Leading International Marathi News Daily
रविवार, १० मे २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

माझ्या षटकामुळे सामना निसटला - सचिन
इस्ट लंडन, ९ मे/वृत्तसंस्था

माझ्या एका षटकामुळे सामना आमच्या हातातून निसटला, अशी प्रतिक्रिया मुंबई

 

इंडियन्स संघाचा कर्णधार सचिन तेंडुलकर याने दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्धच्या सामन्यानंतर व्यक्त केली. शुक्रवारी रात्री झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सला दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून सात गडी राखून पराभव पत्करावा लागला.
या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली डेअरडेव्हिल्स संघापुढे विजयासाठी ११७ धावांचे किरकोळ उद्दिष्ट ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने धडाकेबाज प्रारंभ केला होता. मात्र वॉर्नर, गौतम गंभीर बाद झाल्यानंतर डय़ुमिनी आणि हरभजन सिंग यांच्या फिरकीने अ‍ॅबी डिव्हिलियर्स आणि तिलकरत्ने दिलशान या जोडीला चांगलेच जखडून ठेवले होते. या फिरकी द्वयीपुढे धावा काढणे कठीण जात होते. या वेळी मुंबई इंडियन्स सनसनाटी विजयाची नोंद करण्याची चिन्हे दिसू लागली होती.
या वेळी पंधराव्या षटकात कर्णधार सचिन तेंडुलकर याने स्वत:कडे चेंडू घेतला.
सचिनच्या या षटकातअ‍ॅबी डिव्हिलियर्स याने तीन चौकार व एका षटकाराच्या साह्य़ाने १९ धावा फटकावल्या. त्यामुळे दिल्लीला आवश्यक असलेली धावगती त्यांच्या आवाक्यात आली.
आम्ही अचूक गोलंदाजी केली, आमचे क्षेत्ररक्षणही चांगले झाले. मात्र माझ्या त्या षटकाने सारे चित्र बदलले आणि तोपर्यंत आमच्या आवाक्यात असणारा विजय आमच्या हातातून निसटला, असे सचिन म्हणाला.
तो म्हणाला की, डय़ुमिनी व हरभजन सिंग यांनी प्रभावी गोलंदाजी केली हे पाहून आपणही चांगली गोलंदाजी करू असे वाटल्याने मी स्वत: गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्धच्या पराभवामुळे मुंबई इंडियन्स संघ आता क्रमवारीत सातव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. या संघाचा उपांत्य फेरीतील प्रवेश कठीण बनल्याचे चित्र सध्या तरी दिसते आहे.