Leading International Marathi News Daily
रविवार, १० मे २००९
(सविस्तर वृत्त)

प्रसाद लाड
युवा हे देशाचे भविष्य आहेत. या युवांमधल्या सुप्त गुणांना वाव दिल्यास, योग्य मार्गदर्शन केल्यास, त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास देशाचे भविष्य उज्ज्वल ठरू शकते. यासाठी त्यांच्यामध्ये असलेल्या ऊर्जा, सर्जकता, नावीन्य यांना योग्य तो मार्ग दाखवायला हवा. हिरा प्राथमिक घडीला अगदी कवडीमोलाचा वाटतो, पण त्याला योग्य तो आकार दिल्यानंतर त्याची किंमत लाखमोलाची होते, असंच काहीसं युवांबद्दल असतं. मग ते युवा कोणत्याही क्षेत्रातील असो. राजकारण, अर्थकारण, कला किंवा अगदी क्रिकेटचेच उदाहरण घ्या ना. आयपीएल हे युवा खेळाडूंना मिळालेले फार मोठे व्यासपीठ आहे, जिथून त्यांना राष्ट्रीय संघाचे दरवाजे खुले होऊ शकतात. यावर्षी

 

आयपीएलने बरेच युवा खेळाडू आपल्याला दिले आहेत, ज्यांची नावे कदाचित यापूर्वी तुम्हाला माहीतही नसतील. यापूर्वी कामरान खान, शादाब जकाती, नमन ओझा, युसूफ अब्दुल्ला ही नावे तुमच्या गावीही नसतील, पण कामगिरीच्या जोरावर हे युवा खेळाडू प्रकाशझोतात आले आहेत. त्यामुळे अनोळखी असलेल्या या युवा मंडळींची तुम्हाला ओळख करून देण्याचा हा प्रयत्न.
आझमगढचा कामरान खान हा अवघ्या १८ वर्षांचा. वडील व्यवसायाने सुतार. त्यामुळे घरातली परिस्थिती तशी बेताचीच आणि याला क्रिकेटने झपाटले. गल्लीमध्ये तो आपल्या वेगवान गोलंदाजीने भल्या-भल्यांची विकेट काढायचा. राजस्थान रॉयल्स संघाने निवड चाचणीसाठी खेळाडूंना आमंत्रित केले, तेव्हा त्याने तिथे जायचे ठरविले. रात्र प्लॅटफॉर्मवर कशीबशी काढली आणि सकाळी उपाशीपोटी निवड चाचणीला गेला. पोट रिकामे असले तरी डोक्यात ध्येय एकच, संघात स्थान मिळवायचं आणि आपल्याला वेडं ठरविणाऱ्या लोकांना दाखवून द्यायचं. निवड चाचणीदरम्यान कामरानने गोलंदाजीतील भेदकतेने डॅरेन बेरी यांनाजिंकले आणि एकही प्रथम श्रेणी सामना न खेळलेल्या या पठ्ठय़ाला राजस्थानच्या संघाने २४ हजार अमेरिकन डॉलर्सचे कॉन्ट्रॅक्ट दिले. आफ्रिकेतील सराव सामन्यादरम्यान शेनने त्याची गोलंदाजी पाहिली आणि आपल्या फिरकीने इतरांना घायाळ करणारा वॉर्न त्याचा फॅन झाला. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धची ती शेवटची ओव्हर आठवतेय. गांगुलीने राजस्थानच्या तोंडातला घास हिरावला होता. कोलकाताला गांगुली सामना जिंकणार असे वाटत असतानाच शेवटच्या षटकासाठी वॉर्नने कामरानच्या हाती चेंडू सुपूर्द केला आणि त्याने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत कोलकाताला विजयापासून परावृत्त केले. राजस्थानने जाहीर केलेल्या पुरस्कारांमध्ये कामरानने दोन पुरस्कार पटकाविले आहेत.
