Leading International Marathi News Daily
रविवार, १० मे २००९
(सविस्तर वृत्त)

थंडगार कृष्णधवल प्रतिमा!
रंगांची उधळण आणि तंत्राचा बडेजाव पाहण्याची आपल्याला सवय झालेली आहे. खरेतर अजीर्ण झाले आहे. या पाश्र्वभूमीवर दिग्दर्शक शिवाजी चंद्रभूषण यांचा ‘फ्रोझन’ हा चित्रपट एक ‘कृष्णधवल’ दिलासा आहे.
लडाखमधील बोचरी थंडी आणि बर्फाळलेले वातावरण कृष्णधवल छटांमधून अधिक प्रत्ययकारी झालेले आहे. परंतु रंगांचा किंवा रंग नसल्याचा हा परिणाम सोडला तर एक चित्रपट म्हणून ‘फ्रोझन’ निराशच करतो. माहितीपट आणि कथापट यांच्यामध्ये कुठेतरी भरकटत हा चित्रपट संपतो तेव्हा लक्षात राहतात केवळ काळ्या पांढऱ्या, थंडगार

 

प्रतिमा!
लडाखमधील डोंगराळ, हिमाच्छादित भागात राहणाऱ्या एका कष्टाळू, निर्धन कुटुंबाची ही कथा आहे. कर्मा (डॅनी) हा कुटुंबप्रमुख. जुनाट यंत्रावर जर्दाळूचा जॅम तयार करतो. जवळच्या बाजारात तो विकून कशीतरी गुजराण करतो. त्याच्या कुटुंबात एक तरुण मुलगी लास्या (गौरी) आणि लहान मुलगा आहे. कर्ज, जॅम विकण्यातील अडचणी, लष्कराने घरावर केलेला कब्जा आणि कर्माला आपल्या मृत पत्नीची येणारी आठवण.. याभोवती कथानक फिरते.
वातावरणातील नावीण्य आणि व्यक्तिरेखांची भाषा जर सोडली तर चित्रपटातील कथानकात कोणताही भावनिक गुंता नाही. लडाखमधील एकूण जीवनाची गती संथ. म्हणून चित्रपटाची गतीही संथ, हे एकवेळ गृहीत धरले तरी आशयाच्या पुनरुक्तीमुळे चित्रपट कंटाळवाणा होतो. तिच ती दृश्ये आपण परत पाहतो आहोत असे वाटत राहते. डोंगराळ भागात मैलोनमैल जमीन उजाड पडलेली असताना खुद्द कर्माच्या घराभोवतीची जागाही रिकामी असताना लष्कर आणि सावकार या दोघांचीही नजर या पडक्या घरावर का असते, हे कळत नाही.
त्यातल्या त्यात चित्रपटातला भावणारा हळवा भाग आहे, तो कर्माच्या मजबुरीचा. हाताने चाक फिरवीत जुनाट यंत्राच्या मदतीने जॅम तयार करणारा कर्मा आणि बाजारात आलेली कारखान्यातील आकर्षक उत्पादने असा अंतर्विरोध पोटात ढवळून काढतो. ती वेदना डॅनीने त्याच्या अभिनयातून अतिशय परिणामकारकरीत्या पोहोचवली आहे. बायकोविना संसार रेटताना होणारी तगमग, सावकाराचे देणे चुकते करताना होणारी दमछाक आणि त्याचवेळी निसर्गाशी लढा देण्यासाठीची धडपड हे सगळे मनाला भिडते. परंतु या पलीकडे कथा म्हणून उत्कंठा वाढावी, उत्सुकता निर्माण व्हावी असे काही चित्रपटात नाही. कर्माची मुलगी लास्या हिची व्यक्तिरेखा गोंधळात टाकणारी आहे. ती सामान्य आहे की मनोरुग्ण आहे असा प्रश्नही अनेकदा पडतो. अनेकदा चित्रपट कथेची वाट सोडतो आणि लडाख पर्यटन, लडाख लोकजीवन, लडाख संस्कृती दर्शन अशा अंगाने जातो आणि अधिकच पसरट होतो.
साधी सजावट, सोपे तंत्र आणि वेगळे वातावरण यांना एका चांगल्या कथानकाची जोड असती तर ‘फ्रोजन’ची मेहनत सार्थकी लागली असती.
फ्रोजन
दिग्दर्शक-
शिवजी चंद्रभूषण
कलावंत : डॅनी, गौरी, कलझांग आंगचूक
कशासाठी पाहावा ? - कृष्णधवल चित्रणासाठी
कशासाठी टाळावा ? - त्याहून अधिक काही नाही
थोडक्यात काय तर - डॉक्युमेंट्रीच्या बर्फाखाली कथा गुदमरली!