Leading International Marathi News Daily
रविवार, १० मे २००९
(सविस्तर वृत्त)

अखेर १६ मे उजाडला. दिवसभरात लोकसभा निवडणुकांचे निकाल जसजसे जाहीर होऊ लागले, कोण कुठे आघाडीवर वा पिछाडीवर आहेत हे कळू लागले, तसतसे सर्वत्र औत्सुक्याचे वातावण अधिकच गडद होऊ लागले. सर्व चॅनेलवाल्यांना तर ऊतच येऊ लागला. तीच एक-दोन दृश्ये काही सेकंदांच्या अंतराने पुन:पुन्हा दाखविली जाऊ लागली.
जिंकलेल्यांच्या मिरवणुका, पराभुतांचे रडवे चेहरे, आरोप, प्रत्यारोप, समर्थन याशिवाय दुसऱ्या कुठल्याही बातम्या नाहीत. मतदारांनी नेहमीप्रमाणे कुणालाच स्पष्ट कौल न

 

दिल्याने सर्वत्र कोलाहल व संभ्रमावस्था. रात्रीपर्यंत अनेक कोष्टके व त्रराशिके मांडूनही काही निष्पन्न होत नाहीसे ध्यानी आल्यावर प्रणव रॉय आणि दुवा यांची अवस्था निद्रानाशाने पीडित मनुष्याप्रमाणे भकास वाटणारी दिसत होती. दुसरा दिवस उजाडला. १७ मे. सर्व चॅनेलवाल्यांमध्ये आता चढाओढ लागलेली. पंतप्रधान कोण होणार हे जो तो छातीठोकपणे सांगत होता. सर्वात पुढे राजदीप सरदेसाई. याला तर प्रत्यक्ष उमेदवारांच्याही आधी हे कळते कसे हेही एक आश्चर्यच म्हणावे लागेल.
संध्याकाळपर्यंत उत्साह व गोंधळाचा पारा फारच वर चाललेला दिसून येत होता. टी.व्ही.वरच्या कालच्या दृश्यांची जागा आता एकमेकांचे हात हातात घेऊन उंचावणाऱ्या व दोन बोटांनी ‘व्ही’ अक्षर दाखविणाऱ्या पुढाऱ्यांनी घेतली होती. मात्र तासातासाने हेच पुढारी वेगवेगळ्या पुढाऱ्यांसमवेत आपापले याच आवेशात फोटो देताना पाहून संभ्रमाने कळस गाठल्याचे जाणवू लागले. काही चॅनेलवाल्यांनी तर अडवाणी- मनमोहन सिंग, ममता- बुद्धदेव, जयललिता- करुणानिधी, मायावती- मुलायमसिंग यांच्यामधील सौहार्दपूर्ण हास्यविनोदाची दृश्ये दाखविल्याने आश्चर्याचे धक्केच जाणवू लागले. अर्थात ही दृश्ये ताजी की पूर्वी कधीची, हे कळण्यास मार्ग नव्हता. कडक इस्त्रीची पांढरी पँट व पांढरा हाफ शर्ट, काखेत कसली तरी फाईल अशा गंभीर चेहऱ्याच्या शरद पवारांशी तर जवळजवळ सर्वच नेते गाठीभेटी करताना दाखविले जात होते. मात्र पवार कुठेही हसताना दिसत नसल्याने थोडीसी चुटपूट लागून राहिली. लालू गाई-म्हशी, राबडी, मेहुणे व मुलांच्या फौजेसमवेत उघडबंब अवस्थेत ढोल बडवीत यथेच्छ होळी खेळताना दाखविले जात होते. अर्थात हेही दृश्य आजचे की पूर्वीचे, हे चॅनेलवालेच जाणोत. टी.व्ही.वर आता आरोप-प्रत्यारोपांना ऊत आलाय, पक्षांतर्गत बंडाळीची धुणी उघडय़ावर धुतली जाऊ लागली. प्रत्येक पुढारी कुणालाच धड पाठिंबा देताना दिसत नव्हता. ‘आम्ही आमच्या मार्गाने जाणार, इतर सर्व स्वार्थी, जातीयवादी, भ्रष्टाचारी आहेत, लवकरच कळेल’ असे उच्चारताना दिसत होता. सरकार कुणी बनवावे यापेक्षा पंतप्रधान कोण होणार हा एकमेव मुद्दा गोंधळाचे कारण बनलेला प्रथमच आपण स्वातंत्र्योत्तर काळात पाहात होतो. इतर सामान्य मतदारांप्रमाणेच या सिनेमाच्या मध्यंतरांतच मी झोपी गेलो. झोपेत अचानक एक अद्भुत व रोमांचकारी स्वप्न मी पाहात होतो..
