Leading International Marathi News Daily
रविवार, १० मे २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

पीसीबीची आयसीसीला कायदेशीर नोटीस
कराची, ९ मे/ पीटीआय

सुरक्षेच्या कारणास्तव २०११ च्या विश्वचषकाचे सहयजमानपद काढून घेतल्याबद्दल

 

पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) आंतर राष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) कायदेशीर नोटीस बजाविली आहे.
आयसीसीच्या २०११ च्या विश्वचषकाचे सहयजमानपद काढून घेतल्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी त्यांना कायदेशीर नोटीस बजाविली असल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एजाझ बट्ट यांनी आज दिली.
पीसीबीला असे वाटते की आयसीसीने घेतलेला हा निर्णय कायद्याच्या दृष्टीने अयोग्य आहे. पाकिस्तानमधील सुरक्षेची पाहणी न करता विश्वचषकाचे सहयजमानपद काढून घेणे ही गोष्ट पटण्यासारखी नाही. विश्वचषकाचे सहजयमानपद गमाविल्यानंतर आम्हाला काहीही बोलायचे नाही. पण या निर्णयाचा निषेध म्हणून आम्ही आयसीसीला कायदेशीर नोटीस बजावित आहोत, असे पीसीबीचे अध्यक्ष एजाझ बट्ट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ते पुढे म्हणाले की, जर सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानचे सहयजमानपद काढून घेत असाल तर श्रीलंका आणि बांगलादेशमध्येसुद्धा काही सुरक्षित वातावरण आहे असे मली वाटत नाही. श्रीलंकेत तर तमिळ टायगर्स आणि श्रीलंकेच्या आर्मीमध्ये युद्ध सुरु आहे. तर बांगलादेशमध्येही काही चांगले वातावरण नाही. त्यामुळे आयसीसीचा हा निर्णय कायदेशीररीत्या अयोग्य नसून त्यांनी आम्ही पाठवलेल्या नोटीसीला उत्तर द्यायला हवे.