Leading International Marathi News Daily
रविवार, १० मे २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

सेहवाग ‘फिट’
इस्ट लंडन, ९ मे / विशेष प्रतिनिधी

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा कर्णधार वीरेंद्र सेहवाग याच्यासाठी उद्याचा दिवस आनंदाचा

 

ठरणार आहे. दुखापतीतून सावरलेला सेहवाग उद्या कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या लढतीत खेळणार आहे. बोटाच्या दुखापतीमुळे त्याला गेल्या तीन सामन्यांना मुकावे लागले होते. मात्र आता तो पूर्णपणे तंदुरुस्त असून इंडियन प्रीमियर लीगमध्ये अव्वल स्थानावर पोहोचलेल्या आपल्या संघाला उपान्त्य फेरीपर्यंत पोहोचविण्यासाठी सज्ज झाला आहे.
सेहवागच्या अनुपस्थितीचा तसा फटका दिल्लीच्या संघाला बसला नाही. त्याच्या गैरहजेरीतही गंभीरच्या नेतृत्वाखाली संघाने चांगली कामगिरी करून दाखविली. एवढेच नव्हे तर आठ सामन्यांतून सर्वाधिक १२ गुणांसह त्यांनी गुणतालिकेत अव्वल स्थानही मिळविले.
सेहवागला यंदाच्या आयपीएलमध्ये एक फलंदाज म्हणून फारसे यश लाभले नाही. त्याशिवाय, कसोटी व एकदिवसीय क्रिकेटमध्येही तो आपली छाप पाडू शकला नाही. न्यूझीलंड दौऱ्यात तीन कसोटी सामन्यांत त्याला केवळ १४० धावाच करता आल्या. इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याच्या खराब कामगिरीनंतरही डिव्हिलियर्स व दिलशान यांनी दिल्लीच्या फलंदाजीची जबाबदारी पेलली. किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना सेहवागच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. त्याला सहा टाकेही घालावे लागले. आता तो फिट असला तरी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अनुषंगाने त्याला सूर गवसणे महत्त्वाचे मानले जात आहे.