पंतप्रधानपदाचा गुंता वाढतच चाललेला पाहून कुणीतरी सन्मान्य व थोर व्यक्तीने मध्यस्थी करावी असा एक मतप्रवाह जोर धरू लागला. कुणीतरी ओबामा, मंडेला यांचीही नावे घेतली, मात्र मध्यस्थ हा भारतातलाच असावा यावर जवळजवळ एकमत झाले. तथापि हयात व्यक्तीमध्ये कुणाचीही अशी मध्यस्थी करण्याची विशेष पात्रता नसल्याने एकमताने नसले तरी बहुमताने हे थोर कार्य महात्मा गांधींकडे सोपवावे असे ठरले. असल्या तमाशाफडात आपले काम नाही असे म्हणणाऱ्या गांधींनी सर्वजण काकुळतीला आलेले पाहून केवळ देशहितासाठी ही कामगिरी पत्करण्याचे ठरविले व १८ मे रोजी सकाळी नऊ वाजता सर्व खासदारांस संसदभवनात जमण्यास सांगितले. ते स्वत:ही ठीक नऊ वाजता त्यांचे सचिव महादेवभाई देसाई यांजसमवेत संसदभवनात आगमन करते झाले. सर्वानी उभे राहून त्यांना अभिवादन केले.
संसदभवनात खासदार व इतर प्रतिष्ठित निमंत्रितांबरोबरच चॅनेलवाल्यांनी गर्दी केलेली पाहून गांधीजी संतापले. सांगूनही ते बाहेर जाईनात असे पाहून गांधीजींनी सत्याग्रह व उपोषण करण्याची धमकी दिल्याने ‘हीच एक उत्तम बातमी आहे’ असे मानून चॅनेलवाल्यांनी अखेर काढता पाय घेतला. सर्व खासदारांना बसायला सांगूनही बरेचजण कधी या गटात तर कधी दुसऱ्या गटात ऊठबस करताना आढळल्याने गांधीजी पुनश्च संतापले. ‘निदान आजचा दिवस तरी ज्या पक्षांतून निवडून आलात त्यांच्याच गोटात बसा. उद्यापासून घोडाबाजार आहेच’, असे त्यांनी दरडावल्यावर थोडे स्थिरस्थावर झाले. त्यानंतर गांधीजी म्हणाले की, ‘पंतप्रधान बनायची ज्यांची खरोखर पात्रता, ज्येष्ठता व दूर्दम्य इच्छा आहे अशा खासदारांनी उठून सभागृहाच्या डावीकडील भागात येऊन थांबावे. असे म्हणताच डावे सोडून बहुतांश खासदार उठून तिकडे पळू लागले. ही संख्या १६९ असल्याचे महादेवभाईंनी सांगताच गांधीजी खवळले व त्यांनी मोजक्या १०/११ जणांनीच तिथे थांबावे, उर्वरितांपैकी १०/११ नेत्यांनी ज्यांच्या पाठिंब्यास अथवा मतास प्राधान्य आहे त्यांनी उजवीकडील भागात येऊन बसावे व इतर सर्वानी सभागृहात आपापल्या जागी स्वस्थ बसावे असा आदेश दिला. आणि असे न घडल्यास आपण चाललो अशी धमकीही दिली. खुशी-नाखुशी, चीड-संताप, आरोप-प्रत्यारोप अशा संमिश्र अवस्थेत अखेर गांधीजींच्या आदेशाचे पालन झालेले दिसले, अखेर जे तीन गट तयार झाले ते येणेप्रमाणे -
पंतप्रधानपदाचे दावेदार जे अकराजण डाव्या बाजूस जमा झाले ते असे-
सोनिया गांधी, अडवाणी, मायावती, मुलायमसिंग, शरद पवार, लालुप्रसाद यादव, रामविलास पासवान, नवीन पटनाईक, नितीश कुमार, देवेगौडा व चंद्राबाबू नायडू.
अकराजण मान्यवर नेते जे उजव्या बाजूस जाऊन बसले त्यांची नावे-
प्रकाश करात, ए. बी. बर्धन, करुणानिधी, जयललिता, ममता बॅनर्जी, प्रकाशसिंग बादल, अजित सिंग, चौथाला, शरद यादव, फारुख अब्दुल्ला व उद्धव ठाकरे.
महादेवभाईंनी मोजामोज केली तेव्हा आढळले की ५४३ खासदारांमध्ये पाचजण कमी आहेत. अधिकारी वर्गाने नंतर डॉ. मनमोहन सिंग सोनियाजींच्या मागे तर अमरसिंग मुलायमांच्या मागे बसल्याने सांगितले तर तिघेजण कैदेत असल्याचे निदर्शनास आणून दिले.
निमंत्रितांच्या गॅलरीत प्रियांका व तिचे कुटुंब, चिरंजीवी, राज ठाकरे, अनिल व मुकेश अंबानी अमिताभ, शाहरुख खान व इतर बॉलीवूड, उद्योगपती मंडळी बसलेली दिसत होती.
