक्षा तारणारा खूप मोठा असतो, अशी एक म्हण आपण ऐकत आलो आहोत. एखाद्या थरारक क्षणी किंवा समरप्रसंगात अशा म्हणीचा आपण अनुभव घेत असलो तरी केवळ रणांगणात नव्हे तर क्रीडांगणातही ही म्हण तंतोतंत लागू पडते. समोर मोठं आव्हान असताना, त्या सामन्यातील भवितव्याची खात्री नसताना असे तारणहार प्रकट होतात आणि प्रतिस्पध्र्याच्या स्वप्नांचा चुथडा करून टाकतात. दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर

 

लीगच्या क्रीडांगणावरील रणधुमाळीत असेच अनेक तारणहार विविध संघांचे आधारस्तंभ ठरले आहेत. अर्थात, अशा तारणहारांच्या शोधात याच आयपीएलमधील काही संघही आहेत, पण त्यांच्या दुर्दैवाने त्यांना अशा खेळाडूंचा आधार मिळू शकलेला नाही.
अशा या तारणहार खेळाडूंचा विचार करताना पटकन नजरेसमोर येणारं नाव कुणाचं असेल? अगदी बरोब्बर! युसूफ पठाण. शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाची मुलुखमैदानी तोफ म्हणजे हा युसूफ पठाण. तुम्ही कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धचा सुपर ओव्हपर्यंत रंगलेला सामना आठवा. एका षटकात १६ धावा करायच्या असताना वॉर्नला तारणहाराच्या रूपात एकच नाव डोळ्यांपुढे दिसत होतं, ते या पठाणचंच. वीरश्री संचारलेल्या पठाणनेही मग दोन षटकार, एक चौकार लगावून गोलंदाज मेंडिसला त्याच्याच कॅरम बॉलप्रमाणे टिचकीतच उडवून टाकलं. षटकार, चौकारांची आतषबाजी करीत समोरच्या संघासाठी ‘होत्याचं नव्हतं’ करण्याची ताकद असलेला हा खेळाडू.
ज्या शेन वॉर्नचा प्रमुख शिलेदार म्हणून पठाणचं नाव घेतलं जातं, तो शेन वॉर्नही स्वत: राजस्थान संघाचा कर्ताधर्ता आहे. केवळ संघाचा कर्णधारच नव्हे तर प्रशिक्षक म्हणूनही वॉर्नचं महत्त्व वादातीत आहे. निवृत्तीनंतरही ज्या कल्पकतेने तो संघातील खेळाडूंचा वापर करतो, त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास टाकण्याचा धोका पत्करतो. स्वत: आपल्या ख्यातनाम फसव्या फिरकीने प्रतिस्पर्धी फलंदाजांची तारांबळ उडवतो आणि या वयातही तरुण खेळाडूंना लाजवणारी क्षेत्ररक्षणातली चपळता दाखवतो तो शेन वॉर्न मैदानावर असताना प्रतिस्पध्र्याना ‘वॉर्न’ (इशारा) करत असतो.
