Leading International Marathi News Daily
रविवार, १० मे २००९
(सविस्तर वृत्त)

बिनधास्त नि बिलंदर.. बोक्या!
गोटय़ा, चिंगी, फास्टर फेणे.. पुस्तकांतून भेटणाऱ्या या व्यक्तिचित्रांमधून जिथे कुमारवयीन पिढय़ान्पिढय़ांचं पोषण झालं, त्यात अलीकडे ‘बोक्या सातबंडे’ या दिलीप प्रभावळकरांच्या श्रुतिकेतून साकारलेल्या खटय़ाळ व्यक्तिरेखेचाही समावेश झाला होता. ऐकलेल्या - वाचलेल्या गोष्टीमुळे आपल्या मनात कळत-नकळत त्या व्यक्तिरेखेचा एक आकृतीबंध निर्माण झालेला असतो. ती व्यक्तिरेखा कशी असेल वा असावी, याचा एक आराखडाही तयार झालेला असतो. ‘बोक्या

 

सातबंडे’ ही अशी एक व्यक्तिरेखा आहे, जी आजच्या ‘जनेरेशनेक्स्ट’लाही समकालीन वाटावी.. अशा वेळी पुस्तकातून भेटलेली ही अवखळ, चपळ, करामती व्यक्तिरेखा जर त्यांना जवळच्या वाटणाऱ्या दृक-श्राव्य माध्यमाद्वारे भेटली, तर या लहानग्यांना कोण आनंद होईल? नेमकी हीच नस ओळखत दिग्दर्शक राज पेंडुरकर यांनी ‘बोक्या..’ला पडद्यावर आणलंय नि बोक्याच्या व्यक्तिरेखेचा ताजेपणा कायम ठेवण्यातच नाही, तर तो खुलविण्यात ते यशस्वी ठरले आहेत. जितेंद्र जोशी यांची गीते आणि शैलेंद्र बर्वे यांचं संगीतही अपेक्षा वाढवणारं आहे.
‘बोक्या सातबंडे’ नावाच्या चित्रपटात नेमकं काय आहे? तशी हीदेखील आहे साधीसुधी गोष्ट.. कुठल्याही मध्यमवर्गीय चौकोनी कुटुंबात घडणारी.. त्या घरातील शेंडेफळ असलेला बोक्या अगदी पुस्तकात भेटतो तस्साच आहे - खटय़ाळ, मस्तीखोर, हुशार नि तितकाच हळवा. त्याच्या लहानपण अलवारपणे सांभाळणारे त्याचे आई-बाबा, आजी नि विजूदादा त्याच्या घरी आहेत. बोक्याच्या उपद्व्यापाने मेटाकुटीला येणारे, त्याला प्रसंगी रागे भरणारे त्याच्या घरचे त्याच्यावर अतोनात प्रेम करतात. सातबंडे कुटुंबाची पडद्यावर साकारणारी ही कथा पाहताना प्रेक्षकही नकळत त्या कुटुंबाचा भाग बनून जातात. कार्टुनच्या संगतीत वाढणाऱ्या आजच्या लहानग्यांचं नि मॉल - फ्लॅटसंस्कृतीची झूल मिरवण्यात प्रतिष्ठा मानणाऱ्या पालकवर्गाच्या भावविश्वात हा ‘बोक्या’ खळबळ निर्माण करतो, हेच या चित्रपटाचं शक्तिस्थान म्हणायला हवं. म्हणून केवळ बालप्रेक्षकच नाहीत, तर त्यांचा पालकवर्गही या बोक्याच्या उचापतींना मनापासून दाद देतो नि त्याच्या उद्गारांनी हळवाही होतो. सारी भौतिक सुखं आपल्याच मुलाला मिळावी, या पालकांच्या हट्टापायी आज मुलांची शेअरिंग, माणसं जोडण्याची मूलभूत वृत्तीच कशी छाटून टाकतो, याचं मनोज्ञ दर्शन ‘बोक्या सातबंडे’त होतं. म्हणूनच बोक्याच्या करामती बघण्यासाठी तो छोटय़ांचा चित्रपट असला, तरी खरा तो मोठय़ांसाठी बनवलेला आहे, असं पालकवर्गानं समजण्यास मुळीच हरकत नाही. असं सगळं असलं, तरीही हा सिनेमा उपदेशात्मक अंगाने जात नाही. त्यातलं नाटय़ हरवू न देण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे.
ज्यांचा मुलगा अमेरिकेत राहतो, त्या बेलवंडी दाम्पत्याचं एकटेपण बोक्याला जाणवतं, घरकाम करणाऱ्या बाईंच्या मुलाचं बालपण कसं निसटतंय, याची बोचही बोक्याला आहे आणि त्याच्या परीने त्याच्या वयाला साजेशी अशी उत्तरं तो यावर कशी शोधतो, हे पाहणं रंजक आहे. वेगळ्या धाटणीच्या हा सिनेमा असा आहे, की ज्यात चमकलेल्या बडय़ा कलाकारांना भूमिका साकारल्याचं समाधान मिळालं असेल. (बेलवंडी आजोबा - दिलीप प्रभावळकर, बेलवंडी आजी - चित्रा नवाथे, बोक्याची आई - शुभांगी गोखले, बोक्याचे बाबा -विजय केंकरे, बोक्याची आजी - ज्योती सुभाष). पण खरी कमाल केलीय ती बोक्या साकारणाऱ्या आर्यन नार्वेकर याने नि त्याचा दादा बनलेल्या आलोक राजवाडे याने. या दोघांच्याही अभिनयात कमालीची उत्स्फुर्तता जाणवते. मात्र आर्यनची बोलण्याची ढब आणि त्याचं मराठी सफाईदार वाटत नाही. त्याचप्रमाणे चित्रपटभर वावरणारा बोक्या हा नऊ - दहा वर्षांचा वाटला, तरी चित्रपटाच्या शेवटी बक्षीस समारंभाच्या वेळेस बोक्या सात वर्षांचा आहे, असा केलेला उल्लेख प्रेक्षकांना निश्चितच खटकेल.
या चित्रपटाचं संगीत हे श्राव्य असलं, तरी ते बालचित्रपटाला साजेसं नाही. ते संगीत मुलांच्या ओठी रेंगाळत नाही. बोक्या हा बालचित्रपट केवळ दोन प्रसंगांवर बेतला आहे, पण त्याला अपेक्षित वेगही नसल्याने आजच्या ‘जनरेशनेक्स्ट’ला अपेक्षित असणाऱ्या वेगाला तो पुरा पडत नाही. असे असले तरी लहानग्यांच्या निरागस मनात डोकवायचं असेल, तर ‘बोक्या’च्या वाटेला जायला हरकत नाही.
सुचिता देशपांडे
suchitaadeshpande@gmail.com