गांधीजींनी कंबरेस लावलेले घडय़ाळ पाहिले, दहा वाजून गेले होते. चष्मा नीट पुसून परत लावला व सर्वप्रथम सोनियाजींकडे जाऊन उभे राहिले. ‘आपणच पंतप्रधान का?’ या प्रश्नावर त्या उद्गारल्या, ‘‘मला स्वत:ला पंतप्रधानपद नकोय. मात्र
आमच्या घराण्याने कुटुंबीयांनी या देशासाठी जो अत्युच्च त्याग केलाय तसा इतर कुणी केला नसल्याने या देशाचा पंतप्रधान हा नेहरू घराण्याचाच वंशज असावयास हवा अथवा तो ठरविण्याचा अधिकार आम्हासच मिळाला पाहिजे’’. त्यावर महादेवभाईंनी गांधीजींकडे बोट दाखवीत यांनीही देशासाठी थोडा फार त्याग केलाय असे आम्हास वाटते, असे म्हटल्यावर सोनियाजी कडाडल्या की, ‘‘आम्ही कुटुंबाच्या, घराण्याच्या त्यागाविषयी बोलत आहोत. एकटय़ा-दुकटय़ाच्या त्यागाविषयी नव्हे’’. सभागृहात ‘सोनियाजी जिंदाबाद, राहुल जिंदाबाद’, अशा आरोळ्या उठल्या. त्यातच एक मराठी खासदार उभा राहून ओरडू लागला की, ‘‘चापेकर बंधूंचा त्याग बघता त्यांच्या घराण्यातील एखाद्याला पंतप्रधान बनवा तर’’. त्याला अर्थात काँग्रेसवाल्यांनी धमकावून खाली बसविले.
गांधीजींनी वेळ न दवडता सोनियाजींच्या मागे बसलेल्या डॉ. मनमोहन सिंगना पुढे बोलविले. ‘‘तुम्हास का पंतप्रधान व्हायचेय?’’ या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘सोनियाजी व राहुलची इच्छा म्हणून. तसे तर या पदासाठी राहूलच सर्वात लायक असल्याचे माझे वैयक्तिक मत आहे’’. पुन्हा राहूल जिंदाबादच्या घोषणा.
गांधीजी तेथून अडवाणींकडे वळले. त्यांनी तोच प्रश्न विचारला. ‘‘आपणास पंतप्रधान का व्हायचेय?’’ ‘‘पंतप्रधान बनून देशाच्या कानाकोपऱ्यात एक रथयात्रा काढीन म्हणतो. नरेंद्रासमवेत तमाम हिंदुस्थानवासीयांना दुबळा, खंबीर, म्हातारी, तरुण या शब्दांचा नक्की अर्थ काय हे समजावयाचे म्हणतोय. एवढा महाकाय देश पाहता ही रथयात्रा कदाचित येणारी पाच वर्षेही चालेल, हरकत नाही’’.
गांधीजींनी आवंढा गिळला व मायावतींकडे मोर्चा वळविला. त्या प्रश्नोत्तरादाखल उद्गारल्या, ‘‘इलेक्शन कमीशनचा कारोबार नि:पक्षपाती असता तर ही नौबतच आली नसती. तथापि मैं ही अकेली इस पद के लिए लायक हूँ क्यूं की ‘आंबेडकर, फुले, शाहू का एक ही सपना, सुपुत्री मायावती हो पंतप्रधान अपना’.
गांधीजी तिथून मुलायमसिंगांकडे वळले. तोच प्रश्न करताच ते म्हणाले, ‘‘असल्या प्रश्नांची उत्तरे अमरसिंह देतात, आम्ही नव्हे तेव्हा त्यांनाच विचारा’’. गांधीजी मागे पाहतात तो अशी मध्यस्थी हा केवळ आपलाच प्रांत असूनही सर्वानी गांधींना बोलवावे हे न पटल्याने नाराज होऊन ते पसार झाल्याच आढळले.
लालू म्हणाले, ‘‘राबडीच्या समर्थ हाती बिहार सोपवून मला दिल्लीच्या तख्तावर बसायचंय. रेल्वे खातेपण माझ्याकडे ठेवीन. वीज व शेतकी खात्यांबरोबर गोरगरीब जनतेसाठी कंदील व गवत खाते ही निर्माण करून तिथे नातेवाईकांची वर्णी लावावी, असाही एक विचार आहे’’.