चेन्नई सुपरकिंग्ज म्हणजे आपल्या ‘माही’चा संघ. माही जेव्हा भारतीय संघात आला तेव्हा त्याच्या फलंदाजीमुळे ‘धोनीपछाड’ हा नवा शब्द रूढ होऊ लागला, पण ट्वेन्टी-२० क्रिकेटसारख्या झटपट क्रिकेटमध्ये त्याला फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. मात्र कर्णधार म्हणून तो चेन्नईच्या जहाजाची कप्तानी अगदी उत्तमरीत्या निभावत आहे. त्याच्यातल्या कप्तानीच्या वेगळ्या खुबीमुळे गेल्या वर्षीही त्याचा संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. यंदाही चेन्नईचा अश्वमेध चौखूर उधळला आहे. शेन वॉर्नला जसा पठाणचा आधार आहे तसाच धोनीची ‘मास्टर की’ आहे, सुरेश रैना. बघता बघता समोरच्या संघाची दैना करण्याची ताकद असणारा हा खेळाडू आहे. संघाला सावरतानाच प्रतिस्पध्र्याना आवरण्याची कला त्याला चांगली अवगत आहे. त्याच्या फलंदाजीत दम आहेच. पण कामचलाऊ गोलंदाज म्हणून तो आपलं काम चोख बजावतो. परवा पंजाबच्या फलंदाजांना त्याने असं काही जखडलं की, सामना जिंकण्याचं त्यांचं स्वप्न हवेतच विरून गेलं. समोरच्या गोलंदाजांना अगदी हाडतूड करणारा मॅथ्यू हेडन याच संघातला. त्या ब्रेकडान्सर श्रीशांतला त्याने दिलेली तडी आठवते ना? श्रीशांतचं ‘अशांत’ मध्ये रूपांतर व्हायला वेळ लागला नव्हता. हेडनने तीन वेळा त्याला सीमापार भिरकावून दिलं होतं. अशा हेडनच्या वाटेला जाईल कोण?
डेक्कन चार्जर्सच्या संघाला तर गिलख्रिस्ट, गिब्स, रोहित शर्मा असे त्रिरत्न लाभले आहे. गिलख्रिस्टच्या आवेशामुळे गोलंदाजाच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्याचा ताजेतवानेपणा भुर्रकन उडून जातो. रोहितने तर परवा हॅट्ट्रिक घेऊन आपल्यातल्या उपयुक्त गोलंदाजाचीही ओळख करून दिली होती.
दिल्ली डेअरडेव्हिल्सची डेअरिंग भलतीच वाढली आहे. न्यूझीलंड दौऱ्यात स्पर्धेत सर्वोत्तम ठरलेला ‘गौती’ ऊर्फ गौतम गंभीर, ए. बी. डिव्हिलियर्स, वॉर्नर, दिलशान हे दिल्लीची शान आहेत. आता तर या संघाने टिपटॉप कामगिरी केली आहे.
पंजाबच्या किंग्ज इलेव्हनचा बराचसा भरवसा आहे तो कर्णधार युवराजवर. प्रतिस्पध्र्याना यथेच्छ चोप देण्याची क्षमता केवळ युवराजमध्ये आहे. याबाबतीत तो युवराज नव्हे तर किंगच आहे. ट्वेन्टी-२० वर्ल्ड कपमध्ये त्याने मारलेले एकाच षटकातील सहा षटकार आठवत असतील. गोलंदाजांमध्ये अजूनही त्याची ती दहशत कायम आहे.
फलंदाज जसे संघाच्या मदतीला धावून येत आहेत तशीच जबाबदारी काही गोलंदाजही पार पाडत आहेत. डेक्कनचा आर. पी. सिंग, पंजाबचा डावखुरा युसूफ अब्दुल्ला, मुंबई इंडियन्सचा भेदक मलिंगा, दिल्लीचा नॅन्स आणि मुरलीसारखा ‘दुसरा’ कुणीच नाही. प्रतिस्पर्धी फलंदाजीला अचूक खिंडार पाडण्यात ही मंडळी तरबेज मानली जातात. दुर्दैवाने, बंगलोर रॉयल चॅलेंजर्स, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स यांना असे खेळाडू लाभलेले नाहीत. या आधाराशिवाय या संघांचा डोलारा डगमगायला लागला आहे. कोलकात्याने तर तळ गाठला आहे. मुंबई इंडियन्सचीही सातत्याच्या पराभवामुळे तळपायाची आग मस्तकात गेली आहे. मल्ल्या यांच्या नावात ‘विजय’ असला तरी संघ मात्र पराभवाच्याच छायेत अधिक असतो. पुढच्या वर्षी खेळाडूंची निवड करताना असे आधार देणाऱ्या खेळाडूंची संघात वर्णी लागली तरच त्यांना यशाची ‘बोली’ बोलता येईल. या संघांना तारणारा कुणी सापडेल का?