गोव्याचा फिरकीपटू शादाब जकाती याचे नावही या हंगामापूर्वी बऱ्याच जणांना माहीत नव्हते. गोव्याला फुटबॉलची परंपरा आहे. पण क्रिकेटमध्ये दिलीप सरदेसाई, स्वप्निल अस्नोडकरनंतर शाबादच. संघात एकच फिरकीपटू घेऊन धोनी खेळत होता म्हणून त्यात शादाबला संधी दिली आणि त्याने त्याचे सोने केले. चेन्नई सुपर किंग्जच्या संघात मुरलीधरन नावाचा जादूगार होताच, पण तरीही शादाबने पदार्पणातच चार विकेटस् काढून सर्वानाच धक्का दिला. त्यानंतरही सातत्याने विकेटस् घेण्यात तो यशस्वी ठरतोय. प्रथम श्रेणी सामन्यांतही त्याच्या नावावर हजार धावा आणि शंभर विकेटस् आहेत.
नमन ओझाही या आयपीएलमुळे एक यष्टिरक्षक फलंदाज म्हणून सर्वासमोर आला आहे. राजस्थानचा स्वप्निल अस्नोडकर फ्लॉप ठरत असल्याने संघाला एका आश्वासक सलामीवीराची गरज होती. जिगरबाज वॉर्नने ओझाला संधी दिली आणि (गोलंदाजांना) त्याच्यासमोर ‘नमन’ सादर करावे लागले. ग्रॅमी स्मिथच्या साथीने संघाला हवी असणारी शतकी सलामी नमनने दिली. त्याच्या स्फोटकी खेळीच्या जोरावर राजस्थानने या हंगामातील २१२ धावांची सर्वोच्च धावसंख्या उभारली. त्यानंतरही अर्धशतक लगावून फलंदाजीतले सातत्य दाखविले. स्फोटकी फलंदाजीबरोबरच नमन उत्कृष्ट यष्टिरक्षक असल्याने आता दिनेश कार्तिक आणि पार्थिव पटेल यांचे पत्ते कट होण्याचे चान्सेस आहेत.
ब्रेट लीच्या अनुपस्थितीमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबला एका वेगवान गोलंदाजाची गरज होती आणि ती कसर भरून काढली ती दक्षिण आफ्रिकेच्या नवोदित युसूफ अब्दुल्लाने. जास्त अनुभव नसला तरी आपल्या भेदक गोलंदाजीने त्याने फलंदाजांची भंबेरी उडविली आणि युवराज सिंगसाठी तो ‘स्ट्राईक’ गोलंदाज ठरला. प्रतिस्पर्धी फलंदाज कितीही अनुभवी असला तरी त्याला युसूफला मोठे फटके मारणे जमलेले नाही हे विशेष.
चेन्नई सुपर किंग्जच्या अॅन्ड्रय़ू फ्लिन्टॉपला तीन कडक षटकार ठोकल्यानंतर बरेच जण विचारायला लागले, हा अभिषेक नायर कोण! धडाकेबाज फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करणाऱ्या मुंबईकर अभिषेक नायरचे नाव ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या संभाव्य संघात होते, पण का कोणास ठाऊक, त्याला संधी मिळू शकली नाही. या आयपीएलनंतर अभिषेकची एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली असेल हे नक्की. ट्वेन्टी-२० हा कमी कालावधीचा खेळ असला तरी त्याला प्रचंड ऊर्जा लागते. युवा खेळाडूंमध्ये ही ऊर्जा प्रचंड प्रमाणात असल्याने त्यांना ट्वेन्टी-२० साठी ‘फेव्हरिट’ मानण्यात येते. कोणत्याही संघाला युवा, गुणवान खेळाडू हवेच असतात. कारण त्यांच्यावरच देशाचे भवितव्य अवलंबून असते. वरील सारे हिरे नवे आहेत, पण छावे आहेत आणि उद्याचे राजे आहेत. उद्या अवघ्या क्रिकेट विश्वावर त्यांचे राज्य पाहायला मिळाल्यास नवल वाटू नये.