Leading International Marathi News Daily
रविवार, १० मे २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

कोलकाताचे ‘जितबो’ कधी?
आज दिल्ली भिडणार कोलकाताशी
जोहान्सबर्ग, ९ मे/ पीटीआय

यंदाच्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स हा गिऱ्हाईक ठरला आहे, त्यांचे ‘जितबो’

 

कधी होणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. त्यांच्या कामगिरीमुळे बहुधा संघमालक शाहरूख खानची दक्षिण आफ्रिकेला परतण्याचा मार्ग धुसर दिसत आहे. तर अव्वल स्थानावर असलेला दिल्ली डेअर डेव्हिल्सचा संघ उद्याच्या कोलकाताविरूद्धच्या सामन्यात ‘फेव्हरिट’ समजला जात आहे.
सुरुवातीला आक्रमक वाटणारा कोलकाताचा संघ आता अगदी ‘लिंबू -टिंबू’ वाटायला लागला आहे. बुकॅनन यांची सर्व रणनितीची फ्लॉप ठरली आहे. गांगुलीच्या राज्यात संघाची एवढी दयनीय अवस्था नव्हती. मॅकक्यूलमला कर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली असली तरी संघाच्या कामगिरीचा आलेख मात्र उंचावलेला नाही. तर दुसरीकडे संघाची वीरेंद्र सेहवाग संघात नसला तरी गौतम गंभीर संघाची धुरा यशस्वीपणे वाहतोय. दोन्ही संघाची तुलना केल्यास दिल्लीचेच पारडे जड आहे.मुंबई इंडियन्सला पराभूत करून अव्वल स्थान कायम राखल्याने दिल्लीचे मनोधैर्य चांगलेच उंचावलेले असेल. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि गौतम गंभीर संघाला चांगली सलामी देत आहेत. तर त्यानंतर फलंदाजीला येणारे ए. बी. डी‘व्हिलिअर्स आणि तिलकरत्ने दिलशान संघाला मोठी धावसंख्या उभारून देत आहेत. गोलंदाजीमध्ये ड्रीक नॅन्स आणि अमित मिश्रा अचूक गोलंदाजी करताना दिसत आहेत.
कोलकाताची फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीही गोष्टी जुळून येताना दिसत नाहीत. गोलंदाजीमध्ये इशांत शर्मा चांगली गोलंदाजी करीत असला तरी त्याला दुसऱ्या बाजूने अपेक्षेनुरूप साथ मिळत नाही.
फलंदाजीमध्ये ख्रिस गेल गेल्याने संघाची पुरती त्रेधा उडालेली दिसत आहे. सौरव गांगुलीच्या बॅटने अबोला धरलेला दिसतोय. त्याची बॅट या हंगामात हवी तशी बोललेली नाही. तर कर्णधार ब्रेन्डन मॅक्क्युलम यालाही चांगली कामगिरी करता आलेली नाही.