Leading International Marathi News Daily

रविवार, १० मे २००९

क्रीडा

उरलेले सर्व सामने जिंकणे आवश्यक - सचिन तेंडुलकर
इस्ट लंडन, ९ मे/ पीटीआय

नऊ सामन्यांमध्ये फक्त तीन सामन्यांमध्येच विजय संपादन करू शकल्याने आम्हाला जर उपान्त्य फेरीत पोहोचायचे असेल तर उर्वरित सर्व सामने जिंकणे आवश्यक असल्याचे मत मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे. दिल्लीविरूद्धच्या सामन्यात यश न मिळाल्याने मुंबई इंडियन्सनला पराभवाच्या हॅट्ट्रीकला सामोरे जावे लागले होते. या सामन्यात पुरेशा धावा न केल्यामुळेच पराभव स्वीकारावा लागला असे मत सचिनने सामन्यानंतर मांडले होते. उपान्त्य फेरीत पोहोचण्यासाठी संघाला उरलेले सर्व सामने जिंकणे आवश्यक आहे आणि याची जाणीवही मला आहे.

सेहवाग ‘फिट’
इस्ट लंडन, ९ मे / विशेष प्रतिनिधी

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा कर्णधार वीरेंद्र सेहवाग याच्यासाठी उद्याचा दिवस आनंदाचा ठरणार आहे. दुखापतीतून सावरलेला सेहवाग उद्या कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या लढतीत खेळणार आहे. बोटाच्या दुखापतीमुळे त्याला गेल्या तीन सामन्यांना मुकावे लागले होते. मात्र आता तो पूर्णपणे तंदुरुस्त असून इंडियन प्रीमियर लीगमध्ये अव्वल स्थानावर पोहोचलेल्या आपल्या संघाला उपान्त्य फेरीपर्यंत पोहोचविण्यासाठी सज्ज झाला आहे.सेहवागच्या अनुपस्थितीचा तसा फटका दिल्लीच्या संघाला बसला नाही.

कोलकाताचे ‘जितबो’ कधी?
आज दिल्ली भिडणार कोलकाताशी

जोहान्सबर्ग, ९ मे/ पीटीआय
यंदाच्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स हा गिऱ्हाईक ठरला आहे, त्यांचे ‘जितबो’ कधी होणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. त्यांच्या कामगिरीमुळे बहुधा संघमालक शाहरूख खानची दक्षिण आफ्रिकेला परतण्याचा मार्ग धुसर दिसत आहे. तर अव्वल स्थानावर असलेला दिल्ली डेअर डेव्हिल्सचा संघ उद्याच्या कोलकाताविरूद्धच्या सामन्यात ‘फेव्हरिट’ समजला जात आहे. सुरुवातीला आक्रमक वाटणारा कोलकाताचा संघ आता अगदी ‘लिंबू -टिंबू’ वाटायला लागला आहे.

‘स्वान फिवर’मुळे इंग्लंडचा शानदार विजय
रामदीन-नॅश यांची झुंजार भागीदारी
इंग्लंडचा मालिकेत वरचष्मा

लंडन, ८ मे / एएफपी

ऑस्ट्रेलियात जन्मलेल्या ब्रेन्डन नॅशच्या ८१ धावांच्या जिगरबाज खेळीनंतरही इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजला आपला पराभव टाळता आला नाही. इंग्लंडने ही कसोटी १० विकेट्स आणि दोन दिवस राखून जिंकली.
नॅशने दिनेश रामदिनसह (६१) केलेल्या भागीदारीमुळे वेस्ट इंडिजला डावाने पराभव मात्र टाळता आला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी १४३ धावांची भागीदारी केली. या सामन्यातली ही एकमेव शतकी भागीदारी ठरली. नॅश बाद झाला तेव्हा विंडीजची एकूण धावसंख्या २५६ झाली होती आणि इंग्लंडला विजयासाठी ३२ धावांची गरज होती. अ‍ॅन्ड्रय़ू स्ट्रॉस (१४ नाबाद) व अ‍ॅलिस्टर कूक (नाबाद १४) यांनी ही धावसंख्या सहज ओलांडली आणि इंग्लंडला मालिकेत १-० अशी आघाडी मिळवून दिली.

