Leading International Marathi News Daily
रविवार, १० मे २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

उरलेले सर्व सामने जिंकणे आवश्यक - सचिन तेंडुलकर
इस्ट लंडन, ९ मे/ पीटीआय

नऊ सामन्यांमध्ये फक्त तीन सामन्यांमध्येच विजय संपादन करू शकल्याने आम्हाला जर

 

उपान्त्य फेरीत पोहोचायचे असेल तर उर्वरित सर्व सामने जिंकणे आवश्यक असल्याचे मत मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे.
दिल्लीविरूद्धच्या सामन्यात यश न मिळाल्याने मुंबई इंडियन्सनला पराभवाच्या हॅट्ट्रीकला सामोरे जावे लागले होते. या सामन्यात पुरेशा धावा न केल्यामुळेच पराभव स्वीकारावा लागला असे मत सचिनने सामन्यानंतर मांडले होते.
उपान्त्य फेरीत पोहोचण्यासाठी संघाला उरलेले सर्व सामने जिंकणे आवश्यक आहे आणि याची जाणीवही मला आहे. आतापर्यंतच्या सामन्यात संघाला मोठी धावसंख्या उभारता आलेली नसली तरी यानंतरच्या सामन्यात आम्ही ती कसर पूर्णपणे भरून काढण्याचा प्रयत्न करू, असे सचिनने यावेळी सांगितले. तो पुढे म्हणाला की, संघातील फलंदाजांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नसली तरी गोलंदाज मात्र सातत्याने चांगली कामगिरी करीत आहे. पण आम्हाला मोठी धावसंख्या उभारता आली नसल्याने त्यांना विजय मिळवून देणे सोपे गेलेले नाही.
दिल्लीविरूद्धच्या सामन्यात माफक धावसंख्या असल्याने गोलंदाजांमुळेच सामना अधिकच रंगतदार झाल्याचे सचिनने सांगितले.
धावफलकावर संघाच्या फक्त ११७ धावा असताना सामना अधिक रंजक झाला तो फक्त गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीमुळेच. त्यांच्यामुळेच सामना १९ व्या षटकापर्यंत चालला. वेगवान गोलंदाजांबरोबरच फिरकीपटूंनीही टिच्चून गोलंदाजी केली. संघाच्या गेलंदाजीवर मी अत्यंत खुष आहे, असे सचिन यावेळी म्हणाला.
सनथ जयसूर्याला वगळण्याचा निर्णय हा मनावर दगड ठेऊन घेतला, असे सचिनने सांगितले. जयसुर्याला वगळून संघाने ल्यूक रॉंचीला खेळविण्याचा निर्णय मुंबई इंडियन्सने घेतला होता.
सनथला वगळण्याचा निर्णय हा खरोखरच कठिण होता. माझ्याबरोबरच शॉन पोलॉकलाही सनथला वगळण्याचा निर्णय सोपा गेला नाही. कारण आम्हाला सनथचा खेळ माहीत आहे. पण तरीही आम्हाला काही कारणास्तव हा निर्णय घ्यावा लागला, असे सचिन यावेळी म्हणाला.
सामन्यातील पराभव हा माझ्यामुळे झाला असल्याचे सचिनने यावेळी मान्य केले. या संदर्भात तो म्हणाला की, माझ्या षटकाने सामन्याचा नूरच पालटला. फिरकीपटू चांगली कामगिरी करीत होते आणि त्यामुळेच मी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण अपेक्षेनुरूप माझी गोलंदाजी झाली नाही आणि याचाच परीणाम सामन्याच्या निर्णयावर झाला.