Leading International Marathi News Daily
रविवार, १० मे २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

कर्स्टनपुढे समस्या खेळाडूंच्या दमछाकीची
केपटाऊन, ९ मे/पीटीआय

आयपीएल स्पर्धेतील दमछाकीमुळे जागतिक ट्वेन्टी २० क्रिकेट स्पर्धेत गतविजेत्या

 

भारतास खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता भारतीय संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी आज येथे व्यक्त केली.
विविध मालिका व स्पर्धामुळे भारतीय खेळाडूंना गेले काही महिने जगात एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सतत प्रवास करावा लागला आहे. आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर सात दिवसांनी भारतीय संघ जागतिक ट्वेन्टी २० स्पर्धापूर्व सराव सामन्यात न्यूझीलंडबरोबर खेळणार आहे. त्यानंतर लगेच एक दिवसांनी स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताची बांगला देशबरोबर गाठ पडणार आहे.
भारतीय खेळाडूंच्या पायास भिंगरीच लागली आहे आणि या खेळाडूंपुढे मोठे आव्हान आहे ते मानसिक तंदुरुस्तीचेच असे सांगून कर्स्टन म्हणाले, मात्र अशा परिस्थितीची सवय भारताच्या प्रमुख काही खेळाडूंना झाली आहे. जेंव्हा ते भारतासाठी खेळावयास येतात तेंव्हा ते दमछाक विसरुन जातात ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे.
विजेतेपद टिकविण्याचे दडपण भारतीय खेळाडूंवर राहील मात्र ते यंदाही सर्वोत्तम कामगिरी करतील असा आत्मविश्वास व्यक्त करीत कर्स्टन म्हणाले, जेव्हा तुम्ही विजेतेपद राखण्यासाठी खेळता तेव्हां तुमच्यावर अधिकच मानसिक दडपण असते. विशेषत: तुल्यबळ संघाविरुध्द खेळताना हे दडपण अधिकच वाढत जाते. २००७ मध्ये ट्वेन्टी २० स्पर्धा जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी अशा दडपणाखालीही सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
इंग्लंडमधील खेळपट्टी व वातावरणाबाबत विचारले असता ते म्हणाले, प्रत्येक देशामधील खेळपट्टी व वातावरण यामध्ये विविधता असते. मात्र भारतीय खेळाडूंना त्याचीही जाणीव झाली आहे. त्यामुळे मला त्याबाबत फारशी चिंता वाटत नाही. भारतीय संघातील बरेचसे खेळाडू यापूर्वी इंग्लंडमध्ये खेळले आहेत व तेथे कसे खेळावयाचे हे त्यांना माहित झाले आहे. भारताने यंदा मायदेशात व परदेशात सतत विजयी वाटचाल केली आहे, अर्थात त्यांच्यामध्ये फाजील आत्मविश्वास आलेला नाही.
संघातील बहुतेक खेळाडू अनुभवी असल्यामुळे विश्वचषक स्पर्धेत खेळताना कोणत्या दर्जाच्या खेळाची आवश्यकता आहे, हे त्यांना माहित आहे. या संघात गुणवत्ताधारक परंतु तरुण खेळाडूंचा समावेशही असल्यामुळे संघ अतिशय समतोल झाला आहे. प्रत्येक सामन्यात शंभर टक्के कौशल्य दाखविण्यासाठी ते उत्सुक झाले आहेत.
तरुण खेळाडूंना आयपीएलची पर्वणीच
आयपीएल स्पर्धा भारताच्या तरुण खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखविण्याची सुवर्णसंधी आहे. विशेषत: या स्पर्धेत अन्य देशातील अव्वल दर्जाचे खेळाडू खेळत असल्यामुळे येथील अनुभव त्यांना भावी कारकीर्दीसाठी उपयुक्त होईल असा विश्वास व्यक्त करीत कर्स्टन म्हणाले, अव्वल दर्जाच्या खेळाडूंबरोबर खेळल्यामुळे त्यांच्या कारकीर्दीत मोठय़ा स्पर्धेतील सहभागाची नोंद राहील.
अन्य देशांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंबरोबर खेळल्यामुळे येथील अनुभवाची शिदोरी त्यांना खूप उपयुक्त ठरेल. गतवर्षी आयपीएल स्पर्धेमुळेच युसुफ पठाणची कारकीर्द बहरली असे सांगून कर्स्टन म्हणाले या स्पर्धेत कागदावर वरचढ असलेला संघही ऐनवेळी खराब कामगिरी करु शकतो व विजेतेपदाच्या जवळपास नसणारा संघही ऐनवेळी बाजी मारु शकतो हे गतवर्षी आयपीएल स्पर्धेत पाहावयास मिळाले आहे. प्रत्येक सामन्यात सातत्यपूर्ण कामगिरी करणारा संघच बलवान असतो.प्रत्येक स्पर्धेत काहीतरी नवीन शिकावयास मिळते.