कर्स्टनपुढे समस्या खेळाडूंच्या दमछाकीची
केपटाऊन, ९ मे/पीटीआय

आयपीएल स्पर्धेतील दमछाकीमुळे जागतिक ट्वेन्टी २० क्रिकेट स्पर्धेत गतविजेत्या भारतास खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता भारतीय संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी आज येथे व्यक्त केली. विविध मालिका व स्पर्धामुळे भारतीय खेळाडूंना गेले काही महिने जगात एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सतत प्रवास करावा लागला आहे. आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर सात दिवसांनी भारतीय संघ जागतिक ट्वेन्टी २० स्पर्धापूर्व सराव सामन्यात न्यूझीलंडबरोबर खेळणार आहे. त्यानंतर लगेच एक दिवसांनी स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताची बांगला देशबरोबर गाठ पडणार आहे.

पीसीबीची आयसीसीला कायदेशीर नोटीस
कराची, ९ मे/ पीटीआय

सुरक्षेच्या कारणास्तव २०११ च्या विश्वचषकाचे सहयजमानपद काढून घेतल्याबद्दल पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) आंतर राष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) कायदेशीर नोटीस बजाविली आहे. आयसीसीच्या २०११ च्या विश्वचषकाचे सहयजमानपद काढून घेतल्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी त्यांना कायदेशीर नोटीस बजाविली असल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एजाझ बट्ट यांनी आज दिली.

मुंबईला बंगळुरूवर स्वारी करावीच लागेल
पोर्ट एलिझाबेथ, ९ मे/ पीटीआय

नऊ सामन्यानंतर फक्त तीन विजय साकारू शकलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाला उपान्त्य फेरीत पोहोचण्यासाठी उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. तर सुरुवातीला फ्लॉप ठरलेल्या अनिल कुंबळेच्या बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स संघाची अवस्था मुंबई एवढी बिकट नक्कीच नाही. त्यामुळे उपान्त्य फेरीच्या मार्गावर पोहोचण्यासाठी मुंबईला बंगळुरूवर स्वारी करावीच लागेल.

माझ्या षटकामुळे सामना निसटला - सचिन
इस्ट लंडन, ९ मे/वृत्तसंस्था

माझ्या एका षटकामुळे सामना आमच्या हातातून निसटला, अशी प्रतिक्रिया मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार सचिन तेंडुलकर याने दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्धच्या सामन्यानंतर व्यक्त केली. शुक्रवारी रात्री झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सला दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून सात गडी राखून पराभव पत्करावा लागला.

आयपीएलमध्ये खेळण्याची संधी हुकल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू निराश
मेलबर्न, ९ मे/ वृत्तसंस्था

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत खेळण्याची संधी हुकल्यामुळे शेन व्ॉटसन, नॅथन ब्रॅकन आणि जेम्स होप्स हे खेळाडू चांगलेच निराश झाले आहेत. शेन व्ॉटसन हा राजस्थान रॉयल्सकडून, नॅथन ब्रॅकन हा बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सकडून तर जेम्स होप्स हा किंग्ज पंजाब संघाकडून खेळणार होता. मात्र ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने या खेळाडूंना वैद्यकीय कारणास्तव या स्पर्धेत न खेळण्याचा सल्ला दिला.

रिझवी महाविद्यालय अजिंक्य
मुंबई, ९ मे / क्री. प्र.

कर्णधार प्रफुल्ल वाघेला व डावखुऱ्या बिपीन वाघेला यांनी झळकाविलेली अर्धशतके त्यांना अमीर बोरानिया (१९ धावांत ३ बळी), जेफ परेरा (१८ धावांत २ बळी) व भवेश पटेल (२० धावांत २ बळी) या फिरकी त्रिकुटाने दिलेली उत्तम साथ या जोरावरच रिझवी महाविद्यालयाने एस. पी. ग्रुप क्रिकेट अ‍ॅकेडमी व अलाइड डिजिटल स्पोर्ट्स फाऊंडेशन पुरस्कृत आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेच्या (४० षटके) अंतिम सामन्यात बंगाल क्लब, शिवाजी पार्क येथील खेळपट्टीवर खालसा महाविद्यालयाचा १० धावांनी पराभव करून विजेतेपदाचा चषक व रोख २०,०००/- रुपयांचे इनाम मिळविले.