पवार मोबाईलवर कुणाशी तरी बोलत असलेले पाहून गांधीजी उद्विग्न दिसले. त्यांच्याकडे लक्ष जाताच पवार उभे राहिले व म्हणाले, ‘‘माफ करा गांधीजी पुढचा आयपीएल व वर्ल्डकप अशा महत्त्वाच्या विषयांवर जरा चर्चा सुरू होती. मोबाईल बंद. आता विचारा’’. गांधीजींनी विचारले, ‘‘आपणास पंतप्रधान का व्हायचेय?’’ पवार उत्तरले’’, बस्स झाले हे पंतप्रधान बनविणे व घडविणे. आतापावेतो कुणासही वाटले नाही आम्हास पंतप्रधान बनवावे. सर्वानी स्वार्थ साधला आमचा वापर करून. मनापासून सांगायचे तर आम्हाला गांधीजी वा जयप्रकाश नाही बनायचे. स्वत: पंतप्रधान व्हायचेय. समर्थाचीही तीच इच्छा होती की मराठय़ाने देशाचे नेतृत्व करावे, मराठा तितुका मेळवावा आणि माझ्याइतका या पदासाठी समर्थ दुसरा कुणी मराठी या घडीला असावा, असे आम्हास वाटत नाही. तेव्हा तुम्ही तरी ही माळ माझ्या गळ्यात घाला’’. गांधीजींनी शांत चित्ताने सारे ऐकून घेतले व मोर्चा देवेगौडांकडे वळविला.
देवेगौडा झोपले आहेत की जागे आहेत हे कळावयास मार्ग नव्हता. गांधीजींनी त्यांना जागे करताच ते खडबडून जागे होऊन उभे राहायचा प्रयत्न करू लागले; परंतु देह साथ देत नसल्याचे पाहून बसूनच उत्तर द्यायची परवानगी मागू लागले. गांधीजींनी संमती देत तोच प्रश्न केला.
देवेगौडा म्हणाले, ‘‘या पवारांच्या सांगण्यावरून त्यांच्या समर्थ रामदासांचे वाङ्मय मी वाचावयास घेतले खरे, पण पानोपानी तो धूर्त संत मलाच टोमणे मारतोय, असे वाटू लागले आहे. मला त्याचे टोमणे झोंबून राहिले आहेत. म्हणतोय कसा-
श्रवणी बसले ऐकावया। अडों लागलीसे काया।।
येती कडकडा जांभया। निद्राभरें।।
सांडुनि निरुपण गोड। पुरविती निद्रेचे कोड।।
ते साधक जाणावे धोंड। संतनिजधन नेणती।।
अरे वा! आम्ही धोंड काय, जांभया देतो, झोपतो काय! आम्हाला एक संधी पुनश्च द्याच. संसद भवनात सदैव झोपणारा, बैठकांमध्ये सदैव घोरणारा पंतप्रधान म्हणून जी आमची छबी कुणी तयार केलीय ती आम्हास कायमची पुसून टाकायचीय’’. एवढे बोलून ते पुन्हा झोपी
गेले. गांधीजी थोडे हताश झालेले दिसले. नवीन, नितीश, पासवान व नायडूंना काही न विचारताच त्यांनी सर्व अकरा जागांना एक प्रश्न विचारला-
‘‘देशाचा पंतप्रधान हा पीड पराई जाणणारा, धर्मनिरपेक्ष, चारित्र्यसंपन्न, निष्कलंक, निस्वार्थी, निर्लोभी, भ्रष्टाचारास थारा न देणारा, उत्तम अभ्यासक व संसदपटू, उच्च विद्याभूषित देशासमोरील प्रश्नांची उत्तम जाण असणारा स्वत:च्या बुद्धीने निर्णय घेणारा, आपली मुले-बाळे, बंधूभगिनी यांचे त्यांची लायकी नसताना राजकारणात स्तोम न माजविणारा, देशाची उत्तम प्रगती करून त्यास जगातील एक प्रगत देश बनवून आपली व देशाची प्रतिमा जगात उजळविणारा असा असावा की नाही? उत्तर नकारार्थी असल्यास तसे लेखी नमूद करा’’.
गांधीजींनी असा प्रश्न विचारून बुचकळ्यात टाकल्याने इकडेतिकडे तोंडे असलेले ते अकराही जण एकत्र येऊन चर्चा करू लागले व जे उत्तर सर्वाचे मिळून एकच तयार झाले ते असे-
‘हे सर्व ठीक आहे, परंतु आजच्या घडीला पंतप्रधान बनण्यासाठी इतका आदर्शवादी निकष लावलात तर कुणीही पंतप्रधान बनू शकणार नाही व देश पंतप्रधानाविना राहून अराजक गाजेल’.
स्वप्न संपते न संपते तोच पहाट झाल्याने जाग आली. पहाटेचे
स्वप्न खरे ठरते हे टीव्हीवरील बातम्या पाहून मनोमन पटले.
१९ मे. अजूनही पंतप्रधानपदाचा पेच त्याच अवस्थेत होता.
कालाय तस्मै नम:।
ज्ञानेश्वर मांद्रेकर