Leading International Marathi News Daily
रविवार, १० मे २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

आयपीएलमध्ये खेळण्याची संधी हुकल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू निराश
मेलबर्न, ९ मे/ वृत्तसंस्था

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत खेळण्याची संधी हुकल्यामुळे शेन व्ॉटसन, नॅथन ब्रॅकन आणि जेम्स होप्स हे खेळाडू चांगलेच निराश झाले आहेत.
शेन वॉटसन हा राजस्थान रॉयल्सकडून, नॅथन ब्रॅकन हा बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सकडून

 

तर जेम्स होप्स हा किंग्ज पंजाब संघाकडून खेळणार होता. मात्र ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने या खेळाडूंना वैद्यकीय कारणास्तव या स्पर्धेत न खेळण्याचा सल्ला दिला.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाचे डॉ. ट्रेफर जेम्स यांनी या खेळाडूंची वैद्यकीय तपासणी केली. त्यांनी ऑस्ट्रेलिया संघाच्या दौऱ्यांचे भरगच्च वेळापत्रक लक्षात घेता या खेळाडूंना आयपीएल मध्ये न खेळता विश्रांती घेण्यास सांगितले आहे.
नॅथन ब्रेकन हा बंगळुरु रॉयल चॅलेंजर्स संघाकडून खेलण्यास खूप उत्सुक होता. मात्र ऑस्ट्रेलिया मंडळाने परवानगी नाकारल्याने त्याची मोठी निराशा झाल्याचे त्याचा प्रतिनिधी रॉब हॉर्टन याने क्रिकइन्फो या संकेतस्थळाशी बोलताना सांगितले.
जेम्स होप्स याच्या वतीने त्याचा प्रतिनिधी पीटर रॉजर्स यानेही अशीच भावना व्यक्त केली आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या गतवर्षी झालेल्या पहिल्या स्पर्धेत सवरेत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार पटकाविणारा शेन व्ॉटसन हाही या स्पर्धेत खेळण्यास खूपच उत्सुक होता. मात्र ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाच्या निर्णयाने त्याचीही मोठी निराशा झाली आहे.
इंग्लंडविरुद्धची जुलै- ऑगस्टमध्ये होणारी अ‍ॅशेस मालिका व त्याआधी होणारी ट्वेंटी- २० विश्वचषक स्पर्धा यासाठी प्रमुख खेळाडूंनी तंदुरुस्त असले पाहिजे, असे ऑस्ट्रेलिया मंडळाचे धोरण आहे. गेल्या वर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेत खेळल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे अनेक खेळाडू जायबंदी झाले. हा अनुभव लक्षात ठेवून ऑस्ट्रेलिया मंडळाने या खेळाडूंना आयपीएलमध्ये न खेळता विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.