ग्रॅण्डमास्टर एरेशचेन्को विजेता
मुंबई महापौर बुद्धिबळ
मुंबई, ९ मे (क्री. प्र.)

अपेक्षेप्रमाणे दुसरा मानांकित युक्रेनचा ग्रॅण्डमास्टर एरेशेचेन्को अ‍ॅलेक्झांडर (एलो गुण २६५७) याने दुसऱ्या मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. त्याने शेवटच्या डावात काळ्या मोहऱ्या घेऊन उझबेकिस्तानचा ग्रॅण्डमास्टर इल्हाचेव्हा सईदअली (एलो २४९७) याजबरोबर सिसिलियन बचावमधील नॅजडॉर्क प्रकारामध्ये झटपट १० चालींमध्ये बरोबरी मान्य केली.

पय्याडे आणि डी. वाय. पाटील संघांची अंतिम फेरीत धडक
प्रबोधन: मुंबई टी-२० क्रिकेट
मुंबई, ९ मे / क्री. प्र.
पय्याडे क्रिकेट क्लब आणि डी. वाय. पाटील स्पोर्ट्स यांनी आपले प्रतिस्पर्धी अनुक्रमे नॅशनल क्रिकेट क्लब आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया यांच्यावर एकतर्फी विजय मिळवून प्रबोधन गोरेगाव आयोजित मुंबई टी-२० सिरीज स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. एकूण दोन लाखांची इनाम राशी असणाऱ्या या स्पर्धेची विजेतेपदाची लढत उद्या प्रबोधन क्रीडाभवन, गोरेगाव येथे होईल.

तिरंदाजी विश्वचषक: तालुकदारला सुवर्ण
कोलकाता, ९ मे/ पीटीआय

जयंता तालुकदारच्या वैयक्तिक सुवर्ण पदकाच्या जोरावर भारतीय संघाने क्रोएशिया येथे सुरु असलेल्या तिरंदाजी विश्वचषकाची दुसरी फेरी जिंकली आहे. अथेन्स ऑलिंम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकलेल्या इटलीच्या मार्को गॅलिअ‍ॅझोला तालुकदारने दोन गुणांनी मागे टाकत सुवर्ण पदक पटकाविले. यापूर्वी तालुकदार, राहुल बॅनर्जी आणि मंगल सिंग चंपिया या त्रिमूर्तीने सांघिक सुवर्ण पदक पटकाविण्याची किमया केली होती. या त्रिमूर्तीचे हे दुसरे सांघिक सुवर्ण आहे. ५ एप्रिलला झालेल्या तिरंदाजी विश्वचषकाच्या पहिल्या फेरीतही या त्रयीने सुवर्ण पटकाविले होते. पहिल्या दोन फे ऱ्यांनंतर तालुकदारकडे दोन गुणांची आघाडी होती. पण चौथ्या फेरीनंतर तालुकदारने मोठा आघाडी घेत सुवर्ण पदकाची कमाई केली.

कल्पेश कोळी क्रिकेट: आकाशच्या शतकाच्या जोरावर ठाण्याच्या तिनशे धावा
मुंबई, ९ मे/ क्री. प्र.
कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धेतील ठाणे केंद्राच्या आकाश पारकरने (नाबाद १९८) नाबाद शतकाच्या जोरावर संघाला तिनशे धावांचा टप्पा आोलांडून दिला. तर शिवप्रकाश जैसवालच्या फिरकीपुढे वसई केंद्राची भंबेरी उडाली. त्याच्या सहा बळींच्या जोरावर माटुंगा केंद्राने वसई केंद्राला ९४ धावांमध्ये गुंडाळले.
संक्षिप्त धावफलक
ठाणे केंद्र : ८१. १ षटकांत सर्वबाद ३२१ (आकाश पारकर नाबाद १९८, झकीर खान ६१ धावांत चार बळी) विरूद्ध चुनाभट्टी केंद्र ११ षटकांत बिनबाद ११
वसई केंद्र : ५८.३ षटकांत सर्वबाद ९४ (अजिंक्य पार्टे ३०, शिवप्रकाश जैसवाल १४ धावांत ६ बळी) विरूद्ध माटुंगा केंद्र ८७ षटकांत ७ बाद २०३ (मोहम्मद इशाख ३५)