Leading International Marathi News Daily
रविवार, १० मे २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

मुंबईला बंगळुरूवर स्वारी करावीच लागेल
पोर्ट एलिझाबेथ, ९ मे/ पीटीआय

नऊ सामन्यानंतर फक्त तीन विजय साकारू शकलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाला

 

उपान्त्य फेरीत पोहोचण्यासाठी उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. तर सुरुवातीला फ्लॉप ठरलेल्या अनिल कुंबळेच्या बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स संघाची अवस्था मुंबई एवढी बिकट नक्कीच नाही. त्यामुळे उपान्त्य फेरीच्या मार्गावर पोहोचण्यासाठी मुंबईला बंगळुरूवर स्वारी करावीच लागेल.
मुंबईच्या संघाला दिल्लीकडून पराभव पत्करावा लागला होता. एकेकाळी ‘फेव्हरीट’ समजल्या जाणाऱ्या मुंबईची पराभवाची हॅट्ट्रीक झाली असून त्यांना स्पर्धेतील आव्हान टिकविण्यासाठी उद्याच्या सामन्यात विजय मिळवावाच लागेल. गेल्या सामन्यात मुंबईला बंगळुरूने धुळ चारली होती. पंक्चर झालेल्या बंगळुरूला त्यावेळी ‘जॅक’ चा आधार मिळाला होता. त्याच्या तडफदार अर्धशतकाच्या जोरावर बंगळुरूने मुंबईला सहज नमविले होते. त्यामुळे यावेळी मुंबईला पहिल्यांदा जॅक कॅलिसला लवकरात लवकर बाद करावे लागेल.
मुबंईची फलंदाजी ही भारतीय संघासारखी कागदावर चांगली दिसत असली तरी प्रत्यक्षात मात्र त्यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. सनथ जयसूर्या सातत्याने फ्लॉप ठरत असल्याने त्याला गेल्या सामन्यात वगळण्यात आले होते. पण या महत्वाच्या सामन्यात त्याला वगळण्याची घोडचूक मुंबईने करणार नाही असा अंदाज आहे. सचिनही कधीतरी पौर्णिमेच्या चंद्रासारखी फलंदाजी करतोय. त्याला जबाबदारीने फलंदाजी करायला हवी.
डय़ुमिनीला सलामीला आणायचा मुंबईचा जुगार पूर्णपणे फसला असून त्याला मधल्या फळीतच खेळवावे लागेल. गोलंदाजी हा मुंबईच्या संघाचा कणा आहे. लसिथ मलिंगा हे मुंबईचे प्रभावी अस्त्र आहे. गेल्या सामन्यात हरभजन आणि डय़ुमिनी यांनी अचूक गोलंदाजी केल्याने त्यांच्याकडून अपेक्षा उंचावलेल्या असतील. अभिषेक नायर हा बऱ्याच सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करू शकलेला नाही.
बंगळुरूचा संघ सुरुवातीला तळाला राहील असे वाटत होता. पण अनिल कुंबळेने संघाला संजविनी दिली. त्याच्याकडे असलेल्या अनुभवाचा तो चांगला उपयोग करताना दिसत आहे. जॅक कॅलिस हा संघासाठी ‘हुकमी एक्का’ ठरतोय. गोलंदाजीबरोबरच तो संघासाठी ‘रनमशिन’ ठरला आहे. तर रॉबीन उथप्पाही चांगल्या फॉर्मात आहे. राहुल द्रविडला गवसलेला फॉर्म हा संघासाठी महत्वाचा आहे. अनिल कुंबळेचा गोलंदाजांना हाताळण्याची पद्धत अप्रतिम आहे. प्रवीण कुमार आणि प्रीझ हे प्रतिस्पध्र्याना जखडून ठेवण्यात यशस्वी ठरत आहेत.