Leading International Marathi News Daily
रविवार, १० मे २००९
(सविस्तर वृत्त)

विनायक दळवी
काळानुरूप सगळ्याच गोष्टी बदलत जातात. तत्त्व, नीतिमूल्ये, संकेत गुंडाळून नव्याच्या ध्यासाने पछाडलेल्यांनी प्रत्येक क्षेत्रात असे बदल केले. क्रिकेटही याला अपवाद ठरले नाही. क्रिकेटच्या व्यावसायिक लाभाचा फायदा उठवून आयपीएल क्रिकेट साखळी सुरू करण्यात आली. भारतीयांचे प्रचंड पाठबळ आणि त्यामुळे जाहिरातदारांच्या पडलेल्या उडय़ांमुळे क्रिकेटचा हा ‘बोन्साय’ अवतार खेळाडू आणि क्रिकेट संघटकांमध्ये सर्वाधिक आवडीचा ठरला.
प्रेक्षकांनीही या तीन तासांच्या करमणुकीला डोक्यावर घेतले. पहिल्या आवृत्तीत फटक्यांची

 

आतषबाजी, फलंदाजांनी शोधून काढलेले काही नवे फटके पाहायला मिळाले. या आतषबाजीला मैदानाबाहेरच्या फटाक्यांची आतषबाजीही साथ द्यायला लागली. सांस्कृतिक कार्यक्रम सामन्यांमध्ये पेरण्याची कल्पना यशस्वी झाली नाही, पण ‘चीअर गर्ल्स’ मात्र आकर्षणाचा बिंदू ठरल्या. भारतातील निवडणुकांमुळे ही स्पर्धा देशाबाहेर गेली. आफ्रिकेत काही बंधने शिथिल झाल्यामुळे काही संघांच्या चीअर गर्ल्सच्या अंगावरील कपडय़ांमध्ये आणखी काटकसर करण्यात आली. सामना संपल्यानंतर होणारी फटाक्यांची आतषबाजी प्रत्येक फटक्यानंतर व्हायला लागली.
फटक्यांचा आनंद चीअर गर्ल्स नाचून व्यक्त करीत असतानाच आकाशातील रंगांची उधळण क्रिकेट वेगळ्याच उंचीवर नेत होते.
आयोजकांनी क्रिकेटमध्ये असे वेगवेगळे रंग भरण्यास सुरुवात केली. क्रिकेटपटूही या स्पर्धेत कसे मागे राहतील. क्रिकेटपटूंनीही धडक-बेधडक क्रिकेटच्या या अवतारात नवनवे रंग भरले. काही खेळाडूंनी क्रिकेट बॅटचा आकार बदलला. काही खेळाडूंनी क्रिकेट बॅटचे वजन वाढविले. काहींनी बॅटच्या लाकडात बदल केला. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने तर बॅटचे दोन्ही भाग सारखेच ठेवून त्या बॅटचा दुधारी शस्त्राप्रमाणे वापर केला. त्यामुळे बॅटच्या दोन्ही बाजूंनी फटके मारता यायला लागले. युवराजसिंगने बॅटचे लाकूड वेगळे वापरले. ज्यामुळे सीमारेषेपलीकडे मारलेला चेंडूही आणखी दूरवर जायला लागला. त्यामुळे ‘ट्वेन्टी-२०’ क्रिकेटमध्ये फक्त षटकारांची रंगत राहिली नाही तर मारलेला चेंडू प्रेक्षकांमध्ये किती दूरवर जाऊन पडला ते अंतरही मोजता यायला लागले. ते अंतर स्क्रीनवर झळकताच क्षणी प्रेक्षकांचे चित्कार क्रिकेटला एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेले. काही षटकार तर स्टेडियमच्या पलीकडे गेले. चेंडू हरविल्यानंतरचा आनंद त्या फलंदाजांच्या मनगटाच्या ताकदीला कुर्निसात करायला लागला. प्रत्येक फलंदाजाच्या मनगटात युसूफ पठाण किंवा युवराजसिंग, ख्रिस गेल यांची रग असेलच असे नाही पण छोटय़ा चणीच्या खेळाडूंनी काही कलात्मक फटके शोधून काढले. रिव्हर्स स्वीपचा फटका आता सर्वजण खेळतात. पण पॅडल स्वीपसारखा फटका सचिन तेंडुलकरने आणखी परिपूर्ण केला.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत आणखी एक नवा फटका पाहायला मिळाला. तो फटका म्हणजे यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू स्कूप करून मागे मारणे; हा फटका खूपच परिणामकारक झाला कारण यष्टीपाठी कुणीही क्षेत्ररक्षक नसतो. फाईन लेग व थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक तेथे पोहोचेपर्यंत बऱ्याच वेळा चेंडू सीमापार होतो. त्याचा लाभ घेण्याची प्रवृत्ती आता वाढली आहे.
एकेरी-दुहेरी धावा पळण्यापेक्षा आता मोठे फटके खेळण्यावर अधिक भर दिला गेला आहे. उत्तम क्षेत्ररक्षणामुळे चौकारांची संख्या घटली आहे, त्यामुळे चेंडू उचलून सीमारेषेपलीकडे मारण्याची प्रवृत्ती वाढली आहे. नवोदित फलंदाजांनीही यात आघाडी मारली आहे.
फलंदाजांनी आपली शस्त्रे परजली असतानाच गोलंदाजही नव्या युक्त्या शोधत होते. रिव्हर्स स्विंग, यॉर्करप्रमाणे अधिक परिणामकारक चेंडू टाकण्याकडे प्रवृत्ती झुकली आहे. ‘बाऊन्स’च्या मर्यादेमुळे बाऊन्सर चेंडू वाईड दिला जाण्याचा धोका आहे, पण गोलंदाजांनी त्यावर मात करून नवा ‘स्लो बाऊन्सर’ चेंडू विकसित केला आहे. या स्लो बाऊन्सरमुळे यंदाच्या स्पर्धेत अनेक ‘सेट’ झालेल्या फलंदाजांची लय बिघडविली आहे.
क्षेत्ररक्षणातही असेच नवे बदल झाले आहेत. षटकार जाणारा सीमारेषेनजीकचा चेंडू हवेत उडवून पुन्हा आत येत तो झेलण्याचा प्रयत्न आता केला जात आहे. स्वत:ला झोकून देणारे क्षेत्ररक्षक वाढले आहेत.
एकूण काय, क्रिकेट अधिक वेगवान, अधिक आकर्षक, अधिक दिलखेचक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी क्रिकेटच्या नियमांना बगल देण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.