Leading International Marathi News Daily
रविवार, १० मे २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

पय्याडे आणि डी. वाय. पाटील संघांची अंतिम फेरीत धडक
प्रबोधन: मुंबई टी-२० क्रिकेट
मुंबई, ९ मे / क्री. प्र.

पय्याडे क्रिकेट क्लब आणि डी. वाय. पाटील स्पोर्ट्स यांनी आपले प्रतिस्पर्धी अनुक्रमे

 

नॅशनल क्रिकेट क्लब आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया यांच्यावर एकतर्फी विजय मिळवून प्रबोधन गोरेगाव आयोजित मुंबई टी-२० सिरीज स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. एकूण दोन लाखांची इनाम राशी असणाऱ्या या स्पर्धेची विजेतेपदाची लढत उद्या प्रबोधन क्रीडाभवन, गोरेगाव येथे होईल.
आजचा दिवस जरी तसा निराशाजनक ठरला तरी पय्याडेचा दिनेश साळुंके, ओंकार खानविलकर आणि कुमार सुब्रमण्यम (डी. वाय. पाटील) यांच्यासाठी विशेष ठरला. दिनेशने नॅशनलविरुद्ध १२ धावांत ४ बळी घेताना हॅट्ट्रिकची किमया साधली. ओंकारने ४८ चेंडूत ६९ धावा फटकावून पय्याडेला पावणेदोनशेचा टप्पा गाठण्यास मदत केली. नॅशनलला त्याच्या उत्तरादाखल १३.४ षटकांत केवळ ११७ धावा मग केल्या. सी. सी. आयलाही जेमतेम शंभर धावांची वेस ओलांडण्यात यश आले. त्यांची ११३ ही धावसंख्या साडेपंधरा षटकांमध्ये पार करणाऱ्या डी. वाय. पाटीलकडून कुमार सुब्रमण्यमने नाबाद ७७ धावांची मजबूत खेळी केली.
पय्याडेची आज खराब सुरुवात झाली. अमित वेळसकर आणि दिनेश साळुंखे (०) यांना बलविंदर सिंग संधूने झटपट बाद करून पय्याडेला धक्का दिला. मात्र २ बाद ५ नंतर पय्याडेला ओंकार आणि अनूप खेणकर (२४) यांच्या ६८ धावांच्या भागीदारीने चांगलेच सावरले.
नॅशनलने सुरुवातीपासून चांगली धावगती राखली; पण त्यांचे फलंदाजही क्रमाक्रमाने बाद झाले. अकरा षटकांमध्ये ५ बाद १०६ अशी स्थिती असणाऱ्या नॅशनलला मग जमीनदोस्त करण्याचे काम दिनेशने केले. त्याने जम बसलेल्या ज्युड सिंहला २७ वर झेलबाद केले व पाठोपाठ पुष्कराज चव्हाण आणि पंकजय जैसवाल यांना तंबूत परत धाडले. केवळ १३.२ षटकांमध्ये नॅशनलचा डाव संपुष्टात आला. मुसाविर खोटेने २५ धावांत ३ बळी घेत पय्याडेच्या गोलंदाजीला अधिक धार दिली.
प्रशांत भोईर (२१ धावांत ३ बळी) आणि राकेश प्रभू (१५ धावांत ३ बळी) यांच्या मध्यमगती माऱ्यासमोर क्रिकेट क्लब आफ इंडियाचे फलंदाज तगच धरू शकले नाहीत.
संक्षिप्त धावफलक
पय्याडे ७ बाद १७५ (ओंकार खानविलकर ६९, अनूप रेवणकर २४, बलविंदर सिंग संधू २२ धावांत ३ बळी, विक्रांत येलिगट्टी ४२ धावांत २ बळी, हर्षल नंदू ३८, धावांत २ बळी) विजयी नॅशनल १३.२ षटकांमध्ये ११७ (सोहम सिन्हा २०, ज्युड सिंग २७, तुषार घरत २२, दिनेश साळुंखे १२ धावांत ४ बळी, मुसाविर खोटे २५ धावांत ३ बळी, अंकित चव्हाण १९ धावांत २ बळी) सामनावीर- ओंकार खानविलकर
सीसीआय १७.३ षटकांत ११३ (अक्षय जांभेकर १८, प्रशांत भोईर २१ धावांत ३ बळी, राकेश प्रभू १५ धावांत ३ बळी, इक्बाल अब्दुल्ला २४ धावांत ३ बळी) पराभूत वि. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स १ बाद ११७ (कुमार सुब्रमण्यम नाबाद ७७, चंद्रशेखर ताठे नाबाद ३०)
सामनावीर- कुमार सुब्रमण्यम